मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

 
Accessories and apps for mobile photography and videography

(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)

    मोबाईल हे यंत्र जेव्हापासून आपल्या हातात आलं आहे, तेव्हापासून आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींची जागा त्याने घेतली आहे. आधी आपल्याला गाणी ऐकायला रेडियो किंवा आयपॉड लागायचा, गजरासाठी घड्याळ लागायचं, प्रकाशासाठी बॅटरी लागायची आणि बरंच काही. पण आता ही सगळी कामं एकट्या मोबाईल मध्येच होतात.
    आजकालच्या मोबाईलमध्ये असलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तमोत्तम होत चाललेला कॅमेरा. काही ठराविक गोष्टी सोडल्या, तर बाकी सगळ्या बाबतीत मोबाईलचा कॅमेरा, DSLR किंवा मिररलेस कॅमेऱ्याएवढाच चांगला फोटो देऊ शकतो. काही वेळेला व्हीडीओसुद्धा. त्यातही त्या कॅमेऱ्याला काही ऍक्सेसरीजची जोड दिली तर आपल्याला अजूनच चांगले फोटो  किंवा व्हीडीओ काढता येतात. शिवाय काही मोबाईल ऍप्स सुद्धा काढलेला फोटो किंवा व्हीडीओ चांगला बनवण्यात मदत करू शकतात. 
अशाच काही ऍक्सेसरीज आणि ऍप्स ची साधारण माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत.
सुरुवातीला आपण काही ऍक्सेसरीज बघुयात.
1) सेल्फी स्टिक
Young man holding mobile selfie stick in hand


    मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला सेल्फी स्टिक बद्दल माहिती असतेच. किंबहुना आपल्यापैकी काही जणांनी तर ती वापरली सुद्धा आहे.
    सेल्फी स्टिकचं काम अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं, तर 'फोटो काढताना मोबाईल आपल्यापासून थोडा लांब नेणे, जेणेकरून जास्त भाग फोटोमध्ये मावेल' असं सांगता येईल. आपण मोबाईल आपल्या हातात धरून ठराविक अंतरापर्यंतच लांब नेऊ शकतो. त्यामुळे आपला पूर्ण सेल्फी काढताना किंवा 3 किंवा 4 पेक्षा जास्त लोकांचा सेल्फी काढताना जास्त भाग फोटोमध्ये येत नाही. ह्यासाठी सेल्फी स्टिक हा उत्तम पर्याय आहे.
    काही सेल्फी स्टिक मध्ये हँडल मध्ये एक वायर असते, जी दुसऱ्या टोकापर्यंत गेलेली असते. तिथे ती मोबाईल च्या हेडफोन जॅक मध्ये बसवली आणि हँडलवरचं बटण दाबलं, की फोटो निघतो. ह्यामागे कारण असं, की हेडफोन जॅक मध्ये वायर बसवल्यामुळे, बटण दाबल्यावर मोबाईलला असं वाटतं की व्हॉल्युम चं बटण दाबलं गेलं आहे आणि म्हणून तो फोटो काढतो.
    पण लक्षात ठेवा, ही पद्धत तेव्हाच काम करते जेव्हा तुमच्या मोबाईल मध्ये 'व्हॉल्युम चं बटण दाबलं की फोटो निघावा' असं सेटिंग केलेलं असेल. त्यामुळे आधी ते तपासून बघा. सेल्फीची आवड असलेल्या प्रत्येकाकडे अशी ही सेल्फीस्टिक नक्की असावी.
अशा काही सेल्फी स्टिकची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता.

    काही सेल्फी स्टिक ब्लुटूथ वर काम करतात. म्हणजे त्यामध्ये वायर नसते, पण ब्लुटूथ ची सोय असते त्यामुळे आपण त्याला मोबाईल कनेक्ट करू शकतो. जेव्हा आपण हँडलवरचं बटण दाबतो, तेव्हा मोबाईल मध्ये फोटो क्लिक केला जातो. ही सोय खूप चांगली आहे, फक्त ह्याची किंमत साध्या सेल्फी स्टिक पेक्षा जास्त असते.
अशा सेल्फी स्टिकची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. 

2) एक्स्टर्नल फ्लॅश
    सेल्फी काढताना समजा आजूबाजूला प्रकाश कमी असेल, तर फोटो नीट येत नाही. त्यासाठी काही मोबाईल मध्ये फ्रंट कॅमेऱ्याच्या बाजूला फ्रंट फ्लॅश दिलेला असतो. पण तो एका ठराविक अंतरापर्यंतच उपयोगी आहे. शिवाय एका छोट्याशा जागेतून तो येत असल्यामुळे त्याची शक्ती पण मर्यादित असते.
    त्यात सुद्धा जर तुम्ही सेल्फीस्टिक वापरून फोटो काढत असाल, तर मोबाईलचा फ्रंट फ्लॅश कधीच तुमच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचणार नाही.
    ह्याच्यावर उपाय म्हणून आपण दुसरा एक एक्स्टर्नल फ्लॅश वापरू शकतो. ह्याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. काही स्वतःच्या बॅटरीवर चालणारे फ्लॅश मोबाईल वर चिमट्याने बसवता येतात तर काही मोबाईलवर अडकवून वापरता येतात. पण जे फ्लॅश मोबाईलची बॅटरी वापरतात, ते चार्जिंग पोर्ट मध्ये किंवा हेडफोन जॅक मध्ये बसवावे लागतात.
    पण ह्या सगळ्यांचं काम सारखंच आहे. ते म्हणजे फोटो काढताना प्रकाश देणे. अशा एक्स्टर्नल फ्लॅशचा आकार इनबिल्ट फ्लॅश पेक्षा खूप मोठा असतो आणि त्याची शक्तीही जास्त असते. त्यामुळे कमी प्रकाशात सुद्धा चांगले सेल्फी किंवा साधे फोटो चांगल्या पद्धतीने काढता येतात.
अशा काही फ्लॅशची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता.
 

3) ट्रायपॉड
    ट्रायपॉड म्हणजे तीन पाय असलेलं स्टॅण्ड. कंपनीने मोबाईल च्या कॅमेऱ्यामध्ये बऱ्याच सोयी दिलेल्या असतात. पण त्यातल्या काही गोष्टी वापरताना जर मोबाईल स्थिर ठेवला, तर त्याचा परिणाम अजूनच चांगला येतो. उदाहरणार्थ, नाईट फोटो मोड किंवा लॉंग एक्सपोजर मोड, टाईम लॅप्स व्हीडीओ, ई.
    जेव्हा प्रकाश कमी असेल आणि कॅमेऱ्याचं शटर जास्त वेळ उघडं राहणार असेल, त्यावेळेला मोबाईल स्थिर ठेवण्यासाठी ट्रायपॉड वापरावा. त्यामुळे एकदम स्पष्ट आणि शार्प फोटो मिळतात. तसंच धावत्या ढगांचे किंवा एखाद्या ठिकाणी माणसांच्या हालचालींचे टाईम लॅप्स व्हीडीओ शूट करायचे असतील, तर त्यावेळीही ट्रायपॉडचा खूप उपयोग होतो.
    शिवाय आपण एकटे असताना आपल्याला आपल्या स्वतःचा व्हीडीओ शूट करायचा असेल किंवा टाईमर लावून स्वतःचे फोटो काढायचे असतील, तर त्यासाठी ट्रायपॉड असणे गरजेचं आहे.
अशा मोबाईलच्या ट्रायपॉडची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही तो खरेदी करू शकता.
   
    काही ट्रायपॉड असे असतात की त्यांचे तिन्ही पाय आपण पाहिजे तसे वाकवू शकतो. त्यांना गोरिला ट्रायपॉड म्हणतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला साधा ट्रायपॉड ठेवण्यासाठी समान जमीन असेलच असं नाही. किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला  मोबाईल एखाद्या अशा ठिकाणी ठेऊन व्हीडीओ शूट करायचा असतो की जिथून एक वेगळाच अँगल मिळेल.
    अशा वेळेला साध्या ट्रायपॉड च्या वापरावर मर्यादा येतात आणि तिथे गोरिला ट्रायपॉड उत्तम रीतीने काम करतात. त्याचे पाय आपण खांबाला गुंडाळू शकतो, एखाद्या ओबडधोबड जागी ठेऊ शकतो, कट्ट्यावर विचित्र पद्धतीने ठेऊ शकतो. गोरिला ट्रायपॉड च्या वापराच्या अनेक शक्यता आहेत.
अशा गोरिला ट्रायपॉडची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही तो खरेदी करू शकता.
   

4) एक्स्टर्नल लेन्सेस
External kit clip lenses for mobile including macro lens, wide angle lens, fish eye lens

मोबाईल कॅमेऱ्याची लेन्सेस ही बदलता येत नाहीत. कंपनीने ज्या फिल्ड ऑफ व्ह्यू ची लेन्सेस मोबाईल मध्ये बसवलेली आहेत, त्याच्यावरच समाधान मानावे लागते. आजकालच्या बऱ्याच मोबाईल मध्ये नॉर्मल लेन्स, वाईड अँगल लेन्स, मॅक्रो लेन्स, ई वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस बसवलेली असतात. पण ज्या मोबाईलमध्ये अशी सोय नाहीये, त्यांच्यासाठी एक्स्टर्नल लेन्सेस वापरता येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढता येतात.
    अशा बाहेरून लावायच्या लेन्सेस मध्ये वाईड अँगल लेन्स, फिश आय लेन्स, मॅक्रो लेन्स, झूम लेन्स अशी लेन्सेस मिळतात. ही लेन्सेस आपण वरच्या फोटोत बघू शकतो.
    अशा एक्स्टर्नल लेन्सेसचा फायदा काय आहे हे कळण्यासाठी खालील फोटो बघा. नुसत्या मोबाईलने काढलेला फोटो, वाईड अँगल लेन्सने काढलेला फोटो, फिश आय लेन्सने काढलेला फोटो आणि मॅक्रो लेन्सने काढलेला फोटो हे त्यात दिलेले आहेत.
Comparisons between photos taken by normal mobile, wide angle lens and fish eye lens

Comparisons between photos taken by normal mobile and macro lens

    अशा पद्धतीने, तुमच्या मोबाईल मध्ये आधीपासूनच वेगवेगळी लेन्सेस नसतील, तर तुम्ही ती बाहेरून सुद्धा लावू शकता.
    अशी लेन्सेस एकत्र मिळतात किंवा तुम्ही तशी वेगवेगळी पण घेऊ शकता. अशा काही लेन्सेसची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता.
   

5) गिम्बल
    बऱ्याच जणांना गिम्बल हा प्रकार माहीत नसेल. तर गिम्बल म्हणजे असं यंत्र, जे व्हीडीओ शूटिंग करताना आपला हात बऱ्यापैकी हलला तरी मोबाईलला स्थिर ठेवते.
    ह्या गिम्बल मध्ये मोटर्स आणि सेन्सर्स असतात आणि त्याच्यावर मोबाईल लावायचा असतो. त्यानंतर गिम्बल सुरू केल्यावर, आपला हात जर एखाद्या दिशेत हलला, तर त्यातील सेन्सर्सना हे कळतं आणि ते मोटर्स ना त्याच्या विरुद्ध दिशेत फिरवतात. ह्या दोन परस्परविरोधी हालचालींमुळे मोबाईल जिथल्या तिथेच राहतो. ह्यामुळेच मोबाईल गिम्बलवर लावून शूटिंग केल्यावर एकदम स्थिर व्हीडीओ मिळतो.
    कुठल्याही व्हीडीओ मध्ये माहिती चांगली असेल, पण व्हीडीओ भरपूर हललेला असेल, तर तो बघायला कुणालाच आवडणार नाही. म्हणून जे लोक बऱ्यापैकी व्हीडीओ शूट करत असतात, त्यांच्यासाठी गिम्बल हे एक उत्तम यंत्र आहे.
    अशा काही गिम्बलची लिंक खाली देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता.
   
    
    ह्या सर्व झाल्या ऍक्सेसरीज, ज्या वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीने फोटो किंवा व्हीडीओ शूट करू शकता. पण ते झाल्यानंतर, त्यांच्या एडिटिंगचा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. फोटो एडिटिंग मध्ये आपण फोटोमध्ये काही साधे बदल करू शकतो किंवा त्या फोटोचा पूर्ण मूड बदलू शकतो. तसंच व्हीडीओ एडिटिंग मध्ये वेगवेगळ्या क्लिप एकत्र जोडणे, स्लो मोशन किंवा फास्ट मोशन वापरणे, इफेक्ट देणे, बॅकग्राऊंड म्युझिक देणे, ई. गोष्टी आपण करू शकतो.
    त्यासाठी काही ऍप्स आहेत, जी वापरायला सोपी पण खूप प्रभावशाली आहेत.
फोटो एडिटिंग साठी
1) स्नॅपसीड (Snapseed):- फोटो एडिट करण्यासाठी हे एक उत्तम ऍप आहे. ह्या ऍप मध्ये खूप सोयी दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फोटोवर साधं एडिटिंग करू शकता किंवा अगदी किचकट एडिटिंग सुद्धा करू शकता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे ऍप एकदम फ्री आहे.
2) अडोब लाईटरूम (Adobe Lightroom):- कॉम्प्युटर वर फोटो एडिटिंग साठी अडोब फोटोशॉप आणि लाईटरूम ही दोन सॉफ्टवेअर्स खूप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ही ऍप्स मोबाईल फोटो एडिटिंग साठीही उपलब्ध आहेत.

व्हीडीओ एडिटिंग साठी
    व्हीडीओ एडिटिंग साठी Kine master, Filmorago, Viva video, ई ऍप्स उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये काही सोयी कमी जास्त आहेत. पण त्यांच्या कामाची एकूण पद्धत सारखीच आहे. ह्यामध्ये तुम्ही क्लिप्स एकत्र जोडणे, त्यांना इफेक्ट देणे, बॅकग्राउंड म्युझिक देणे, ई कामे करू शकता. अजून अशा बऱ्याच ऍक्सेसरीज आणि ऍप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या वापराने आपण खूप चांगले फोटो आणि व्हीडीओ तयार करू शकतो.
    सगळ्यांनाच ह्या गोष्टी लागतील असं नाही. त्यामुळे ज्यांना आपली फोटोग्राफी किंवा व्हीडीओग्राफी वरच्या पातळीवर न्यायची आहे, त्यांनी ह्या ऍक्सेसरीजचा आणि ऍप्सचा वापर नक्की करावा.
कारण ह्या सगळ्यांमुळे फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी करण्याची इच्छा वाढते, एवढं मात्र नक्की. 😃

भेटू पुढच्या पोस्टमध्ये. 🙂🙏


- प्रसन्न जोशी.

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

पुढची पोस्ट

पावसाळ्यात चांगले फोटो काढण्यासाठी

काय काय करावे


हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸





Comments

  1. वा! फारच छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

  2. मोबाईल वरून फोटो काढत असताना नॉर्मली फ्लॅश ऑन असायला हवा का? आणि फ्लॅश ऑन असेल तर डोळ्यात लाल रंगाचे छोटे डॉट दिसतात जास्तीत जास्त रात्री दिसतात.
    त्यासाठी काय करावे?
    केदार कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. मोबाईलवर फोटो काढताना फ्लॅश अगदी शेवटचा पर्याय ठेवावा. कारण कितीही झालं, तरी शेवटी फ्लॅश हा नैसर्गिक प्रकाश नाहीये. आणि लाल डोळ्यांचं म्हणाल, तर लेन्सच्या शेजारीच फ्लॅश असल्याने तसे होते. ते एडिटिंग मध्येच नीट करावे लागते. त्यासाठी दुसरा काही पर्याय नाहीये.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला