सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.
आजकाल 'सोशल मीडिया' हे एक नवीन जगच बनलं आहे. व्हाट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी ऍप्स आहेत. पण काही जण ही ऍप्स फक्त, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ह्याची माहिती घेणे आणि आपल्या आयुष्यात काय काय चालू आहे ह्याची माहिती बाकीच्यांना देणे, ह्यासाठीच वापरतात.
पण आपण ही ऍप्स बाकीच्या बऱ्याच कामांसाठी वापरू शकतो, ज्याच्यासाठी त्यांच्यामध्ये दिलेल्या बऱ्याच सोयींचा उपयोग होईल. जसं की फोटोग्राफर म्हणून आपला एक पोर्टफोलिओ तयार करणे, ह्याच क्षेत्रातील बाकीच्या लोकांशी जोडले जाणे, व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणे, ई.
आता हे सर्व करण्यासाठी आपल्याला सतत फोटो आणि व्हीडीओ आपलोड करावे लागतात. पण हे करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळेल आणि पुढे काही त्रास सुद्धा होणार नाही. अशाच काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आपण ह्या पोस्टमध्ये बघणार आहोत.
पहिल्यांदा आपण बघुयात की आपण टाकत असलेल्या फोटोला आणि व्हीडीओला चांगला प्रतिसाद मिळावा, ह्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे.
काय काय करावे?
1) एडिटिंग
कोणत्याही कॅमेरामधील सध्याचं तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं, तरीही त्याची आपल्या डोळ्यांशी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे आपण फोटो काढताना किंवा व्हीडीओ शूट करताना आपला डोळा जे काही बघत असतो, ते तसंच्या तसं फोटो किंवा व्हीडीओ मध्ये येत नाही. म्हणूनच प्रत्येक फोटो किंवा व्हीडीओला थोडं तरी एडिटिंग करावंच लागतं.
आपण टाकणाऱ्या प्रत्येक फोटो किंवा व्हीडीओमध्ये ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि कलर ह्या तीन गोष्टी तरी नक्कीच तपासून घ्याव्यात. कारण सोशल ऍप्स वर स्क्रोल करत असताना आपल्याला कित्येक फोटो आणि व्हीडीओ दिसत असतात, पण फक्त काही ठराविकच फोटो असे असतात, की ज्यासाठी आपण थोडा वेळ थांबतो आणि बघून लाईक करतो.
त्यामुळे लोकांनी स्क्रोल करताना तुमचे फोटो नीट बघावेत आणि लाईक करावेत, असं वाटत असेल तर थोडं तरी एडिटिंग करा, म्हणजे मूळ फोटो अजून छान दिसेल.
2) फोटो री-साईजिंग (Photo resizing)
तुम्ही ज्या मोबाईलने किंवा कॅमेऱ्याने फोटो काढला आहे, त्याचा सेन्सर किती मेगापिक्सेलचा आहे, त्यावरून त्या फोटोची साईज ठरते. पण जेव्हा तुम्ही तो फोटो सोशल ऍप्स वर अपलोड करता, तेव्हा तो क्लाउड वर साठवला जातो. तुम्ही कितीही साईजचा फोटो अपलोड केलात, तरी क्लाउडवरची जागा वाचवण्यासाठी, प्रत्येक ऍप एका ठराविक रिझोल्युशनध्ये तो फोटो कॉम्प्रेस करतं आणि मगच अपलोड करतं.
पण त्या ऍप मध्ये कॉम्प्रेस होण्यापेक्षा, जर तो फोटो आपण आधीच तेवढ्या रिझोल्युशन ला कॉम्प्रेस केला, तर फोटो जास्त चांगला राहतो. त्यामुळे फोटो अपलोड करायच्या आधी ठराविक रिझोल्युशन मध्ये कॉम्प्रेस करायला विसरू नका.
प्रत्येक ऍप मध्ये हे रिझोल्युशन वेगवेगळं असतं आणि आधीच ठरलेलं असतं. शिवाय त्याचा अस्पेक्ट रेशो (Aspect ratio) म्हणजेच रुंदी आणि उंची ह्यांचं गुणोत्तर सुद्धा ठरलेलं असतं. फोटोच्या बाबतीत हा अस्पेक्ट रेशो म्हणजे, आडव्या दिशेतील पिक्सेलची संख्या आणि उभ्या दिशेतील पिक्सेलची संख्या ह्यांचं गुणोत्तर असतं.
म्हणजे तुम्ही जरी खूप आडवा किंवा खूप उभा फोटो अपलोड केलात, तरी त्याचा काही भागच फक्त आपल्याला दिसतो. बाकीचा भाग अपलोड करतानाच क्रॉप केला जातो.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर फोटो अपलोड करताना खालील रिझोल्युशन आणि अस्पेक्ट रेशो वापरला जातो.
1) फेसबुक
प्रोफाईल फोटो:- आपला प्रोफाईल फोटो हा फक्त चौरस आकारातच घेतला जातो आणि दाखवताना त्याचा मधला वर्तुळाकार भाग दाखवला जातो. त्यामुळे आपला चेहरा मध्यभागी असेल असा फोटो प्रोफाईल फोटोसाठी निवडा.
प्रोफाईल फोटोचा जास्तीत जास्त आकार हा 2048 x 2048 पिक्सेल एवढा असतो. तुम्ही कितीही मोठा फोटो अपलोड केलात, तरी तो एवढ्याच रिझोल्युशन मध्ये कॉम्प्रेस केला जातो.
ह्यासाठी अस्पेक्ट रेशो (Aspect ratio) म्हणजेच गुणोत्तर हे 1:1 असतं. नीट समजण्यासाठी खालचा फोटो पहा.
कव्हर फोटो:- फेसबुकवरचा कव्हर फोटो हा आपल्याला आडवा दिसतो. त्यामुळे त्यासाठी अस्पेक्ट रेशो (Aspect ratio) हा 2.7:1 एवढा असतो. पण त्यासाठी फोटोची जास्तीत जास्त लांबी ठरलेली आहे, ती म्हणजे 2037 पिक्सेल.
त्यानुसार पुढच्या वेळेला तुमचा फोटो आधीच तसा री-साईज करा. नीट समजण्यासाठी खालील फोटो पहा.
नॉर्मल फोटो:- फेसबुकवर प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो सोडून बाकीचे सगळे नॉर्मल फोटो, उंची किंवा रुंदीमध्ये जास्तीत जास्त 2048 पिक्सेल एवढ्या आकारात सेव्ह केले जातात. त्यामुळे त्यापेक्षा जास्त आकाराचा फोटो जर तुम्ही अपलोड केलात, तर फेसबुक तो फोटो तोपर्यंत कॉम्प्रेस करेल, जोपर्यंत रुंदी किंवा उंची 2048 पिक्सेल एवढी कमी होत नाही.
तुम्हाला जर एखादा उभा फोटो अपलोड करायचा असेल, तर 1:1.5 ह्या अस्पेक्ट रेशो (Aspect ratio) मध्ये करावा लागेल.
2) इंस्टाग्राम
इंस्टाग्राम हे असं दुसरं लोकप्रिय ऍप आहे, की जे फोटो आणि व्हीडीओ साठी वापरलं जातं. त्याचे स्वतःचे असे ठरलेले रिझोल्युशन आणि अस्पेक्ट रेशो (Aspect ratio) आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
अकाउंट वरचे फोटो:- कुणाच्या अकाउंट वर तुम्ही गेलात, तर तिथे तुम्हाला खालीलप्रमाणे तीन-तीन च्या ओळीत फोटो दिसतील. हे सगळे चौरस असतात. हे तुम्ही खालच्या फोटोमध्ये पाहू शकता.
![]() |
| (वरच्या फोटोमध्ये दिसणारं हे माझं इंस्टाग्राम अकाऊंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रंजक फोटो बघायचे असतील, तर 'j.prasanna' ह्या माझ्या अकाऊंट ला नक्की भेट द्या. लिंक:- j.prasanna ) |
त्यामुळे जर तुम्हाला तशा प्रकारचं सलग दिसणारं प्रेझेन्टेशन बनवायचं असेल, तर तुमचे सगळे फोटो हे चौरस आकारातच हवेत. म्हणजेच त्यांचा अस्पेक्ट रेशो 1:1 असावा.
आडवा फोटो:- इंस्टाग्रामवर कुठल्याही फोटोसाठी जास्तीत जास्त रुंदी ही 1048 पिक्सेल एवढीच अपेक्षित आहे. त्यापेक्षा मोठा फोटो असेल, तर तो आपोआप कॉम्प्रेस केला जाईल.
पण म्हणून तुम्ही कितीही आडवा फोटो टाकू शकत नाही. आडव्या फोटोंसाठी अस्पेक्ट रेशो हा जास्तीत जास्त 16:9 एवढा चालू शकतो. नीट समजण्यासाठी खालचा फोटो बघा.
पोर्ट्रेट/उभे फोटो:- उभा फोटो अपलोड करताना तो 4:5 एवढ्या अस्पेक्ट रेशो मध्ये असावा. इथे सुद्धा रुंदीत जास्तीत जास्त 1048 पिक्सेल असण्याची अट लक्षात ठेवा. नीट समजण्यासाठी खालील फोटो बघा.
इंस्टाग्राम स्टोरी:- इंस्टाग्राम वर स्टोरी अपलोड करताना मात्र तुम्ही '1.91:1' (आडव्या फोटोसाठी) ते '9:16' (उभ्या फोटोसाठी) ह्या दोन अस्पेक्ट रेशोच्या मध्ये कुठल्याही आकाराचे फोटो किंवा व्हीडीओ अपलोड करू शकता.
3) हॅशटॅग आणि लोकेशन वापरणे
फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर फोटो-व्हीडीओ अपलोड करताना त्याच्या माहिती मध्ये जर तुम्ही हॅशटॅग आणि लोकेशन लिहिले, तर त्या पोस्ट ला जास्त प्रतिसाद मिळतो, कारण ती पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे इथून पुढे योग्य हॅशटॅग आणि लोकेशन वापरायला सुरू करा. 😀
4) फेसबुकवर अल्बम तयार करा.
तुम्ही तुमच्या अकाउंटवर बऱ्याच प्रकारचे फोटो-व्हीडीओ अपलोड करत असाल, तर ते वेगवेगळ्या अल्बम मध्ये अपलोड करायची सवय लावा. ह्यामुळे तुमचे फोटोचे आणि व्हीडीओचे पूर्णपणे व्यवस्थापन होईल आणि बघणाऱ्याला फक्त त्याच्या आवडीनुसारच फोटो बघता येतील.
आता बघुयात की सोशल मीडियावर फोटो टाकताना काय काळजी घ्यावी.
काय करू नये?
1) खाजगी आयुष्य जपा
सोशल मीडियाचा जेवढा चांगला उपयोग करता येतो, तेवढाच त्याचा वाईट उपयोग करणारे पण भरपूर जण आहेत. असे लोक आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये असतीलच असं नाही. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा प्रकारे आपण टाकलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो.
त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही कुणाबरोबर जोडले जाताय, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ह्या गोष्टी तर काळजीपूर्वक बघाच. पण तरीही, आपले खाजगी फोटो कधीही अपलोड करू नका.
2) ग्रुपचे फोटो टाकताना लक्षात ठेवा की फक्त आपला चेहरा चांगला दिसतोय म्हणून तो फोटो अपलोड करू नका. 😅त्या फोटोमध्ये बाकीच्यांचे चेहरे सुद्धा नीट दिसतायत ना हेही बघा. कारण प्रत्येक फोटो काढताना सगळ्यांचं लक्ष कॅमेऱ्याकडे असतंच असं नाही.
आणि जर सगळ्यांचे चेहरे चांगले दिसले, तरच तो फोटो चांगला ठरेल ना. 🙂
3) अति तिथे माती:-
आपण खूप फोटो अपलोड केले म्हणजे आपण खूप फेमस होऊ, असं नसतं. कारण फोटो किती आहेत त्यापेक्षा ते कसे आहेत, ह्याला जास्त महत्व असतं.
तुम्ही जेवढे फोटो काढता, तेवढे सगळेच अपलोड करायचे असतात, असा काही नियम नाहीये. 😉
त्यामुळे फक्त तेच फोटो अपलोड करा, जे काहीतरी वेगळे असतील आणि लोकांना ते बघायला आवडतील.
अजून अशा बऱ्याच बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या सोशल मीडिया वापरताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. पण मला सुचलेल्या आणि मी स्वतः अमलात आणतो, अशा ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत.
ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या गोष्टी माहीत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. मला आणि बाकीच्या वाचकांना त्या जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
भेटू पुढच्या पोस्टमध्ये. 🙂🙏
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफीसाठी उपयुक्त
मोबाईल ऍक्सेसरीज आणि ऍप्स
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸







ReplyDeleteमाहिती खूप छान आहे... अगदी योग्य आणि नेमक्या गोष्टी सांगितल्या आहेत...
धन्यवाद 🙂🙏
Deleteछान माहिती!👌🏻👌🏻
ReplyDeleteएक सजेशन- सोशल मीडियावर फोटो उपलोड करताना त्या फोटोत असणारे आपल्या ओळखीचे लोक टॅग करायचा ऑप्शन असतो. हा ऑप्शन खरंतर चांगला आहे पण काही लोक जास्त लाईकस् मिळावेत म्हणून फोटोत नसणार्या लोकांनाही टॅग करतात त्यामुळे सोशल मीडियावर कदाचित लाईकस् जास्त मिळतीलही पण असे विनाकारण टॅग होणारे लोक वैतागून खर्या आयुष्यातही आपल्यापासून दूर राहू लागतील.
अगदी बरोबर...😅👍🏻
Deleteअप्रतिम सर👌👌
Deleteअगदी सखोल आणि छान माहिती 👌