फोटोग्राफीचे प्रकार - किती व कोणते?

Types of photography

'तो सध्या काय करतो?' 

असा प्रश्न जेव्हा काही लोक माझ्या घरच्यांना विचारतात, तेव्हा 'फोटोग्राफी करतो.' असं उत्तर त्यांना मिळतं. पण विचारणारे तेवढ्यावर थांबत नाहीत हो. पुढचा प्रश्न तयार असतो, 'म्हणजे नक्की काय करतो? वाइल्ड लाईफ फोटोग्राफी का वेडिंग फोटोग्राफी?' फोटोग्राफी ही एवढ्या दोनच प्रकारची आहे असं 90% लोकांना पहिल्या फटक्यात वाटतं, याचं मला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून तोच गैरसमज आज आपण दूर करणार आहोत.  🙂

  आधीच्या काळात अगदी मोजकेच प्रकार होते. पण म्हणतात ना 'मागणी तसा पुरवठा'. त्यामुळे जसजशी गरज वाढत गेली, तसतसे फोटोग्राफीचे प्रकार पण वाढत गेले. आणि आता तर कित्येक जण फक्त एकाच प्रकारची फोटोग्राफी करतात आणि त्यात अगदी तज्ञ होतात. तर बघुयात की कोणकोणते प्रकार आहेत फोटोग्राफी मध्ये. 

1. वाइल्ड लाईफ फोटोग्राफी (Wild life photography)

Leopard in wild life photograph

1. म्हणजे काय:- वाइल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे 'वन्यजीव आणि त्यांचे जीवन' टिपणे. यामध्ये प्राण्यांचे/पक्ष्यांचे भाव, त्यांच्या हालचाली, त्यांचं राहणीमान, त्यांच्यातील युद्ध, ई. गोष्टी टिपतात. 

2. चांगलं काय:- ह्या प्रकारात प्राण्यांच्या जवळ जावं लागतं त्यामुळे जंगले, डोंगर, पाणथळ जागा, इ. ठिकाणी फिरावं लागतं. अशावेळेला मानवाचा स्पर्श न झालेला निसर्ग अनुभवायला मिळतो. तसंच निसर्ग आणि त्याचं काम किती कमाल आहे, हे बघायला मिळतं.

3. वाईट काय:- निर्जन ठिकाणी जावं लागत असल्यामुळे थोडा धोका सदैव असतोच. आपल्या जगात मिळणाऱ्या सोयी-सुविधा तिथे शक्यतो मिळत नाहीत. कमी झोप, अनियमित वेळापत्रक, असे शारीरिक कष्ट सोसावे लागतात. शिवाय ह्यासाठी लागणारी लेन्सेस महाग असतात. 

4. काय लागतं:- कमी प्रकाशात चांगले फोटो काढू शकेल असा कॅमेरा (शक्यतो मोठा सेन्सर असलेला फुल फ्रेम कॅमेरा), जास्त झूम असलेली लेन्सेस (सुपर टेलीफोटो लेन्सेस) आणि भरपूर वजन सांभाळू शकेल असा एकदम मजबूत आणि स्थिर ट्रायपॉड.

 2. इव्हेंट फोटोग्राफी (Event photography)

People enjoying in the party or concert

1. म्हणजे काय:- कुठलाही कार्यक्रम असो, त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी फोटो काढणे म्हणजे इव्हेंट फोटोग्राफी. ह्यामध्ये गॅदरिंग, कॉन्सर्ट, गेट टुगेदर, वाढदिवस, इ कार्यक्रमांचा समावेश होतो. 

2. चांगलं काय:- असे कार्यक्रम वरचेवर होत असतात, त्यामुळे हा कमाईचा चांगला स्रोत आहे. ह्यासाठी साधा कॅमेरा व लेन्स वापरून सुद्धा फोटोग्राफी करता येते. 

