कोणता कॅमेरा माझ्यासाठी चांगला ? - कॅमेर्‍याचे प्रकार

     
Polaroid camera, DSLR Camera, Mirrorless Camera, Point and shoot camera
   
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)

    जर फोटोग्राफी करायची असेल, तर त्यासाठी कुठला कॅमेरा घ्यायला हवा, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं  🤔. आजकाल अशी एक समजूत आहे, की आपल्याकडे DSLR आला म्हणजे आपण फोटोग्राफर झालो. पण तेवढा एकच प्रकार आहे का कॅमेऱ्याचा? तर मुळीच नाही. ह्याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत. 
कॅमेरा कसा काम करतो, त्यावरून त्याचे प्रकार पडले आहेत. ते म्हणजे,
1) इन्स्टंट कॅमेरा
2) डिजिटल कॅमेरा

इन्स्टंट कॅमेरा (Instant camera) 
Instant Polaroid camera with single photo print

अशा प्रकारचा कॅमेरा आपण गजनी सिनेमामध्ये आमीर खानच्या हातात बघितला आहे.  इन्स्टंट कॅमेरा (Instant camera) हा त्याच्या नावासारखाच काम करतो. अगदी तात्काळ. ह्या कॅमेऱ्यामध्ये आतल्या आतच फोटो डेव्हलप होतो आणि आपल्याला तयार फोटो प्रिंट मिळते. म्हणजे होतं असं, की ह्यात फोटो प्रिंटिंग साठी वापरले जाणारे कागद हे आधीच खास केमिकल कोटिंग केलेले असतात. तसे तयार कागदच कॅमेरा मध्ये भरले जातात. त्यानंतर फोटो काढताना जेव्हा त्या कागदांवर प्रकाश पडतो, तेव्हा त्या कागदावरचं केमिकल आणि प्रकाश ह्यांच्यात संपर्क होतो आणि तिथे केमिकल रिऍक्शन होते. ह्यामुळे फोटो कागदावर प्रिंट होतो. त्यानंतर तो कागद आपोआप बाहेर येतो आणि आपल्या हातात थेट प्रिंट झालेला फोटोच पडतो. आहे की नाही भारी. मग हाच कॅमेरा सगळे जण का वापरत नाहीत. त्याची कारणे खालील प्रमाणे:-
इन्स्टंट कॅमेऱ्याचे तोटे:-
1) प्रिंट चा दर्जा वाईट नसला, तरी उच्च सुद्धा नसतो.
2) ह्या कॅमेऱ्यातून ठराविक आकाराचीच प्रिंट तुम्ही काढू शकता.
3) प्रत्येक प्रिंट ही त्या कागदावरच्या केमिकल कोटिंग मुळे महाग असते. 
4) मुळात प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक फोटोची प्रिंट पाहिजेच असते, असं नाही. तरी आजकाल असे इन्स्टंट कॅमेरे उपलब्ध आहेत, जे प्रिंट न काढता फोटो मेमरी कार्डवर फक्त सेव्ह करू शकतात. 
इन्स्टंट कॅमेऱ्याचे फायदे:-
1) गम्मत म्हणून वापरणार असाल, तर हा कॅमेरा एक चांगला पर्याय आहे. कारण आपण काढलेला फोटो लगेच प्रिंट करून आपल्या हातात बघणे, हा एक चांगला अनुभव असतो.
2) फोटो कसा आलाय, हे सगळ्यांना लगेच बघता येते.
3) डॉक्युमेंटेशन साठी हा एक चांगला पर्याय आहे. 
4) सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, जेव्हा अगदी कमी वेळ असेल, तेव्हा ह्या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो काढून त्या प्रिंट्स चं कोलाज किंवा तशीच काहीतरी सजावट आपण करू शकतो.
5) असा कॅमेरा बाकीच्या प्रकारच्या कॅमेऱ्याच्या तुलनेत भरपूर स्वस्त दरात उपलब्ध आहे.

सध्या बाजारात अशा प्रकारचे fujifilm instax सारखे कॅमेरे जास्त प्रचलित आहेत. हे कॅमेरे तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बघायचे असतील, तर खालील लिंक वर जाऊन पाहू शकता. 

1) Fujifilm Instax Mini 9 Instant Camera


डिजिटल कॅमेरा (Digital camera)
नावाप्रमाणेच ह्या प्रकारचा कॅमेरा डिजिटली काम करतो. ह्यामध्ये कागद किंवा फिल्म नसते. त्या ऐवजी डिजिटली काम करणारा एक सेन्सर असतो, जो फोटो काढताना त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या कणांवरून डिजिटल स्वरूपात  फोटो साठवून ठेवतो. त्यामुळे वापराच्या सोयीमुळे हे कॅमेरे आजकाल सगळ्यात जास्त वापरले जातात. 
ह्यातसुद्धा खालीलप्रमाणे प्रकार आहेत.
1) पॉईंट अँड शूट कॅमेरा
2) DSLR कॅमेरा 
3) मिररलेस कॅमेरा
आता हे प्रकार आपण सविस्तर बघुयात.

पॉईंट अँड शूट कॅमेरा (Point and shoot camera)
Canon SD1000 Point and shoot camera

हा कॅमेरा वापरायची पद्धत ही त्याच्या नावाप्रमाणेच आहे. म्हणजे जिथला फोटो काढायचा आहे, त्या बाजूला कॅमेरा धरायचा (पॉईंट करायचा) आणि फोटो क्लिक करायचा (शूट करायचा). ह्या कॅमेऱ्यात लेन्स आतच फिक्स केलेले असते, ते बदलता येत नाही. पण त्या लेन्सला झूम चा पर्याय दिलेले असतो, जो वापरून एखादा लांबचा फोटो सुद्धा आपण काढू शकतो. शिवाय ह्यात एक छोटासा फ्लॅश दिलेला असतो, जो कमी प्रकाशात फोटो काढताना उपयोगी ठरतो. 
        ह्यामध्ये फार सेटिंग दिलेली नसतात, कारण हा प्रोफेशनल कॅमेरा नाहीये. पण अशा कॅमेऱ्यांमध्ये काही फिल्टर दिलेले असतात, जे वापरून आपण आपल्या फोटोंना फक्त एक वेगळा रंग देऊ शकतो किंवा त्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलू शकतो. आणि आजकाल तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे, की ह्या कॅमेऱ्यातून तुम्ही खूप चांगल्या दर्जाचे फोटो काढू शकता.

पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याचे फायदे:-
1) कमी सेटिंगमुळे वापरायला सोपा असतो.
2) कमी वजन असल्यामुळे न्यायला आणायला सोपा.
3) छोटा असल्यामुळे खिशात सुद्धा बसतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बरोबर घेऊनच फिरता येते.
4) प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या तुलनेत स्वस्त असतो. 
5) बऱ्यापैकी चांगले फोटो काढू शकतो.

पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याचे तोटे:- 
1) छोटा सेन्सर असल्यामुळे कमी प्रकाश असताना, नैसर्गिक दिसणारा फोटो काढण्यासाठी वापर करता येत नाही.
2) जास्त सेटींग नसल्यामुळे फोटोग्राफी शिकण्यासाठी फार उपयोगी नाही.
3) लेन्स बदलता येत नाही त्यामुळे ठराविक प्रकारचेच फोटो काढता येतात.
4) त्यातच दिलेल्या फ्लॅशची शक्ती मर्यादित असते आणि बाहेरून दुसरा फ्लॅश लावता येत नाही. म्हणून, कलात्मक फोटो काढता येत नाहीत. 
5) लेन्सच्या मर्यादेमुळे ब्लर चा इफेक्ट देता येत नाही. 

ह्या प्रकारचे काही प्रचलित आणि चांगले कॅमेरे आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. असे हे कॅमेरे तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बघायचे असतील, तर त्या लिंक वर जाऊन पाहू शकता. 

DSLR कॅमेरा (Digital Single Lens Reflex Camera)
Canon EOS 5D DSLR camera

डिजिटल कॅमेऱ्याचा हा प्रकार सध्या सगळयांना माहीत आहे. ह्याच्यासुद्धा नावातच ह्याच्या कामाची पद्धत दडलेली आहे. पूर्वीच्या कॅमेऱ्यांमध्ये दोन लेन्स असायची, एक लेन्स समोर काय चाललंय ते बघण्यासाठी आणि एक लेन्स फक्त फोटो काढण्यासाठी. पण DSLR (Digital Single Lens Reflex) ह्या प्रकारात ह्या दोन्ही कामांसाठी एकच लेन्स असते. ह्या लेन्समधून प्रकाश आत येतो आणि आरसा आणि प्रिझम यांच्या मदतीने आपल्याला समोर काय चालू आहे ते दिसतं. कशाचा फोटो काढायचा हे नक्की झालं, की मग आपण क्लिक चं बटन दाबतो. त्यावेळेला तो आरसा वर घेतला जातो जेणेकरून येणारा  प्रकाश हा आरशामागे असणाऱ्या सेन्सर वर पडेल आणि फोटो काढला जाईल. 
ह्या प्रकारचा कॅमेरा प्रोफेशनली वापरला जातो. त्यासाठी त्याचे फायदे बघुयात. 

DSLR चे फायदे:-
1) मोठा सेन्सर असल्यामुळे फोटो चा दर्जा उत्तम असतो.
2) लेन्सेस बदलता येत असल्यामुळे, कुठल्याही प्रकारचा पाहिजे तसा फोटो काढता येतो. 
3) फोटोमध्ये ब्लर चा इफेक्ट देता येतो.
4) बाहेरून दुसरा फ्लॅश जोडण्याची सोय असते. त्यामुळे कलात्मक फोटो काढता येतात. 
5) DSLR मध्ये भरपूर सेटिंग दिलेली असतात त्यामुळे अगदी हवा तसा दिसणारा फोटो काढता येतो. 
6) फोटोग्राफी शिकण्यासाठी हा उपयोगी असतो. 
DSLR चे तोटे (पॉईंट अँड शूट च्या तुलनेत)
1) आकारात मोठा असल्यामुळे सहजासहजी सगळीकडे नेता येत नाही.
2) त्याचं वजन जास्त असल्यामुळे ने आण करायला अवघड असतो आणि प्रत्येकवेळेला 'आत्ता आपल्याला ह्याची खरंच गरज आहे का' असा विचार करावा लागतो.
3) सेटिंग जास्त असल्यामुळे सगळयांना वापरता येत नाही. 
4) DSLR हा पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याच्या तुलनेत महाग असतो. शिवाय वेगवेगळ्या लेन्सेस आणि फ्लॅशवरही खर्च करावा लागतो. 

ह्या प्रकारचे काही प्रचलित आणि चांगले कॅमेरे आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. असे हे कॅमेरे तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बघायचे असतील, तर त्या लिंक वर जाऊन पाहू शकता. 

मिरर-लेस कॅमेरा (Mirrorless camera)
Canon EOS R Mirrorless camera

नावाप्रमाणेच, ह्या कॅमेऱ्यामध्ये लेन्स च्या मागे आरसा नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा कॅमेरा चालू असेल, तेव्हा तेव्हा येणारा प्रकाश हा सतत थेट सेन्सर वरच पडत असतो आणि आपल्याला समोर काय चाललंय, ते दिसतं. एवढी एकच गोष्ट सोडली, तर ह्या प्रकारच्या कॅमेऱ्याचे बाकी सगळे फायदे हे DSLR कॅमेऱ्यासारखेच आहेत. म्हणजे यातही आपल्याला मोठा सेन्सर मिळतो, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी लेन्सेस बदलता येतात, ब्लर चा इफेक्ट देता येतो, बाहेरून फ्लॅश जोडता येतो, वगैरे. 
DSLR कॅमेऱ्याच्या तुलनेत ह्याचा अजून एक फायदा म्हणजे, ह्यात आरसा आणि प्रिझम ही प्रणाली नसल्यामुळे मिररलेस कॅमेऱ्यांचा आकार DSLR पेक्षा कमी असतो. कधी कधी तर तो पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याइतका सुद्धा लहान असतो. फक्त त्यापुढे तुम्ही कुठलं लेन्स वापरता, त्याच्यावर एकूण आकार ठरतो. तसंच ह्या सगळ्याचं एकूण वजन सुद्धा कमी असतं.
तसंच ह्यामध्ये सेन्सर वर पडणाऱ्या प्रकाशाची सगळी माहिती जशीच्या तशी मिळत असल्यामुळे, आपण ज्या सेटिंग वर फोटो काढतोय, त्यामुळे तो फोटो काढल्यानंतर काळा येईल का उजळ येईल हे देखील आधीच समजते. त्यामुळे ट्रायल अँड एरर मध्ये जास्त वेळ जात नाही. 

ह्या प्रकारचे काही प्रचलित आणि चांगले कॅमेरे आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. असे हे कॅमेरे तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बघायचे असतील, तर त्या लिंक वर जाऊन पाहू शकता. 


तर सध्या कॅमेऱ्याचे असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. पण कुणासाठी कुठला कॅमेरा चांगला, ह्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी खाली ह्या सगळ्या महितीचा सारांश देत आहे, तो लक्षात घ्यावा म्हणजे समजून घेणं सोपं होईल. 
 1) इन्स्टंट कॅमेरा (Instant Camera)
काढलेल्या फोटोची लगेच प्रिंट मिळते, वापरायला सोपा, पण प्रिंट ला खर्च येतो, सेन्सरच्या आकारामुळे आणि एकच लेन्स असल्यामुळे फोटोंचा दर्जा मर्यादित असतो, वापरायला मजा येते.
2) पॉईंट अँड शूट कॅमेरा (Point and shoot camera)
छोट्या आकारामुळे हाताळायला आणि ने आण करायला सोपा, कमी वजनाचा, चांगल्या दर्जाचे फोटो, पण एकच फिक्स लेन्स आणि त्यातच असलेला फ्लॅश यांमुळे फोटो च्या विविधतेवर मर्यादा, प्रोफेशनल कॅमेऱ्यापेक्षा स्वस्त.
3) DSLR कॅमेरा
मोठा सेन्सर असल्यामुळे चांगल्या दर्जाचे फोटो काढू शकतो, लेन्सेस बदलता येतात, बाहेरून वेगळा फ्लॅश लावता येतो आणू म्हणूनच खर्चिक प्रकरण, सर्व सेटिंग उपलब्ध असल्यामुळे अगदी हवा तसा फोटो काढता येतो, मोठा आकार आणि जास्त वजन ह्यामुळे हाताळायला आणि ने आण करायला अवघड.
4) मिररलेस कॅमेरा (Mirrorless camera)
अगदी DSLR सारखाच कॅमेरा फक्त ह्यामध्ये आरसा आणि प्रिझम ही प्रणाली नसते, DSLR चे सर्व फायदे तर आहेतच पण स्वतःचे असे खास वाढीव फायदे आहेत, बदलता येणारी लेन्सेस, बाहेरून लावता येणारा फ्लॅश यांमुळे खर्चिक प्रकरण, DSLR च्या तुलनेत छोटा आकार आणि कमी वजन. 

आता ह्यावरून तुम्हाला कॅमेऱ्याचे विविध प्रकार, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचे फायदे तोटे ह्या सगळ्यांबद्दल माहिती मिळाली असेलच. अजून काही माहिती हवी असेल, तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, म्हणजे मला ती तुम्हाला उपलब्ध करून देता येईल. 🙂
पण एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, हे सगळेच कॅमेरे त्यांच्या त्यांच्या जागेवर उत्तम आहेत. त्यांना त्यांचे स्वतःचे फायदे तोटे आहेत. फक्त आपल्यासाठी योग्य कॅमेरा कुठला, हे ज्याने त्याने आपला वापर, आपलं बजेट, आपण कशाप्रकारचे फोटो काढणार आहोत ह्यांवरून ठरवावं. 

- प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेलतर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- कॅमेर्‍याचे विविध भाग 

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. It's really helpful....Thx prasanna ....

    ReplyDelete
  2. Very helpful...and I like that the post is in marathi....👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. मुख्य हेतू तोच आहे. मराठीतून शिक्षण. 🙂

      Delete
  3. मोबाईल कॅमेराचे वर्गीकरण या पैकी कशात करता येईल? की ती कॅटेगरी च वेगळी आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. 'कॅमेरा काम कसा करतो' ह्या अर्थाने बघितलं, तर मोबाईल कॅमेरा हा 'डिजिटल मिररलेस कॅमेरा' सारखा काम करतो.

      Delete
  4. छानच रे ! सर्व गोष्टी अगदी समजेल अशा सोप्या भाषेत लिहीत आहेस. उत्तम आणि अभ्यासपूर्ण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला