‘कॅमेर्यातील फोकस सिस्टिम’ कशी काम करते?
आपण नेहमी हे वाक्य ऐकतो, की 'आयुष्यात फोकस नीट असेल, तरच यश मिळतं'. हेच फोटोग्राफीमध्ये सुद्धा लागू होतं. प्रत्येक फोटोमध्ये जर फोकस योग्य असेल, तरच फोटो चांगला येतो. ह्याबद्दलच सविस्तर माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत. फोकस करणे म्हणजे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, त्या गोष्टीवर लक्ष देणे. फोटोग्राफी करताना समोरचं दृश्य, वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर लगेच आपल्याला ठरवायला लागतं, की ह्यातलं काय आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर फोकस कसा करायचा आहे, हेही ठरवावं लागतं. फोकस करणे ही क्रिया दोन प्रकारे करता येऊ शकते. मॅन्युअल फोकस (Manual focus) किंवा ऑटो फोकस (Auto focus) . त्याची सविस्तर माहिती आता बघुयात. मॅन्युअल फोकस (Manual Focus) आपण सर्वांनी भिंग वापरलं आहे. आपल्या हातातील भिंग आपण डोळ्यापासून तोपर्यंत लांब-जवळ करत राहतो, जोपर्यंत समोरची वस्तू आपल्याला पाहिजे तशी शार्प आणि मोठी दिसत नाही. लेन्समध्ये पण तेच होतं. जेव्हा आपण लेन्सची फोकस रिंग फिरवतो, तेव्हा आतल्या काचा/भिंगं...