कॅमेर्‍याचे विविध भाग - फोटो निघतो म्हणजे नक्की काय होतं ?

What happens inside a camera when you click

(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)

'त्यात काय असतं.....नुसतं क्लिकचं बटण दाबलं की झालं.....'

    हे वाक्य मी लोकांकडून किती वेळा ऐकलंय, ह्याची गणनाच नाही. फोटो काढणे म्हणजे फक्त क्लिक करणे, अशी 90% लोकांची समजूत आहे. पण त्या एका क्लिक च्या मागे कॅमेऱ्याच्या आत काय काय घडतं, ही प्रक्रिया खूप भारी आहे. त्यासाठी कॅमेऱ्याचे विविध भाग कुठले आहेत आणि ते कसं काम करतात, हे जाणून घ्यावं लागेल. चला तर मग, ह्या पोस्ट मध्ये ह्याचीच माहिती घेऊयात. 

फोटो निघताना कॅमेऱ्याच्या आत ज्या क्रमाने क्रिया होतात, त्याच क्रमाने आपण त्याचे भाग बघुयात.

1) लेन्स (Lens)

2) आरसा आणि प्रिझम (DSLR कॅमेरा असेल तर) (Mirror and Prism)

3) स्क्रीन (Screen)

4) शटर मेकॅनिझम (Shutter Mechanism)

5) सेन्सर (Sensor)

6) प्रोसेसर (Processor)

7) स्टोरेज ची जागा (Storage space)


आता ह्याची सविस्तर माहिती बघुयात. 

1) लेन्स (Lens)

Minolta 50 mm f1.7 lens for DSLR

लेन्स म्हणजे अंतरगोल आणि बहिर्गोल भिंगाचा एक संच, ज्यामधून सगळ्यात आधी प्रकाश आत येतो. त्यामुळे ह्या लेन्स च्या काचांचा दर्जा जेवढा चांगला, तेवढाच उत्तम फोटो येईल, एवढं नक्की. त्यासाठी काहीवेळा त्या काचांवर कोटिंग पण केलेलं असतं. ह्या वेगवेगळ्या काचा एकमेकांपासून ठराविक अंतरावर अशा प्रकारे रचलेल्या असतात, की ज्यामुळे येणारा प्रकाश हा सेन्सर वर केंद्रित होतो. 

आत्ताच्या लेन्सेस मध्ये ऑटो फोकस सिस्टीम (Auto Focus System) आतच बसवलेली असते. तसंच काही लेन्सेस मध्ये इमेज स्टॅबिलायझेशन (Image stabilisation) ची प्रणाली सुद्धा असते, ज्यामुळे एका ठराविक पातळीपर्यंत आपला हात हलला, तरी फोटो शार्प येतो. 

पण सगळ्या लेन्सेस मध्ये काचांचा आकार, काचांची संख्या, वेगवेगळी कोटिंग, त्यांचा दर्जा, लेन्सची मजबुत बांधणी ह्या बाबी कमी जास्त प्रमाणात असतात. आणि म्हणूनच लेन्सच्या किंमती ह्या अगदी 8,000 पासून 9 लाखांपर्यंत आहेत. 

    काही लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. जर तुम्हाला त्यांची माहिती हवी असेल किंवा ती लेन्सेस खरेदी करायची असतील, तर खालील लिंक वर जाऊन घेऊ शकता. 

1) Canon EF 50 mm f1.8

2) Nikon AF-P DX NIKKOR 70-300 mm f/4.5-6.3

3) TAMRON SP 70-200mm F/2.8 Di VC USD G2 Lens

4) Canon EF 100-400mm F4.5-5.6L is II lens

5) Canon RF 85mm f1.2L USM DS

2) आरसा आणि प्रिझम (Mirror and prism)

कॅमेऱ्याच्या विविध प्रकारांपैकी DSLR ह्या एकाच प्रकारात 'आरसा आणि प्रिझम' ही प्रणाली बसवलेली असते. ह्या प्रणालीचं काम असं, की जेव्हा प्रकाश लेन्समधून आत येतो, तेव्हा तो 45° अंशावर बसवलेल्या आरशावरून परावर्तित होऊन वर असलेल्या प्रिझम मध्ये जातो आणि तिथून परत एकदा परावर्तित होऊन व्ह्यू फाईंडरमध्ये जातो. आणि म्हणून मग त्या व्ह्यू फाईंडर मध्ये बघून आपल्याला फोटोसाठी पाहिजे तसं फ्रेमिंग करता येतं. 

पण अशा प्रकारे आपल्याला दिसणारा प्रकाश हा खरा प्रकाश असल्यामुळे, बाहेर जर कमी प्रकाश असेल तर आपल्याला व्ह्यू फाईंडर मध्ये अंधार दिसतो. 

3) स्क्रीन (Screen)


DSLR सोडून बाकीच्या कॅमेऱ्यांमध्ये म्हणजे पॉईंट अँड शूट आणि मिररलेस कॅमेऱ्यांमध्ये समोर जे काही चाललं आहे, ते आपल्याला थेट स्क्रीनवर दिसतं. त्यामुळे फोटो फ्रेम करणे आणि  क्लिक करणे हे सोपं होतं. काही कॅमेऱ्यांमध्ये हे स्क्रीन वळवता सुद्धा येतात. हल्ली टचस्क्रीनचा जमाना आल्यामुळे ह्या स्क्रीन मध्ये पण काही वेळेला ती सुविधा दिलेली असते. 

जेव्हा आपल्याला खूप वरून किंवा खालून फोटो काढायचा असेल, अशा वेळेला स्क्रीनवर लाईव्ह व्ह्यू (Live view) सुरू करून त्याची मदत घेता येते. स्क्रीनचं काम हे कॅमेऱ्याचे सेटिंग दाखवणे, लाईव्ह व्ह्यू मोड मध्ये समोर काय चाललंय ते दाखवणे आणि टचस्क्रीन असेल तर फोटो काढणे, हे एवढंच आहे. 

4) शटर मेकॅनिझम (Shutter Mechanism)

शटर मेकॅनिझम म्हणजे येणार्‍या प्रकाशासाठी कॅमेर्‍याचा एक प्रकारचा दरवाजाच. कारण ह्यामध्ये दोन भाग असतात (first curtain आणि second curtain), जे आपण क्लिक केल्यावर एकामागून एक असे सेन्सर समोरून वरुन खाली जातात. म्हणजे जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा पहिला भाग (First curtain) वरुन खाली जातो आणि सेन्सर समोरचा भाग नाहीसा होऊन प्रकाश थेट सेन्सरवर पडतो. आणि आपण सेट केलेल्या वेळानंतर, दूसरा भाग (Second curtain) आपोआप वरुन खाली येतो ज्यामुळे सेन्सर समोर पुन्हा पडदा आल्यासारखं होतं. 

ह्या दोन्ही भागांच्या वरून खाली जाण्यामध्ये जेवढा वेळ सेन्सर वर प्रकाश पडतो, तेवढा वेळ फोटो काढला गेला, असं म्हणतात. आपल्याला प्रत्येक फोटो काढताना ‘खिचीक’ असा जो आवाज येतो, तो आवाज आरसा वर जाण्याचा आणि शटर मेकॅनिझमच्या काम करण्याचा असतो. 

5) सेन्सर (Sensor)


सेन्सर म्हणजे कॅमेऱ्याचा आत्मा. जेव्हा लेन्स मधून येणारा प्रकाश सेन्सर वर पडतो, तेव्हा ती माहिती इलेक्ट्रॉनिक सिग्नल मध्ये बदलण्याचं काम सेन्सर करतो. सेन्सर हा पिक्सेल पासून बनलेला असतो. पिक्सेल म्हणजे प्रकाशाचे कण साठवून ठेवणारे छोटे छोटे भाग. किती पिक्सेल आहेत आणि त्यांचा आकार किती आहे, ह्यावरून सेन्सर चा आकार आणि मेगा पिक्सेल ठरतात. 

जर सेन्सर छोटा असेल, तर कमी प्रकाशात जास्त चांगले फोटो निघणार नाहीत. पण जर सेन्सर मोठा असेल, तर कमी प्रकाशात सुद्धा चांगल्या दर्जाचे फोटो काढता येतात, कारण त्यातल्या पिक्सेल चा आकार मोठा असतो. तसंच जास्त शार्प फोटो मिळतात. 

साधरणपणे DSLR आणि मिररलेस कॅमेऱ्यांमध्ये मायक्रो फोरथर्ड (Micro four third), क्रॉप फ्रेम  (Crop frame), फुल फ्रेम (Full frame) आणि मिडियम फॉरमॅट (Medium format) अशा 4 प्रकारचे सेन्सर असतात, जे त्यांच्या आकारावरून ठरले आहेत. त्यामुळे सेन्सर चा आकार आणि दर्जा ह्यामुळे थेट फोटोचा दर्जा ठरतो. 

6) प्रोसेसर (Processor) 

सेन्सर नी जमा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम कॅमेऱ्याचा प्रोसेसर करतो. घेतलेल्या फोटोमध्ये रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस, शार्पनेस, ई गोष्टी किती असाव्यात हे प्रोसेसर ठरवतो. हे सगळे बदल फोटोला लागू केल्यानंतर आपल्याला थेट शेवटी तयार स्वरूपात फोटो मिळतो. 

त्यामुळे ज्या कॅमेऱ्यात प्रोसेसर चांगला असतो, त्याचे फोटो तांत्रिक दृष्ट्या चांगले येतात. पण ह्यात आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कधी कधी आपल्याला नको असताना पण कॅमेऱ्याने दिलेलेच फोटो वापरायला लागतात. ह्याला एकच उपाय म्हणजे, RAW फोटोचा पर्याय वापरणे. RAW फोटो म्हणजे काय हे आपण नंतरच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत.

फोटो प्रोसेस करायचा प्रोसेसरचा वेग किती आहे, हेसुद्धा महत्वाचं आहे. कारण फोटोवर प्रोसेसिंग झाल्यावर मगच तो फोटो सेव्ह केला जातो आणि त्यानंतरच कॅमेरा पुढचा फोटो काढू शकतो. आता येणारे नवीन प्रोसेसर हे वेगवान आहेत त्यामुळे आपण भरपूर फोटो सलग काढू शकतो.

7) स्टोरेज स्पेस


काढलेल्या फोटोवर प्रोसेसिंग झाली की तो फोटो सेव्ह करून ठेवण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये स्टोरेज स्पेस असते, ती म्हणजे मेमरी कार्ड. ह्याचा उपयोग तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, तो म्हणजे फोटो साठवून ठेवणे. 

ह्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. त्या कार्डचा स्टोअर करायचा स्पीड म्हणजेच रायटिंग स्पीड किती आहे, त्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. जेवढा कार्डचा स्पीड जास्त, तेवढाच कॅमेरा जास्त वेगाने काम करू शकतो. 

काही काही कॅमेऱ्यांमध्ये अशी दोन मेमरी कार्ड एकाच वेळेला वापरायची सोय असते. त्यामुळे सगळे फोटो एकाच वेळेला दोन ठिकाणी साठवून ठेवले जातात, जेणेकरून त्यातलं एक कार्ड काही कारणाने खराब झालं, तर ते फोटो दुसऱ्या कार्ड मध्ये तरी आपल्याजवळ सुरक्षित राहतात. 

    काही मेमरी कार्डस  च्या लिंक खाली देत आहे. जर तुम्हाला त्याची माहिती हवी असेल किंवा ते खरेदी करायची असतील, तर खालील लिंक वर जाऊन घेऊ शकता. 

1) Sandisk 32 GB 48 mbps memory card

2) Sandisk 32 GB 95 mbps memory card

3) Sandisk 128 GB 150 mbps memory card


आता ही सगळी माहिती बघून झाल्यावर, फोटो काढायची प्रोसेस थोडक्यात सांगायची म्हणजे,

1) लेन्स मधून प्रकाश आत येतो.

2) त्यानंतर (जर DSLR कॅमेरा असेल तर) आरसा आणि प्रिझम मधून परावर्तित होऊन तो प्रकाश व्ह्यू फाईंडर मध्ये दिसतो आणि त्यामुळे आपल्याला  फोटोचं फ्रेमिंग करता येतं.....किंवा बाकीच्या कॅमेऱ्यांमध्ये स्क्रीनचा वापर करून फ्रेमिंग करता येतं.

3) त्यानंतर आपण क्लिक चं बटन दाबतो आणि शटर मेकॅनिझम काम करतं, ज्यामुळे येणारा प्रकाश सेन्सर वर पडतो. 

4) सेन्सर त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचं इलेक्ट्रॉनिक प्रतिमेमध्ये रूपांतर करतो आणि ती प्रतिमा प्रोसेसर कडे पाठवतो. 

5) प्रोसेसर त्याच्याकडे आलेल्या त्या इलेक्ट्रॉनिक प्रतिमेवर त्याला योग्य वाटेल तसं प्रोसेस करतो.

6) त्यानंतर ती इलेक्ट्रॉनिक प्रतिमा फोटो म्हणून मेमरी कार्ड मध्ये सेव्ह होते. 


आपण फोटो काढतो तेव्हा आपल्याला फक्त खिचिक एवढाच आवाज येतो. पण त्या खिचिक च्या मागं क्षणार्धात कॅमेऱ्याच्या आत एवढं सगळं होतं, हे नवलच नाही का. 

त्यामुळे ह्यापुढे तुम्ही स्वतः कुणालाही असं म्हणू नका की, 'त्यात काय असतं......फक्त क्लिकचं बटण दाबलं की झालं'. 😅

आणि जर हेच वाक्य तुम्हाला कुणी म्हणलं, तर त्यांना ह्या पोस्टची लिंक पाठवा. कारण आपल्याला काय, तर फक्त गैरसमज दूर करायचाय. बरोबर ना? 😀


- प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेलतर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- सेन्सर - कॅमेर्‍याचा आत्मा 


हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸


Comments

  1. वा! फारच छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻 अगदी कॅमेराच्या आत जाऊन त्याचं फंक्शनिंग समजून घेतोय असं वाटलं!

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती !👌 अभिनंदन प्रसन्न सर

    ReplyDelete
  3. अतिशय सखोल माहिती

    ReplyDelete
  4. छान लिहीतोस रे प्रसन्ना ! खूपच उपयुक्त माहिती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला