एक्सपोजरचा त्रिकोण म्हणजे फोटोग्राफी चा पाया.
फोटो बघितल्या बघितल्या आवडण्यासाठी त्यात योग्य तेवढा प्रकाश असावा लागतो. आणि फोटोग्राफी मध्ये हेच शिकण्यासाठी भरपूर वेळ लागतो. बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने आपोआप मिळवता येतात. पण प्रत्येक वेळेला 'फोटोमधला प्रकाश' योग्य येण्यासाठी, फक्त फोटो काढणाऱ्यालाच प्रयत्न करावे लागतात.
ह्यालाच इंग्रजीत एक्सपोजर म्हणतात. कुठल्याही फोटोचे ह्या एक्सपोजर नुसार तीन भाग करता येतात. हायलाईट्स (Highlight), मिड टोन्स (midtones) आणि शॅडोज (shadows). या तिन्हींचा योग्य मेळ घालणे, म्हणजेच योग्य एक्सपोजर मिळवणे.
हायलाईट असलेले पिक्सेल हे पांढरा रंग किंवा उजळ (ब्राईट) भाग दर्शवतात, शॅडो असलेले पिक्सेल हे काळा रंग किंवा अंधार असलेला (डार्क) भाग दर्शवतात आणि ह्या दोन्हींचा मधला भाग हा मिडटोन्स म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ब्राईट आणि डार्क रंगांचा योग्य मेळ म्हणजे योग्य एक्सपोजर.
असं हे योग्य एक्सपोजर मिळवण्यासाठी आपल्याला प्रकाश नियंत्रित करता येणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपण कॅमेऱ्याच्या मॅन्युअल मोड मध्ये अगदी सहज करू शकतो. नावाप्रमाणेच, मॅन्युअल मोड म्हणजे सगळंच नियंत्रण आपल्याला करता येतं. कॅमेरा स्वतःहुन काहीही ठरवत नाही. त्यामुळे प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला हवं तसं एक्सपोजर मिळतं.
ह्या मॅन्युअल मोड मध्ये शटर स्पीड, अपर्चर आणि ISO ह्या तीन गोष्टी आपण बदलतो. ह्या तिन्हींमध्ये बदल केला तर त्याचा प्रकाशावर काय परिणाम होतो, हे आपण आधीच्या पोस्ट मध्ये बघितलं आहे. आधीच्या पोस्ट वाचल्या नसतील, तर इथे क्लिक करा.
पण थोडक्यात परत एकदा पाहुयात.
1) शटर स्पीड:- स्लो शटर स्पीड म्हणजे जास्त प्रकाश आणि वस्तू स्तब्ध करता येत नाहीत. आणि फास्ट शटर स्पीड म्हणजे कमी प्रकाश आणि वस्तू स्तब्ध करता येतात.
2) अपर्चर:- छोटं अपर्चर (f11, f16, f22, ई.) म्हणजे कमी प्रकाश आणि जास्त भाग फोकस मध्ये असतो. आणि मोठं अपर्चर (f1.4, f2, f2.8, ई.) म्हणजे जास्त प्रकाश आणि बॅकग्राऊंड ब्लर होतं.
3) ISO:- कमी ISO म्हणजे कमी प्रकाश पण खरखर सुद्धा कमी. आणि जास्त ISO म्हणजे जास्त प्रकाश पण खरखर सुद्धा जास्त.
आता प्रकाश किती कमी आहे किंवा किती जास्त आहे, हे मोजायचं कसं? तर त्यासाठी 'लाईट स्टॉप' ही संकल्पना वापरली जाते. योग्य एक्सपोजरसाठी प्रकाश मोजताना तो लाईट स्टॉप मध्ये मोजला जातो. म्हणजे 1 स्टॉप लाईट जास्त आहे, 2 स्टॉप लाईट कमी आहे, ई.
आपण जेव्हा जेव्हा शटर स्पीड, अपर्चर आणि ISO ह्यातलं काहीही बदलतो, तेव्हा फोटोमध्ये येणारा प्रकाश हा ह्या लाईट स्टॉप च्या पटीत कमी जास्त होतो. त्यामुळे मॅन्युअल मोड मध्ये ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्र विचार करावा लागतो, ज्याला एकत्रितपणे 'एक्सपोजर ट्रायअँगल' म्हणजेच एक्सपोजरचा त्रिकोण म्हणतात. हा त्रिकोण खाली दिलेला आहे, तेवढा नीट समजून घ्या, कारण ह्याच्यावरच सगळं अवलंबून आहे.
जेव्हा आपल्याला लाईट 1-2 स्टॉपने वाढवायचा किंवा कमी करायचा असेल, तेव्हा शटरस्पीड, अपर्चर आणि ISO मध्ये काय बदल करावा लागतो, हे आता आपण बघुयात.
1) शटरस्पीड:- एक एक स्टॉप ने लाईट बदलण्यासाठी शटर स्पीड दुपटीने कमी किंवा जास्त करावा लागतो. म्हणजे 1/100 ला असलेला प्रकाश एक स्टॉप ने वाढवायचा असेल, तर शटर स्पीड 1/50 करावा लागेल.
2) अपर्चर:- अपर्चर च्या काही ठरलेल्या किंमती आहेत, त्यानुसार बदल केले की लाईट एक एक स्टॉप ने कमी जास्त होतो. म्हणजे 'f1.4, f2, f2.8, f4, f5.6, f8, f11, f16, f22' ह्या अपर्चरच्या ठरलेल्या किंमती आहेत. त्यामुळे आपण f2.8 वरून f4 वर गेलो, तर एक स्टॉप नी प्रकाश कमी होईल.
3) ISO:- आपण ISO ची किंमत दुप्पट करत गेलो, की लाईट एक एक स्टॉप ने वाढत जातो. म्हणजे जर आपण 100 वरून 200 आणि 200 वरून 400 ISO वर गेलो, तर प्रकाश दोन स्टॉपने वाढला असं आपण म्हणू शकतो.
प्रत्येक लाईट स्टॉप वर जाण्यासाठी ह्या तिन्ही सेटिंग मध्ये काय काय बदल करावा लागतो, हे खालचा फोटो बघून तुम्हाला समजेल. खाली फक्त उदाहरण म्हणून 7 लाईट स्टॉप साठी सेटिंग दिलेली आहेत.
रोजच्या वापरातील उदाहरणे
आता आपण लाईट स्टॉप च्या माहितीचा वापर फोटो काढताना कसा करायचा, ते 3 उदाहरणांच्या मदतीने समजावून घेऊयात.
उदाहरण 1:- आपल्याला फोटो मधला प्रकाश तेवढाच ठेऊन त्यातला ब्लर वाढवायचा आहे.
वरच्या पहिल्या फोटो मध्ये आपण बघतोय की, थोडं पुढे मागे ठेवलेल्या 2 बाहुल्यांचा फोटो काढलेला आहे. एक्सपोजर बरोबर आहे, पण ह्यामध्ये आपल्याला फक्त समोरच्या बाहुलीवर फोकस करायचा आहे आणि मागची बाहुली ब्लर करायची आहे. आणि हे करताना एक्सपोजर पण योग्य राहीलं पाहिजे.
ह्या फोटो मध्ये अपर्चर आहे f5.6. त्यामुळे आता ब्लर वाढवण्यासाठी आपल्याला अपर्चर f2 पर्यंत आणावे लागेल. पण हे करताना आपला प्रकाश 3 स्टॉप वाढला (f5.6 ते f4, f4 ते f2.8 आणि f2.8 ते f2). म्हणून तो कमी करण्यासाठी आता आपण शटर स्पीड फास्ट करु शकतो किंवा ISO कमी करू शकतो.
पण शटर स्पीड फास्ट करून इथे काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा ISO कमी केला, तर फोटो अजून क्लियर आणि शार्प होईल. त्यामुळे आपण आत्ताचा ISO 6400 वरून कमी करून 800 केला आहे आणि प्रकाश 3 लाइट स्टॉप ने कमी केला आहे (6400 ते 3200, 3200 ते 1600, 1600 ते 800), जेणेकरून नवीन फोटोचं एक्सपोजर आधीच्या फोटोएवढंच रहावं. ह्यासाठी वरचा दुसरा फोटो पहा.
उदाहरण 2:- फोटोमध्ये हलणारी बाहुली स्तब्ध करायची आहे आणि ब्लर सुद्धा तेवढाच ठेवायचा आहे.
वरच्या पहिल्या फोटो मध्ये आपण बघतोय, की स्प्रिंग लावलेली बाहुली हलत असताना काढलेला फोटो ब्लर आला आहे, कारण शटर स्पीड 1/50 एवढा स्लो आहे. आता आपल्याला ह्या हलणाऱ्या बाहुलीला स्तब्ध करायचं आहे, तर आपण शटर स्पीड अंदाजे 1/200 ठेऊयात. पण हे करताना प्रकाश 2 स्टॉप ने कमी होणार आहे. (1/50 ते 1/100 आणि 1/100 ते 1/200).
त्यामुळे हा प्रकाश पुन्हा 2 स्टॉप ने वाढवण्यासाठी आपल्याला एकतर अपर्चर मोठं करावं लागेल किंवा ISO वाढवावा लागेल. पण इथे आपल्याला ब्लर तेवढाच ठेवायचा असल्यामुळे आपण अपर्चर बदलू शकत नाही. त्यामुळे आपण आत्ताचा ISO 800 वरुन वाढवून 3200 केला आहे आणि प्रकाश 2 स्टॉप ने वाढवला आहे (800 ते 1600 आणि 1600 ते 3200). जेणेकरून आपल्याला दोन्ही फोटो मध्ये एकच एक्सपोजर मिळालं आहे.
उदाहरण 3:- बाहुली स्तब्ध केली आहे आणि ब्लर पण हवा तेवढा ठेवला आहे. पण फोटोत अंधार आहे.
वरच्या पहिल्या फोटोत आपण बघू शकतो, की हलणारी बाहुली स्तब्ध करण्यासाठी आपण शटर स्पीड 1/200 ठेवलेला आहे आणि हवा तेवढा ब्लर मिळवण्यासाठी अपर्चर f2 एवढं ठेवलं आहे. पण फोटोमध्ये प्रकाश कमी आहे.
आता प्रकाश वाढवण्यासाठी 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे, आपण शटर स्पीड स्लो करू शकतो, पण त्यामुळे बाहुलीचा हललेला फोटो येईल. किंवा दुसरा पर्याय म्हणजे आपण अपर्चर मोठं करू शकतो. पण ह्या लेन्समध्ये f2 पेक्षा मोठं अपर्चर उपलब्ध नाहीये आणि आपल्याला ब्लर पण एवढाच पाहिजे, वाढवायचा नाहीये.
त्यामुळे आपल्याकडे फक्त तिसरा पर्याय उरतो, तो म्हणजे ISO वाढवणे. म्हणून आपण आत्ताचा ISO 800 वरुन वाढवून 3200 केला आहे आणि प्रकाश 2 स्टॉप ने वाढवला आहे (800 ते 1600 आणि 1600 ते 3200), ज्यामुळे फोटोमध्ये प्रकाश वाढून आपल्याला योग्य एक्सपोजर मिळेल. वरचा दुसरा फोटो हा नवीन सेटिंगनुसार घेतलेला आहे.
ही फक्त 3 उदाहरणे झाली. पण रोजच्या आयुष्यात आपण फोटो काढताना समोरच्या वस्तू/व्यक्ती वेगवेगळ्या असतात, प्रत्येक फोटोची गरज वेगवेगळी असते, फोटो काढण्याची वेळ वेगवेगळी असते, कॅमेरा आणि लेन्स वेगवेगळे असतात आणि अजून बरेच काही बदल असतात. म्हणून प्रत्येक फोटोसाठी त्या वेळेला योग्य ठरतील अशी सेटिंग करावी लागतात.
त्यामुळे ह्या सगळ्या सेटिंगवर तुमचं प्रभुत्व असेल, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आणि कुठलाही लेन्स-कॅमेरा वापरून चांगले फोटो काढू शकता.
दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे, जेव्हा तुम्हाला ही सेटिंग पूर्ण पणे आत्मसात झालेली असतात, तेव्हा प्रत्येक वेळेला फोटो काढताना तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. आणि तो च आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या फोटोग्राफी मध्ये वरच्या स्तरावर घेऊन जायला मदत करतो.
खोलात जाऊन विचार केला, तर त्रिकोण हा भूमितीतला एक असा आकार आहे, ज्यामध्ये एका बाजूमध्ये काही बदल झाला, तर स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी बाकीच्या 2 बाजूंमध्येही बदल करावा लागतो. एक्सपोजरचेही तसंच आहे. शटर स्पीड, अपर्चर आणि ISO ह्यापैकी काहीतरी एक जरी बदललं, तर एक्सपोजर तसंच ठेवण्यासाठी बाकीच्या दोन्हींमध्ये बदल करावे लागतात.
म्हणूनच 'शटर स्पीड, अपर्चर आणि ISO' ह्या तीन गोष्टींचा परस्परसंबंध दाखवण्यासाठी त्रिकोण हा सगळ्यात उत्तम आणि योग्य पर्याय आहे.
आणि ह्यामुळे त्याचं 'एक्सपोजरचा त्रिकोण' हे नाव सार्थकी लागतं.
एकदम बॅलन्स्ड.
- प्रसन्न जोशी.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
' व्हीडीओ ची ओळख'
व्हीडीओ म्हणजे नक्की काय?
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸






हंम्!🤔🤔🤔 थोडक्यात म्हणजे फोटोग्राफी वाटते तितकी सोपी नाही! समोर एखादी घटना घडत असताना ही सगळी सेटींगस् पटापट आणि बिनचूक जमायला हवीत!!
ReplyDeleteअगदी बरोबर.
DeleteVery Good information prassana.
ReplyDeleteMeans in a photo focus control ed by appurture ,brightness controlled by iso and stillness{sharpness}controlled by shutter speed. & Overall exposure light , we have to control by combination of all these 3.
अगदी बरोबर. पण अपर्चर मोठं करून आणि शटर स्पीड स्लो करूनसुद्धा आपण जास्त प्रकाश ठेऊ शकतो.
Deleteजशी परिस्थिती असेल, तशी सेटिंग करावी. 🙂
सहज सोप्प्या भाषेत समजावून सांगितलंत...👌👍
ReplyDeleteडॉ हरीष ऋषि
धन्यवाद सर 🙏🙂
DeleteKhup chan sir
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙂
Delete