लेन्स अपर्चर - कॅमेर्याची बाहुली
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)
निसर्गासारखा चमत्कार कुणीही करू शकत नाही. आपला डोळा हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. एवढ्याशा अवयवामध्ये किती संवेदनशीलपणा आहे बघा ना. समोरून येणारा प्रकाश कमी जास्त झाला, की त्याप्रमाणे लगेच आपल्या डोळ्यामधली बाहुली लहान मोठी होते. हे एवढ्यासाठी, की सतत गरज असेल तेवढाच ठराविक प्रकाश डोळ्यातून आत यावा आणि समोरचं दृश्य दिसत रहावं म्हणून. कॅमेऱ्याच्या बाबतीत हे काम लेन्स मधील अपर्चर करतं. ह्याचीच माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत.
अपर्चर म्हणजे लेन्स च्या मागच्या भागात पातळ पात्यांनी बनवलेली एक उघडी जागा, जी आपल्याला गरजेनुसार लहान-मोठी करता येते. खालच्या फोटो मध्ये आपण लेन्सचं अपर्चर आणि अपर्चर ब्लेडस (सरकवता येणारी पाती) बघू शकतो.
फोटोग्राफीच्या क्षेत्रात अपर्चर ची किंमत ही 'f' नी दर्शवतात. म्हणजे f2.8, f4, f5.6, etc. 'f' च्या पुढील किंमत ही '1 च्या छेदात' असते. म्हणजे f4 म्हणजे f(1/4), f2.8 म्हणजे f(1/2.8), ई. त्यामुळे f ची ही किंमत जेवढी छोटी तेवढं अपर्चर मोठं आणि ही किंमत जशी वाढत जाते (f13, f16,f22) तसं अपर्चर छोटं होत जातं.
ह्याचा वापर एकूण 2 प्रकारे करता येतो.
1) जास्त प्रकाश सेन्सरवर पाडण्यासाठी:- अपर्चरचा अर्थच 'उघडी जागा' असा असल्यामुळे, जेवढं अपर्चर मोठं तेवढी ही उघडी जागा मोठी आणि तेवढाच जास्त प्रकाश सेन्सरवर पडेल. तसंच अपर्चर छोटं असेल तर कमी प्रकाश आत येईल.
त्यामुळे जेव्हा फोटो काढताना आपल्याला नको असताना बाहेर खूप जास्त प्रकाश उपलब्ध असेल, तेव्हा तो सेन्सरवर कमी पडावा ह्यासाठी अपर्चर छोटं करता येतं. तसंच जास्त प्रकाश पाहिजे असेल तर अपर्चर मोठं करता येतं. अशाने आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रकाशात फोटो काढता येतो.
2) बॅकग्राउंड ब्लर करण्यासाठी:- फोटोमध्ये मागचं सगळं ब्लर दिसलं पाहिजे, अशी खूप जणांची इच्छा असते. अपर्चर वापरून ते करता येतं. ब्लर करण्यासाठी काय केलं जातं, तर कमी रुंदीच्या पट्ट्यात फोकस केलं जातं. ह्या पट्ट्याला फोकस प्लेन (Focus plane) म्हणतात. अपर्चर वापरून आपल्याला ह्या पट्ट्याची रुंदी कमी जास्त करता येते.
अपर्चर ची किंमत जेवढी कमी (f1.8, f2.8, ई), तेवढं अपर्चर मोठं आणि फोकस प्लेन ची रुंदी कमी असते, म्हणजेच ब्लरचा जास्त इफेक्ट बघायला मिळतो. ह्यामुळेच आपल्याला फोटोमधल्या मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करता येतं आणि बाकीचं सगळं ब्लर करता येतं.
अपर्चर ची किंमत जेवढी जास्त (f16, f22, f32, ई.), तेवढं अपर्चर लहान आणि फोकस प्लेन ची रुंदी जास्त, म्हणजे फोटोचा जास्त भाग फोकस मध्ये असेल.
हे नीट समजून घेण्यासाठी खालील फोटो बघा.
त्यामुळे मोठ्या अपर्चर ची लेन्सेस ही प्रामुख्याने पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait photography) मध्ये वापरली जातात आणि लहान अपर्चरची लेन्सेस ही प्रामुख्याने लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography) साठी वापरली जातात.
ह्या दोन्ही गोष्टी फोटो काढताना महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच हल्ली मोबाईल मध्ये सुद्धा 'f1.8' अपर्चर असलेला फ्रंट कॅमेरा, f2.8 अपर्चर असलेला मागचा कॅमेरा अशी जाहिरात करतात. तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात केवढं अपर्चर आहे हे बघण्यासाठी, मोबाईल मध्ये काढलेला कुठलाही फोटो उघडा आणि त्याच्या प्रॉपर्टी मध्ये माहिती बघा. 'Aperture: 2.0' असं काहीतरी लिहिलेलं असेल. तीच आहे तुमच्या मोबाईल कॅमेराच्या अपर्चर ची किंमत.
अपर्चर ची बांधणी
अपर्चर हे लेन्सच्या मागच्या भागात बसवलेले असते. त्यामध्ये एकमेकांवर सरकणारी पातळ पाती असतात, जी वापरून आपल्याला अपर्चर लहान मोठं करता येतं. वर दिलेल्या फोटो मध्ये हे स्पष्ट दिसत आहे.
अपर्चर बदलण्याची क्रिया ही आत्ताच्या लेन्सेस आणि कॅमेरामध्ये डिजिटली करता येते. म्हणजे जेवढं अपर्चर पाहिजे, तेवढी किंमत कॅमेरामध्ये सेट केली, की फोटो काढताना आपोआप अपर्चर तेवढ्या आकाराचं होतं आणि नंतरच फोटो निघतो.
डिजिटल कॅमेऱ्याच्या आधीच्या काळात, लेन्सेस मध्ये फोकस आणि झूम रिंग बरोबरच अपर्चर रिंग पण दिलेली असायची, जी वापरुन आपल्याला अपर्चर लहान मोठं करता येईल. आजकालही काही मॅन्युअल लेन्सेस मध्ये अशी अपर्चर रिंग बघायला मिळते, ज्यामुळे लेन्सची किंमत कमी ठेवायला मदत मिळते.
बोके इफेक्ट (Bokeh effect)
बॅकग्राउंड ब्लर केल्यावर मागच्या भागात जे विविध रंगांचे गोळे दिसतात, त्यांना बोके (Bokeh) म्हणतात. अपर्चर च्या पात्यांनी तिथे ज्या आकाराची रिकामी जागा तयार होते, त्याच आकाराचा बोके मागे दिसतो. म्हणजे अपर्चर ला सात पाती असतील, तर मागे दिसणारा बोके हा सप्तकोनांच्या आकारातच दिसतो. ह्यासाठी खालचा फोटो पहा. हा मॅक्रो लेन्स ने काढलेला फोटो आहे, ज्यामध्ये अपर्चर सात पात्यांनी बनलेलं आहे. म्हणून फोटोच्या ब्लर झालेल्या भागामध्ये विविध रंगांचे सप्तकोनी छोटे मोठे बोके दिसत आहेत.
त्यामुळे डोळ्यांना सगळ्यात छान दिसणारा असा गोलाकार बोके मिळवण्यासाठी अपर्चर मध्ये 9 किंवा त्यापेक्षा जास्त पाती असली पाहिजेत. अशा गोलाकार बोके ला 'बोके बॉल्स' (Bokeh balls) पण म्हणतात.
असा हा खूप जास्त ब्लर चा इफेक्ट मिळवायचा असेल तर प्रत्येक लेन्स मध्ये जास्तीत जास्त मोठं अपर्चर (रिकामी जागा) ठेवायला पाहिजे. पण त्यासाठी लेन्स चा आकार पण वाढवायला लागेल. अशा वेळेला चांगले फोटो येण्यासाठी लेन्समध्ये चांगल्या आणि मोठ्या आकाराच्या काचा/भिंग वापरायला लागतील, ज्यामुळे लेन्सचा आकार आणि वजन दोन्हीही वाढेल.
शिवाय एवढ्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन लेन्स बनवताना खूप जास्त तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सध्या जगात सर्वात मोठं अपर्चर उपलब्ध आहे ,ते म्हणजे 'f0.95'. पण त्यासाठी 5-6 लाख एवढी किंमत मोजावी लागते.
'f0.95' एवढ्या अपर्चर मुळे किती ब्लर करता येत असेल, हे कळण्यासाठी एवढंच सांगतो, की ह्या लेन्सने जर एखाद्याचा पोर्ट्रेट फोटो काढला, तर त्याच्या डोळ्याची बाहुली फोकस मध्ये असेल, तर डोळ्याच्या पापण्या ब्लर/आउट ऑफ फोकस असतील. त्यामुळे एवढे पैसे खर्च करून घेतलेलं लेन्स, प्रत्येक ठिकाणी सुद्धा वापरता येणार नाही.
अशा काही मोठं अपर्चर असलेल्या लेन्सेस ची लिंक खाली देत आहे. तुम्हाला ती लेन्सेस बघायची असतील किंवा घ्यायची असतील, तर त्या लिंक वर क्लिक करा.
ह्याची दुसरी बाजू अशी, की अपर्चर मोठं करण्यावर जेवढ्या मर्यादा आहेत, तेवढ्या ते छोटं करण्यावर नाहीत. त्यामुळे कुठल्याही लेन्स मध्ये छोट्यात छोटं अपर्चर हे 'f22' एवढं असतं. काही काही लेन्स मध्ये तर अपर्चर 'f32' एवढं लहान सुद्धा करता येतं.
तर, असं हे प्रकाश कमी जास्त करता येणारं आणि ब्लर चा इफेक्ट देणारं अपर्चर, फोटोग्राफी मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतं. व्हीडीओग्राफी मध्येही अपर्चरचा चांगला उपयोग होतो. तो विषय पुढच्या कुठल्यातरी पोस्ट मध्ये बघू.
धन्यवाद.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
' शटर प्रणाली '
प्रकाशासाठी कॅमेर्यातला दरवाजा
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸




छान माहिती!👌🏻👌🏻
ReplyDelete😀🙏
DeleteNice.. .
ReplyDelete👍🏻
Delete