मोबाईल भारी का कॅमेरा भारी ?
अशी कल्पना करा की 2 व्यक्ती आहेत. एकाने सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे आणि दुसऱ्याने त्याच्यापुढे जाऊन 'स्ट्रक्चरल डिझाईन' हा विषय घेऊन उच्च शिक्षण घेतलं आहे. असं असताना एखाद्या घराच्या डिझाईनचं काम कोण नीट करू शकेल? तर दोघेही, कारण ते कसब दोघांमध्येही असेल. पण एखादा रेल्वे पूल बांधायचा असेल तर कुणाला काम द्याल? अर्थातच दुसऱ्या व्यक्तीला. कारण त्याचा त्या विषयात जास्त अभ्यास आहे आणि त्याने फक्त ते काम करण्यासाठीच प्रशिक्षण घेतलं आहे. 📕📗📘📙
फोटोग्राफी मध्येही तसंच आहे मंडळी. कामाच्या प्रकारानुसार माध्यम बदलतं. मोबाईलमध्ये पण फोटो काढता येतात. पण प्रोफेशनल कामासाठी तुम्हाला कॅमेराच लागणार कारण तो त्या कामासाठीच बनवलेला आहे.
'मोबाईल भारी का कॅमेरा भारी' हा विषय खरंतर बराच मोठा आहे. कारण सध्याच्या काळात फोटोग्राफी ही साचेबद्ध राहिलेली नाहीये. त्यात खूप नवीन नवीन प्रकार आलेले आहेत. तसंच आपण काढलेले फोटो लोकांना दाखवण्यासाठी नवीन नवीन माध्यमं आली आहेत. त्यात डिजिटल माध्यम हे सध्या सगळ्यात लोकप्रिय आहे आणि भविष्यातही त्याचीच चलती असेल असं म्हणलं जातंय. 🤩
तर मोबाईल आणि कॅमेरा ह्या दोन्हींपैकी चांगला कुठला आणि वाईट कुठला हे ठरवता येणार नाही. कारण त्या दोघांचेही स्वतःचे असे फायदे आणि तोटे आहेत. ते कोणते आहेत, चला बघूया.
मोबाईलचे फायदे 😀
1. सदैव उपलब्ध:- असं गमतीने म्हणतात की आजकाल लोक बाहेर जाताना कपडे चुकीचे घालतील, पण मोबाईल घ्यायला विसरणार नाहीत. खरंच आहे. मोबाईल हा जणू आपल्या शरीराचा एक भागच बनला आहे. त्यामुळे कधीही कुठल्याही ठिकाणी फोटो काढायचा म्हणला, तरीही मोबाईल आपल्याला उपलब्ध असतोच.
2. सर्वांना परवडणारा 👍🏻💲:- 'कॅमेरा नसलेला मोबाईल वापरणारा' माणूस, हा 'आंबा आवडत नसलेल्या' माणसाइतकाच दुर्मिळ आहे. कारण अगदी रु. 2,000/- किंमत असलेल्या मोबाईलला सुद्धा कॅमेरा असतोच असतो. कमी दर्जाचा का होईना, पण असतो.
3. हाताळायला सोपा 🙂:- मोबाईलचा आकार बघता तो कुणाच्याही हातात अगदी निवांत मावतो आणि कुठल्याही परिस्थितीत (खाली वाकून, हात उंच करून, वगैरे) फोटो सहज काढता येतो.
4. समजायला सोपा 😌:- कॅमेऱ्याचा स्क्रीन कुणालाही समजेल असा असतो. म्हणजे 'स्क्रीनवर दिसणाऱ्या लाल/काळ्या गोलावर दाबा' एवढ्या साध्या शब्दात सांगून सुद्धा दुसऱ्याकडून फोटो काढून घेता येऊ शकतो. 😅
5. न्यायला आणायला सोपा 😁:- खिशात टाकला की झालं....वेगळी बॅग, पाऊच, सॅक, काही काही लागत नाही.
6. टचस्क्रीन:- आजकाल 99% कॅमेरा मोबाईल हे टचस्क्रीन असतात. त्यामुळे वापर सोपा आणि जलद होतो. ️
7. कमी ऑप्शन:- सेटिंगचे ऑप्शन एकूणच कमी असल्यामुळे फार काही बदल करावे लागत नाहीत. त्यामुळे कंटाळा यायचं काम नाही....काय ..😜
8. कोणताही महत्वाचा क्षण चुकत नाही:- मोबाईल नेहमीच आपल्या नजरेच्या टप्प्यात असल्यामुळे, समोर घडणारा एखादा महत्वाचा क्षण टीपायचा राहिला, असं शक्यतो होत नाही आणि पश्चाताप करायची वेळ येत नाही.
9. फिल्टर्स आणि बाकीची वैशिष्ट्ये 👦🏻👦🏼👦🏽👦:- तरुणाईने डोक्यावर घेतलेले मोबाईल कॅमेरा मधले वेगवेगळे नवीन फिल्टर्स आणि अगदी सहज उपलब्ध असलेली बाकीची वैशिष्ट्ये, ह्यामुळे मोबाईल हा फोटोग्राफी साठी चांगला पर्याय आहे. ह्यामध्ये 'चेहरा गोरा करणे, गुळगुळीत करणे, मांजराचे कान आणि मिशा येणे ', ई सुविधा तर फारच फेमस झाल्या आहेत.....
मोबाईल मध्ये असलेली कमतरता 😐
1. सेटिंगचे कमी ऑप्शन:- अगदी आपल्याला हवा आहे तसा फोटो पाहीजे असेल, तर मोबाईलचा कॅमेरा कमी पडतो. त्यात आहेत तेवढ्याच ऑप्शन वर समाधान मानावे लागते.
2. ठरलेला फिल्ड ऑफ व्ह्यू 😐:- कॅमेरातून आपल्याला समोरचे किती दृश्य दिसते, त्याला फिल्ड ऑफ व्ह्यू म्हणतात. मोबाईल कॅमेराचा व्ह्यू हा वाईड अँगल म्हणून सेट केलेला असतो. त्यामुळे एखाद्या वेळेला आपल्याला झूम केलेला किंवा बाकीच्या प्रकारचा फोटो काढायचा असेल, तर तेव्हा मोबाईलचा उपयोग होत नाही. (मोबाईल मधल्या डिजिटल झूमचा तसा काहीच उपयोग नाहीये. ह्यावर आपण पुढच्या कुठल्यातरी पोस्ट मध्ये माहिती घेऊच.)
3. छोटा सेन्सर 🤦♂️:- मोबाईल मध्ये सर्व सुविधा देऊन सुद्धा त्याचा आकार छोटाच ठेवावा लागतो. शिवाय किंमतही जमेल तेवढी कमी ठेवायची असते. त्यामुळे कॅमेरासाठी शक्यतो छोटाच सेन्सर वापरावा लागतो. म्हणून फोटोच्या दर्जावर बंधनं येतात.
4. सुमार लो लाईट परफॉर्मन्स:- फोटोग्राफी मध्ये प्रकाश म्हणजे सर्व काही आहे. कारण प्रकाश किती आणि कसा आहे ह्यावर सेन्सरचं काम अवलंबून असतं. त्यामुळे प्रकाश कमी असेल, तर मोबाईलचे फोटो तेवढे स्वच्छ आणि शार्प येत नाहीत.
5. खोटा ब्लर:- आजकाल भरपूर प्रचलित असलेला ब्लर हा इफेक्ट मोबाईल मध्ये साधता येतो. पण तो खोट्या पद्धतीने म्हणजे सॉफ्टवेअर च्या मदतीने आणता येतो. त्यामुळे कधी कधी त्यात चूक होण्याची शक्यता असते.
6. छोटी डायनॅमिक रेंज:- कुठलाही सेन्सर किती उजळ आणि किती अंधाऱ्या भागातील डिटेल दाखवू शकतो, ह्याला त्याची डायनॅमिक रेंज म्हणतात. ही बहुतेक मोबाईलमध्ये कमी असते. त्यामुळे कॉन्ट्रास्ट जास्त असलेले फोटो हे फार चांगले येत नाहीत. (म्हणजे फोटोमधल्या उजळ भागात काय आहे ते दिसत असेल, तर अंधार असलेला भाग पूर्ण काळा दिसतो आणि अंधार असलेल्या भागात काही दिसत असेल, तर उजळ भाग हा पूर्ण पांढरा दिसतो.)
हे मुद्दे सोडून, 'मर्यादित शटर स्पीड, इलेक्ट्रॉनिक शटर, प्रोसेसिंग पॉवर' वगैरे मुद्देही आहेत. पण त्यासाठी कॅमेरा आणि भौतिकशास्त्राची खूप जास्त माहिती असणे गरजेचं आहे. त्यामुळे ही माहिती आपण नंतरच्या कुठल्यातरी पोस्ट मध्ये बघू.
हे झालं मोबाईलच्या बाबतीत. आता बघुयात प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे DSLR किंवा मिररलेस कॅमेरा बद्दल असणारे फायदे आणि लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. (इथे तुलनेसाठी पॉईंट अँड शूट कॅमेरा घेत नाहीये, कारण तो प्रोफेशनली वापरत नाहीत, तर तो आवड म्हणून वापरायचा कॅमेरा आहे.)
चांगले मुद्दे 😎✌
1. सेन्सर साईज 🤩:- सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, कॅमेऱ्याचा छोटा सेन्सर (crop सेन्सर) हा मोबाईलच्या सेन्सर पेक्षा तब्बल 16 पट (क्षेत्रफळाच्या दृष्टीने), तर कॅमेराचा मोठा सेन्सर (full frame sensor) हा मोबाईलच्या सेन्सर पेक्षा तब्बल 36 पट मोठा असतो (क्षेत्रफळाच्या दृष्टीने). विचार करा त्यामुळे किती फरक पडेल...
2. लेन्स ऑप्शन 😃:- DSLR/मिररलेस कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी बऱ्याच कंपन्यांची वेगवेगळी लेन्सेस उपलब्ध आहेत. अल्ट्रा वाईड लेन्स, वाईड लेन्स, स्टॅंडर्ड लेन्स, टेलिफोटो लेन्स, सुपर टेली फोटो लेन्स, फिश आय लेन्स, टील्ट शिफ्ट लेन्स, मॅक्रो लेन्स.....जो चाहीये वो मिलेगा..... ️
3. पूर्ण कंट्रोल 😎:- मुळात कॅमेरा मध्ये भरपूर सेटिंग असल्यामुळे अगदी हवा तसा फोटो कॅमेरा मध्येच काढता येऊ शकतो, ज्यामुळे एडिटिंग चा वेळ बऱ्यापैकी वाचू शकतो.
4. ऍडीशनल ऍक्सेसरीज उपलब्ध:- कॅमेरा हा प्रोफेशनल कामासाठीच बनवला गेला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी बऱ्याच ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत जसं की, प्रकाशासाठी फ्लॅश, स्टुडिओ लाईट, मॉडीफायर्स, स्टॅबिलिटी साठी ट्रायपॉड, मोनोपॉड, चांगल्या ग्रीप साठी वेगवेगळी हँडल्स आणि स्ट्रॅप्स, चांगल्या फोटोंसाठी वेगवेगळे फिल्टर्स, ई.
5. जास्त ब्लर:- मोठा सेन्सर आणि स्पेशल लेन्स असल्यामुळे, कॅमेऱ्यामध्ये फोटोला ब्लर चा मस्त इफेक्ट देता येतो. ह्यामुळे फोटोमधील मुख्य भाग हा बाकीच्या भागापेक्षा आपोआप वेगळा असा दिसतो. त्यामुळे पाहणाऱ्याचे लक्ष आपोआप तिकडेच जाते.
6. RAW फोटो काढू शकतो:- RAW फोटो म्हणजे असा फोटो की ज्यावर कॅमेऱ्याच्या प्रोसेसर नी शून्य किंवा अगदीच कमी प्रोसेसिंग केलेलं असतं. त्यामुळे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये, त्या फोटोचा दर्जा चांगलाच ठेऊन जास्तीत जास्त एडिटिंग करता येते. नेहमीच्या साध्या JPEG प्रकारच्या फोटोमध्ये जास्त एडिटिंग केलं तर तो खराब होतो.
7. चांगला प्रोसेसर:- कमेऱ्याचा प्रोसेसर हा मोबाईलच्या सेन्सर पेक्षा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जास्त प्रगत आणि सक्षम असतो. त्यामुळे फोटोमधील डिटेल्स, डायनॅमिक रेंज, रंग, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातात.
8. पैसे कमवू शकतो 💸💸💸:- तुम्ही प्रोफेशनल कॅमेराने विविध कामं करून पैसे कमवू शकता, हा ह्या कॅमेऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा आहे. अशाप्रकारे तुमच्या कॅमेऱ्याची किंमत वसूल होते आणि त्या नंतर कमावलेले पैसे हा तुमचा नफा असतो.
9. स्वतःसाठी पण उपयोगी:- आपल्याकडे कॅमेरा असेल, तर आपले स्वतःचे, घरच्यांचे आणि मित्रमैत्रिणींचे फोटो चांगल्या प्रकारे काढता येतील. तसंच काही महत्वाचे क्षण आपल्याला स्वतःलाच उत्तम प्रकारे जतन करून ठेवता येतील.
वाईट नाही, पण महत्वाचे मुद्दे 😐
1. महाग 🤑:- साध्या मोबाईलच्या तुलनेत बेसिक DSLR/मिररलेस कॅमेरा सुद्धा महाग असतो. आणि फक्त एकदाच कॅमेरा घेऊन भागेलच असं नाही.....तुमच्या कामाच्या गरजेनुसार तुम्हाला भविष्यात स्पेशल लेन्स आणि ऍक्सेसरीज घ्याव्या लागू शकतात.
2. शिकण्यास अवघड 🤓😵:- कॅमेऱ्यात भरपूर ऑप्शन असल्यामुळे, त्या सगळ्यांचा उपयोग आणि वापर शिकून, ते चांगल्या पद्धतीने वापरता येण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनत करावी लागते.
3. सांभाळायला अवघड 🙄:- कॅमेरा आणि लेन्स एवढ्या दोनच गोष्टी घेतल्या तरी त्यांचं वजन कमीत कमी पाऊण-एक किलो पर्यंत भरतं. शिवाय ते ठेवायला स्पेशल कुशनिंग असलेली बॅग किंवा सॅक सांभाळावी लागते. त्यामुळे बऱ्याच वेळेला, जास्त वापर झाला नाही, तर कॅमेरा हे एक नको असलेलं ओझं वाटू शकतं.
4. हाताळायला अवघड 😣:- मोबाईलसारखा एका हाताने कॅमेरा वापरालाय, असं खूप क्वचित होतं. एकतर वजन जास्त असतं आणि दुसरं म्हणजे आकार पण मोठा असतो. त्यामुळे नीट दोन्ही हाताने धरून मगच फोटो काढता येतो.
5. जास्त काळजी घ्यावी लागते:- जास्त किचकट उपकरण म्हणलं, की त्याची काळजी सुद्धा जास्त घ्यावी लागते. पावसाळ्यात लेन्स मध्ये बुरशी (फंगस) लागू शकते....आणि एकदा जर ते झालं, तर मग लेन्स पूर्ण उघडून प्रत्येक लेन्स इलेमेंट वरून ते स्वच्छ करावं लागतं, ज्यात अर्थातच पैसा आणि वेळ वाया जातो. मनस्ताप होतो ते वेगळंच. तसंच लेन्स बदलताना धूळ आत जाऊन सेन्सरवर बसणार नाही ना, ह्याची ही काळजी घ्यावी लागते. तशीच गरज भासली, तर सेन्सर खूप काळजी घेऊन स्वच्छ करावा लागतो.
6. फिल्टर्स वगैरे नसतात ❌:- प्रोफेशनल कॅमेऱ्यामध्ये कलर फिल्टर्स, स्टिकर्स वगैरे नसतात. आणि असलेच तर अगदीच साधे असतात, कारण ते प्रोफेशनल कामात लागत नाहीत. कॅमेऱ्यात काढलेला फोटो हा खऱ्या परिस्थितीच्या खूप जवळ जातो. त्यामुळे फोटो काढला आणि तसाच अपलोड केला असं क्वचितच होतं. नंतर थोडं फार एडिटिंग करावंच लागतं.
7. वापरण्याचा वेग 🐢:- 'मोबाईल खिशातून काढला, अनलॉक केला आणि कॅमेरा सुरू करून क्लिक केला', ही क्रिया खूपच पटकन म्हणजे अगदी 3-4 सेकंदातसुद्धा होऊ शकते. पण कॅमेऱ्याच्या बाबतीत तसं नसतं. 'बॅग उघडून कॅमेरा बाहेर काढणे, कॅमेऱ्याला लेन्स लावूनच ठेवलं असेल तर चांगलं, नाहीतर लेन्स काढून ते कॅमेऱ्याला लावण्यात अजून थोडा वेळ जाईल, मग लेन्स कॅप काढणे, कॅमेरा सुरू करणे आणि योग्य सेटिंग आहेत का ते बघून मग फोटो काढणे' ह्या सगळ्या क्रियेला 20- 25 सेकंद तरी जातातच जातात. तोपर्यंत समोरचा महत्वाचा क्षण निघून जाऊ शकतो.
ह्या सगळ्या मुद्द्यांपेक्षा एक वेगळा गमतीशीर मुद्दा असा, की जर तुमच्याकडे कॅमेरा असेल, तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, की बरेच जण त्यांचा फोटो काढून घेण्यासाठी तुमच्या मागे लागण्याची शक्यता आहे. 😅 ही गोष्ट त्रासदायक अजिबातच नाहीये, पण तरी आधीच कल्पना दिलेली बरी, म्हणून सांगितलं. 😜😂
एवढ्या सगळ्यावरून आपल्याला हेच कळतं, की मोबाईल आणि कॅमेरा ह्यांची तुलना होऊ शकत नाही आणि करूही नये. कारण ती दोन वेगवेगळी यंत्रं आहेत आणि त्यांचा उपयोग सुद्धा वेगवेगळा आहे. 🙂
कॅमेरा हा फक्त फोटो आणि व्हीडीओ साठी बनवला गेला आहे. त्यामुळे त्यात त्या दृष्टीने सर्व काही दिलेलं असतं. आणि भविष्यात त्याच्याही पुढचे शोध लागतील. 💹↗
याउलट, मोबाईलचा शोध हा फक्त कुठूनही कुठेही बोलण्यासाठी लागला होता. त्यानंतर आपणच त्यात रेडियो, टॉर्च, गाणी, कॅमेरा, ई गोष्टी वाढवत गेलो. पण त्याची क्षमता सध्या तरी एका ठराविक पातळीच्या पुढे जाऊ शकलेली नाहीये. पण भविष्य कुणी पाहिलंय? कदाचित DSLR/मिररलेस कॅमेऱ्याच्या तोडीस तोड कॅमेरा असलेला एखादा मोबाईल येईलही. पण तो खूप महाग असेल एवढं तर मी नक्कीच सांगू शकतो. 😅📱
सध्यातरी एवढाच सारांश लक्षात ठेऊयात की, मोबाईल हा चांगले फोटो काढू शकतो आणि 90% लोकांसाठी तेवढाच पुरेसा आहे. पण तुम्हाला फोटोग्राफीची कला शिकायची असेल किंवा तसा व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला DSLR/मिररलेस कॅमेऱ्याशिवाय पर्याय नाही.
कारण म्हणतात ना,
' जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोता खाय ' 🙂
:- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट:-फोटोग्राफी चे प्रकार
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸

Mastare
ReplyDelete😀👍🏻🙏
Deleteउपयुक्त माहिती
ReplyDelete👍👍
धन्यवाद 🙏🙂
Deletemast! mobile camera ani DSLR camera yacha difference tuzya kadun ya adhi pn samajun ghetla ahe. aj parat revision zali😉😉😉
ReplyDeleteहोय. उजळणी गरजेची असते. 😁
Deleteप्रसन्न उपयुक्त माहिती आहेच. मोबा. आणि कॅमेरायातील गुणदोष सविस्तरपणे मांङले आहेत.
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Deleteप्रसन्न उपयुक्त माहिती ... अन् ती देखील मुक्तहस्त लेखणीव्दारे ! वा छानच !
ReplyDelete🙏🙂
Delete