3. वाईट काय:- ह्यात फोटोग्राफीची कलाकारी दाखवण्याची फार जागा नसते. त्यामुळे साधं काम करायचं असतं, आणि म्हणून प्रत्येक कामासाठी थोडेच पैसे मिळतात. 

4. काय लागतं:- साधा कॅमेरा (फुल फ्रेम किंवा क्रॉप फ्रेम कॅमेरा), कॅमेऱ्याबरोबर मिळणारं किट लेन्स आणि एक फ्लॅश सुद्धा ह्या कामांसाठी पुरेसा आहे. जर स्पेशल मोठा कार्यक्रम असेल, तर त्या वेळेला टेलीफोटो लेन्स आणि अतिरिक्त फ्लॅश लागू शकतात.  

3. वेडिंग फोटोग्राफी (Wedding Photography)

Bride and groom in Indian wedding ceremony

1. म्हणजे काय:- नावाप्रमाणेच, लग्नाचे आणि साखरपुड्याचे संपूर्ण फोटो काढणे हे ह्या प्रकारात मोडते. लग्न हा एवढा मोठा सोहळा असतो, की त्या मध्ये विधींचे फोटो तर येतातच, पण थोडीफार पोर्ट्रेट फोटोग्राफी (नवरा-नवरी, भाऊ बहीण आणि नातलग यांचे फोटो), प्रॉडक्ट फोटोग्राफी (एंगेजमेंट रिंग, नवरानवरीचे पोशाख याचे फोटो),फॅशन फोटोग्राफी (विविध पोशाख, दागिने घातलेल्या व्यक्ती यांचे फोटो) ह्याचीही झलक दिसते. 

2. चांगलं काय:- कलाकारी आणि कल्पकता दाखवायला पूर्ण वाव असतो. तुमची स्वतःची अशी एक विशिष्ट शैली तयार करू शकता. एकदा का तुमचं नाव मोठं झालं, की वेडिंग सिझन मध्ये प्रचंड काम उपलब्ध आहे. पैसाही प्रचंड आहे. म्हणजे दिवसाला अगदी 25,000 पासून 5,00,000 पर्यंत घेणारे फोटोग्राफरसुद्धा आहेत. (अर्थात तेवढे पैसे एकट्याला मिळत नाहीत, टीम मध्ये काम करावं लागतं, त्यामुळे मिळणारे पैसे सर्वांमध्ये विभागले जातात.) 

3. वाईट काय:- प्रचंड टाईट शेड्युल, नेहमी सतर्क रहावं लागतं (एखादा फोटो काढायचा राहिला की राहिलाच...चुकीला माफी नाही)चांगल्या दर्जाच्या कामासाठी कॅमेरा, लेन्स आणि लायटिंग इक्विपमेंट मध्ये खूप पैसे गुंतवावे लागतात.  सगळी प्रोसेस खूप मोठी असल्यामुळे लगेच सगळे पैसे मिळतात, असं होतं नाही. बराच वेळ लागू शकतो.

4. काय लागतं:- अगदी चांगलं काम अपेक्षित असेल, तर जेवढं वापरता येईल तेवढं सगळंच लागतं(अर्थात क्लायंटच्या बजेटनुसार)...एक मुख्य कॅमेरा, एक बॅकअप कॅमेरा, वाईड लेन्स, स्टँडर्ड लेन्स, टेलीफोटो लेन्स, कमीत कमी 2 फ्लॅश, लाईट मॉडीफायर्स, स्टँडस, वगैरे.  

4. फॅशन फोटोग्राफी (Fashion Photography)

Man tying tie knot during fashion photoshoot

1. म्हणजे काय:- एखाद्या कंपनीचे नवीन आकर्षक पेहराव आणि बाकीच्या ऍक्सेसरीज यांची जाहिरात करण्यासाठी करतात, ती म्हणजे फॅशन फोटोग्राफी. ह्यामध्ये मॉडेल्स च्या मदतीने त्या कपड्यांना किंवा वस्तूंना छान आफर्षक रित्या दाखवलं जातं, जेणेकरून ते घेण्याची लोकांची इच्छा होईल. 

2. चांगलं काय:- शक्यतो स्टुडियो मध्ये काम असल्यामुळे, आपल्या वेळेनुसार पाहिजे तसा सेटअप करून फोटोग्राफी करता येते. कालांतराने नाव झाल्यावर ह्यात खूप पैसे मिळतात. 

3. वाईट काय:- ठराविक मोठ्या शहरात ही कामं असतात आणि ती मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. शिवाय स्टुडियो, त्यातले लाईट्स, सर्व सेटअप ह्यात खूप पैसे गुंतवावे लागतात.

4. काय लागतं:- बऱ्यापैकी चांगला कॅमेरा (क्रॉप सेन्सर सुद्धा चालेल)स्टँडर्ड लेन्सटेलीफोटो लेन्स, लायटिंग सेटअप हे लागतं. शिवाय रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, ह्यासाठी त्या त्या विषयातल्या माणसांची मदत लागते. 

5. पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait Photography)

Man giving a look during portrait shoot

1. म्हणजे काय:- माणसांचे फोटो काढणे. ह्यामध्ये मानवी चेहऱ्यावरचे हावभाव, चेहऱ्याची वैशिष्ट्ये, त्या माणसाची एखादी ठराविक स्टाईल, ई. गोष्टी ठळकपणे दाखवतात.

2. चांगलं काय:- कलाकारी आणि कल्पकता दाखवायला पूर्ण वाव आहे. आपल्या वेळेनुसार काम करता येते. लोकांना स्वतःचे फोटो काढून घ्यायला आवडतात. त्यामुळे हे कसब आत्मसात केलं, की मग चांगलं उत्पन्न देणारी कामे मिळू शकतात.

3. वाईट काय:- चांगलं उत्पन्न देणारी खूप मर्यादित कामे असतात. लायटिंगचं खूप सखोल ज्ञान लागतं. प्रत्येक फोटोमागे काहीतरी विचार ठेवावा लागतो, जेणे करून जी व्यक्ती खऱ्या आयुष्यात जशी आहे, तशीच फोटोमध्ये सुद्धा दिसावी (एखादी विनोदी स्वभावाची व्यक्ती फोटो मध्ये सुद्धा तशीच दिसायला हवी.)

4. काय लागतं:- थोड्या चांगल्या दर्जाचा कॅमेरा, शॉर्ट टेलीफोटो किंवा टेलीफोटो लेन्स, (इनडोअर फोटोग्राफी करणार असाल तर) लाईट सेटअप, लाईट मॉडीफायर.  

6. फूड फोटोग्राफी (Food Photography)

Mouthwatering Cupcakes in a food photography

1. म्हणजे काय:- तयार किंवा कच्च्या खाद्यपदार्थांचे आकर्षक रित्या फोटो काढणे म्हणजे फूड फोटोग्राफी. ह्यामध्ये अन्नपदार्थ फोटोमध्ये अशा प्रकारे दाखवले जातात, की त्यांचा रंग, आकार, पोत, ई. बाबी आहेत तशा दिसाव्यात पण त्याच बरोबर बघणाऱ्याला हव्याहव्याशा वाटाव्यात.

2. चांगलं काय:- कलाकारी आणि कल्पकता दाखवायला खूप वाव आहे. तुमच्या वेळेनुसार काम करता येते. आजच्या नाविन्याच्या काळात आणि जाहिरातीच्या युगात, ह्याची मागणी वाढत आहे.

3. वाईट काय:- मागणी जरी वाढत असली, तरी अजून म्हणावं तेवढा वाव नाहीये. आणि 70% वेळेला मोबाईल वर फोटो काढून सुद्धा काम होत असल्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवून देणारी कामं भारतात तशी कमी आहेत. पण ह्याच्याकडे गंभीरतेने बघण्याचं प्रमाण आता हळूहळू वाढतंय. 

4. काय लागतं:- साधा DSLR /mirrorless कॅमेरा, एक किट लेन्स आणि एक शॉर्ट टेलीफोटो लेन्स, फ्लॅश किंवा लाईट सेटअप असेल तर उत्तम (नाहीतर नैसर्गिक प्रकाशात सुद्धा फोटो काढू शकतो.) 

7. मॅक्रो फोटोग्राफी (Macro Photography)

Water droplet on a leaf using macro photography

1. म्हणजे काय:- स्पेशल लेन्स वापरून साध्या डोळयांना छोट्या दिसणार्‍या वस्तूंचे फोटो काढून त्या मोठ्या दाखवणे, म्हणजे मॅक्रो फोटोग्राफी. 

चांगलं काय:- रोज दिसणाऱ्या वस्तू, फुलं, कीटक हे नवीन आणि आकर्षक पद्धतीने दिसतात. कधीही न बघितलेले असे फोटो आपण काढू शकतो, जे लोकांना बघायला आवडतात.

3. वाईट काय:- फोटो काढण्यासाठी थीम/विषय सापडणे अवघड असते. असे फोटो काढताना खूप सहनशक्ती लागते. लायटिंग चांगलं लागतं. पैशासाठी म्हणून मॅक्रो फोटोग्राफी करायची म्हणली, तर आपल्या देशात त्याचा सध्या तरी कमी वाव आहे. 

4. काय लागतं:- क्रॉप किंवा फुल फ्रेम कॅमेरा, स्पेशल मॅक्रो लेन्स, लायटिंग साठी फ्लॅश, स्थिर आणि मजबूत ट्रायपॉड,ई.  

8. ट्रॅव्हल फोटोग्राफी (Travel Photography)

Girl tourist taking picture during travel photography

1. म्हणजे काय:- वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले फोटो काढणे म्हणजे ट्रॅव्हल फोटोग्राफी. तिथली जीवनशैलीतिथल्या जागा, तिथला एखादा खास कार्यक्रम, वगैरे फोटो ह्यामध्ये काढले जातात. हे फोटो ट्रॅव्हल ब्लॉग, मासिके, वेबसाईट ई. मध्ये लागतात. 

2. चांगलं काय:- खूप फिरायला मिळतं, नवनवीन जागा बघायला मिळतात, विविध खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. फिरता फिरता पैसे मिळवण्याचा हा चांगला पर्याय आहे. 

3. वाईट काय:- ह्यामध्ये काम करताना सुरुवातीला स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. सारखं फिरावं लागत असल्यामुळे, मोजक्या वस्तू घेऊन प्रवास करावा लागतो. वेळप्रसंगी कुठल्याही परिस्थितीत राहण्याची तयारी असावी लागते.

4. काय लागतं:- ह्यासाठी चांगल्या दर्जाचा मोबाईलसुद्धा चालतो (साहजिकच त्यात काही बंधनं येणार). नाहीतर साधा कॅमेरा आणि 2-3 प्रकारचे फोटो घेण्यासाठी 2-3 वेगवेगळी लेन्सेस एवढंच लागतं.  

9. लँडस्केप फोटोग्राफी (Landscape Photography)

Landscape photo with sunset or sunrise and a tree

1. म्हणजे काय:- निसर्गाचे सौंदर्य आणि विविध पैलू दाखवणारे फोटो काढणे म्हणजे लँडस्केप फोटोग्राफी. ह्यासाठी अशा जागा शोधाव्या लागतात की जिथून जास्तीत जास्त मोहक असे फोटो काढता येतील. शिवाय फोटो काढण्यासाठी काही ठराविक वेळाच निवडाव्या लागतात.

2. चांगलं काय:- ज्यांना निसर्गाची आणि फिरायची आवड आहे, त्यांच्यासाठी हे चांगलं क्षेत्र आहे. एकापेक्षा एक अशी सुंदर दृश्य बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी नवीन अनुभव मिळतो.

3. वाईट काय:- अतिशय वेगळं आणि ठराविक असं वेळापत्रक पाळावं लागतं आणि खूप तयारी करावी लागते. म्हणजे एखाद्या जागेवरून एखादा सूर्योदय टिपायचा असेल, तर खूप लवकर उठणे, आवरणे, त्या ठिकाणी प्रवास करून जाणे, तिथं पोहोचल्यावर सेटअप करणे, वगैरे. आणि हे सगळं कशासाठी तर 2-3 फोटोंसाठी.  

4. काय लागतं:- चांगला कॅमेरा, वाईड अँगल, स्टँडर्ड आणि टेलीफोटो अशी तीनही लेन्सेस, स्थिर आणि मजबूत ट्रायपॉड आणि काही फिल्टर. 

10. आर्किटेक्चर फोटोग्राफी (Architecture Photography)

Cool attractive building exterior using architecture photography

1. म्हणजे काय:- कुठल्याही वास्तू (हॉटेल, क्लब, रिसॉर्ट, घरं, बंगले, ई) बाहेरून किंवा आतून कशा दिसतात, हे दाखवणारे फोटो काढणे म्हणजे आर्किटेक्चर फोटोग्राफी. ह्यामध्ये ती वास्तू किती चांगली आणि सुविधायुक्त आहे ते दाखवायचा प्रयत्न असतो.  

2. चांगलं काय:- आपल्या वेळेनुसार काम करता येते. तुम्ही जर मोठ्या मोठ्या कंपनीशी जोडलेले असाल, तर नेहमी कामे मिळतात. पैसेही बऱ्यापैकी मिळतात. 

3. वाईट:- कामे जरी जास्त फायदा देणारी असली, तरी त्यांचं प्रमाण कमी आहे. निदान भारतात तरी. साध्या वास्तूंना सुद्धा प्रशस्त आणि चांगलं दाखवायचं कसब असलं पाहिजे. 

4. काय लागतं:- चांगल्या दर्जाचा कॅमेराअल्ट्रावाईड किंवा वाईड लेन्स, रात्री फोटो काढणार असाल तर 3-4 फ्लॅश, स्थिर आणि मजबूत ट्रायपॉड. 

11. प्रोडक्ट फोटोग्राफी (Product Photography)

Blue Sport Shoe during product photo shoot

1. म्हणजे काय:- जाहिरातीसाठी किंवा काम मिळवण्यासाठी वस्तूंचे फोटो काढणे म्हणजे प्रोडक्ट फोटोग्राफी. ह्यामध्ये वस्तूंचा रंग, आकार, त्याच्या पृष्ठभागाचा पोत, इ. गोष्टी स्पष्ट दिसतील असे फोटो काढतात. 

2. चांगलं काय:- ह्यामध्ये भरपूर काम उपलब्ध आहे. कारण जाहिरात करणं ही प्रत्येकाची गरज आहे. आणि वाढत्या व्यावसायिक क्षेत्रात आपलं उत्पादन चांगलं दाखवण्यासाठी आकर्षक फोटो काढून घ्यायला सगळेच जण उत्सुक आहेत.

3. वाईट काय:- स्वतःची कल्पकता खूप कमी वेळेला दाखवता येते. उत्पादन जसं आहे, तसंच दिसलं पाहिजे हीच तर खरी गरज असते. त्यासाठी लाईट सेटअप लागतो. 

4. काय लागतं:- बऱ्यापैकी चांगल्या दर्जाचा कॅमेरा, स्टॅंडर्ड किंवा शॉर्ट टेलीफोटो लेन्स, लाईट सेटअप, बॅकड्रॉप, ट्रायपॉड. 

12. स्पोर्ट फोटोग्राफी (Sport Photography)

Sport photography of a player playing rugby in field

1. म्हणजे काय:- कुठलाही खेळ सुरू असताना त्यातल्या खेळाडुंचे फोटो काढणे म्हणजे स्पोर्ट फोटोग्राफी. ह्यामध्ये सगळेच खेळ येतात जसं की क्रिकेट, फुटबॉल, स्विमिंग, बाईक रायडिंग, वगैरे. 

2. चांगलं काय:- जेव्हा जेव्हा असे खेळ आयोजित केले जातात, तेव्हा तेव्हा भरपूर काम उपलब्ध होते. आपली कल्पकता दाखवण्याची चांगली संधी ह्यामध्ये मिळते. 

3. वाईट काय:- जे कॅमेरा आणि लेन्सेस लागतात ते महाग असतात, शारीरिक कष्ट असू शकतात, जलद काम करावं लागतं. 

4. काय लागतं:- फास्ट फोटो काढण्याची क्षमता असणारा कॅमेरा, स्टँडर्ड आणि टेलीफोटो  लेन्सेस, मोनोपॉड. क्वचित कधीतरी फ्लॅश सुद्धा लागू शकतो.

         हे झाले मुख्य प्रकार. अजूनसुद्धा काही प्रकार आहेत किंवा ह्यातच अजून छोटे छोटे भाग करता येतील ...जसं की पेट फोटोग्राफी म्हणजे पाळीव प्राण्यांचे फोटो काढणे (Pet Photography), ऍस्ट्रो फोटोग्राफी म्हणजे ग्रह, तारे, आकाशगंगा यांचे फोटो काढणे (Astro Photography), लॉंग एक्सपोजर फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचे पट्टे दिसतील असे रात्री काढायचे फोटो (Long Exposure Photography), कॉर्पोरेट फोटोग्राफी म्हणजे  फक्त व्यावसायिक क्षेत्रातील फोटो काढणे (Corporate Photography), वगैरे...... 

        आता फोटोग्राफीचे एवढे प्रकार आहेत हे पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल. आणि ह्यापुढेही एखादा नवीन प्रकार उदयास येऊ शकेल. तेव्हा त्याचे नवल वाटून घेऊ नका. कारण जोपर्यंत कल्पनाशक्तीला वाव आहे, तोपर्यंत काहीही होऊ शकतं. कदाचित तुम्ही स्वतःच एखादा नवीन प्रकार सुरू कराल. प्रयत्न करत रहा. शुभेच्छा. 😀🙏

- प्रसन्न जोशी.


        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- कोणता कॅमेरा माझ्यासाठी चांगला?

कॅमेर्‍याचे प्रकार

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

 


Comments

  1. मस्त आहे हा लेख बरीच माहिती मिळाली

    ReplyDelete
  2. प्रसन्न.नाद खुळा , फोटोग्राफी मध्ये एवढे प्रकार असतात माहीत नव्हतं
    चंद्रकांत,कोल्हापूर

    ReplyDelete
  3. खरंच फोटोग्राफी मध्ये इतके प्रकार हे माहीत नव्हते,खूप छान माहिती

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर माहिति मिळाली. छान उपक्रम आहे सर.
    प्रवीण मानतकर

    ReplyDelete
  5. फोटोग्राफीचे माहित नसणारे प्रकार कळाले. तिनही ब्लाॅगचे शब्दांकन सुंदर केले आहेस.

    ReplyDelete
  6. Replies
    1. 🙏😃 धन्यवाद मित्रा

      Delete
  7. Mast..Ankhi kahi type miss zalet ka

    ReplyDelete
    Replies
    1. बहुतेक सगळे प्रकार ह्यामध्ये घेतले आहेत. तरी कुठला राहिला असेल तर नक्की सांगा. पुढच्या पोस्ट मध्ये त्यावरही प्रकाश टाकता येईल. 😃

      Delete
  8. छान माहिती मिळाली

    ReplyDelete
  9. छान माहिती
    पुढची पोस्ट पण इंटरेस्टिंग वाटते आहे
    - शेफाली

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच आहे. 😃
      अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल, तरी नक्की सांगा. 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला