सेन्सर - कॅमेर्‍याचा आत्मा

Canon 5D camera shwing censor inside and text in Marathi

(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)
    
    आपलं शरीर एकदम स्वस्थ असेल पण त्याच्या आत आत्माच नसेल तर त्या शरीराचा काय फायदा? बरोबर ना ?? आपल्या शरीरात जे काम आत्म्याचं आहे, तेच काम कॅमेऱ्यामध्ये सेन्सरचं आहे. सेन्सर नसला, तर कॅमेरा हा फक्त एक निरुपयोगी खेळणं होऊन जाईल. ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये बघुयात. 

    आपल्याला माहीत आहे, की लेन्स प्रकाशाला आत आणून सेन्सर वर एकत्रित करण्याचं काम करते. आरसा आणि प्रिझम किंवा स्क्रीनच्या मदतीने आपण तो पाहू शकतो. प्रोसेसर आणि मेमरी कार्ड पण प्रकाशावर प्रक्रिया करायला तयारच आहेत. पण, जर कॅमेऱ्यामध्ये सेन्सरच नसेल, तर तो आत येणारा प्रकाश साठवून कसा ठेवणार? त्यामुळे फोटोग्राफी च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सेन्सरला सर्वाधिक महत्वाचं स्थान आहे. 

    पण मग ह्याचा अर्थ असा आहे का, की बाकीचे भाग मुख्य नाहीत आणि ते नसतील तरी चालेल? अगदी नीट विचार केला तर खरंच चालेल. कारण फोटोग्राफीचा मोघम अर्थ हा 'प्रकाशाचा वापर करून काढलेलं चित्र' असा आहे. मग ते चांगलं असो किंवा वाईट. 

त्यामुळे खालील मुद्दे लक्षात घेरण्यासारखे आहेत.
- जर लेन्स नसेल तर प्रकाश सेन्सरवर एकत्रित होणार नाही, पण विखुरलेला का होईना, थोडा प्रकाश सेन्सरवर पडेलच. 
- तसंच, आरसा, प्रिझम, स्क्रीन नसतील तर आपल्याला काय फोटो काढतोय ते दिसणार नाही, पण फोटो येईल. 
- प्रोसेसर नसला, तर आलेल्या प्रकाशावर काही प्रोसेसिंग होणार नाही, पण त्यावेळेला प्रक्रिया न केलेला का होईना, आपल्याला फोटो मिळेल. 
- मेमरी कार्ड जरी नसेल, तर फोटो आपल्याला वायर च्या मदतीने कॉम्प्युटर वर फोटो सेव्ह करता येईल. 
- पण सेन्सरच नसेल, तर कसला प्रकाश आणि कसलं काय.... 
त्यामुळे सेन्सर ला कॅमेऱ्याचा आत्मा म्हणणं हे काही चुकीचं ठरणार नाही. 

कॅमेऱ्याच्या सेन्सरचे त्याच्या आकारावरून पडलेले काही प्रकार आहेत. हे विविध प्रकार मोबाईल पासून प्रोफेशनल DSLR पर्यंत सगळीकडे गरजेनुसार वापरले जातात. हे प्रकार आपण लहानापासून मोठ्या आकारपर्यंत अशा चढत्या क्रमाने पाहुयात. 

DSLR & mirrorless Camera Censor sizes explained in Marathi


1) 1 इंच पर्यंतचे सेन्सर 
ह्या प्रकारात 1/3.2 इंच (4.54 x 3.42 मिमी), 1/2.3 इंच (6.17 x 4.55 मिमी), 2/3 इंच (8.80 x 6.60 मिमी) आणि 1 इंच (12.80 x 9.60 मिमी) हे सेन्सर येतात. ह्या आकाराचे सेन्सर मोबाईल, छोटे पॉईंट अँड शूट कॅमेरे, ऍक्शन कॅमेरे, ई ठिकाणी वापरतात. ह्यांचा आकार छोटा असल्यामुळे ते कमी प्रकाश साठवून घेऊ शकतात आणि म्हणून कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी ह्यांचा उपयोग होत नाही. असे काही कॅमेरे तुम्हाला बघायचे असतील किंवा घ्यायचे असतील, तर त्यांची लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर जाऊन बघू शकता. 
2) मायक्रो फोर थर्ड सेन्सर (Micro Four Third Censor)
ह्यांचा आकार 17.30 x 13.00 मिमी एवढा असतो. असे सेन्सर असणारे कॅमेरे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध मिररलेस कॅमेरे म्हणजे Panasonic Lumix GH5, Panasonic Lumix G9, Olympus OM-D E-M1, ई. ह्या छोट्या आकारामुळे, संपूर्ण कॅमेऱ्याचा आकार लहानच असतो आणि परिणामी त्यासाठी लेन्स सुद्धा लहानच लागतात. त्यामुळे, ट्रॅव्हल फोटोग्राफी साठी ह्या प्रकारचे कॅमेरे योग्य ठरतात. असे काही कॅमेरे तुम्हाला बघायचे असतील किंवा घ्यायचे असतील, तर त्यांची लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर जाऊन बघू शकता. 
3) क्रॉप सेन्सर (Crop Censor)
ह्यांचा आकार हा 24 x 16 मिमी इतका असतो. सुरुवातीच्या काळात वापरण्यासाठी क्रॉप सेन्सर असलेले कॅमेरे उत्तम असतात. कारण त्यात DSLR किंवा मिररलेस प्रणालीची बहुतेक सर्व सेटिंग असतात, पण ते कमी किमतीत उपलब्ध होतात. साधारणपणे, 1 लाखापर्यंतच्या सर्व DSLR किंवा मिररलेस कॅमेऱ्यांमध्ये क्रॉप सेन्सरच असतात. असे काही कॅमेरे तुम्हाला बघायचे असतील किंवा घ्यायचे असतील, तर त्यांची लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर जाऊन बघू शकता. 
4) फुल फ्रेम सेन्सर (Full Frame Censor)
जुन्या काळी जेव्हा फोटोग्राफी साठी फिल्म वापरायचे, तेव्हा त्या फिल्म चा आकार हा 35 मिमी एवढा असायचा आणि ह्या सेन्सरचा आकार सुद्धा 36 मिमीच असतो. म्हणून ह्याला फुल फ्रेम सेन्सर म्हणतात. ह्याचा आकार हा 36 x 24 मिमी इतका असतो. ह्या सेन्सरचा फायदा म्हणजे, मोठा आकार असल्यामुळे कमी प्रकाशाच्या वेळी सुद्धा ह्याने उत्तम फोटो काढता येतात. पण ह्या मोठ्या आकारामुळेच असे सेन्सर असलेले कॅमेरे म्हणजेच फुल फ्रेम कॅमेरे हे महाग असतात, म्हणजे त्यांची किंमत अंदाजे 1 लाखांपासून सुरू होते. 
5) मिडीयम फॉरमॅट सेन्सर (Medium Format Censor)
ह्या सेन्सरचा आकार हा 53.7 x 40.2 मिमी एवढा असतो. हा सगळ्यात मोठा सेन्सर आहे. म्हणजे फुल फ्रेम पेक्षा अंदाजे 50% मोठा. त्यामुळे कमी प्रकाशात फोटो काढायचे असतील, तर ह्या सेन्सरला तोड नाही. पण अर्थातच ह्याची किंमत खूप जास्त असते. म्हणजे फक्त कॅमेराची किंमतच 3-4 लाख असते. लेन्स चे वेगळे पैसे. त्यामुळे खूप कमी लोक असे कॅमेरे वापरतात. कारण आपण जेवढे पैसे त्यात गुंतवतोय, तेवढे परत तरी आले पाहिजेत ना. सध्या उपलब्ध असलेल्या अशा कॅमेर्‍यांपैकी एकाची  लिंक तुम्हाला अंदाज यावा म्हणून खाली देत आहे. 

ही झाली सेन्सरच्या आकाराबद्दलची माहिती. पण मेगापिक्सेलचं काय? ह्या सेन्सर मध्ये किती मेगापिक्सेल असतात? ह्या सर्व प्रकारच्या सेन्सरमध्ये अगदी 10 मेगापिक्सेल पासून 50 मेगापिक्सेल पर्यंत मेगापिक्सेल असू शकतात. मुळात सेन्सर चा आकार आणि मेगापिक्सेलची संख्या ह्यांचा काहीच संबंध नसतो. म्हणजे मोठा सेन्सर म्हणजे जास्त मेगापिक्सेल असं अजिबात नसतं. हे असं का, हे आपण पुढच्या एखाद्या पोस्ट मध्ये बघूच. पण आत्ता हा एवढा संदर्भ पुरेसा आहे. 

सेन्सरच्या ह्या प्रकारांच्या आकारावरून काही गोष्टी ठरतात. म्हणजे त्यांची कमी प्रकाशातली कामगिरी, फोटोंचा दर्जा आणि मुख्य म्हणजे किंमत. मग ह्यातला चांगला कुठला? तांत्रिक दृष्ट्या बघितलं, तर सगळ्यात मोठा असलेला मिडीयम फॉरमॅट सेन्सर हा सगळ्यात चांगला आहे. पण प्रत्येकाला तो परवडणारा नाहीये. शिवाय ज्यांना खूप जास्त मेगापिक्सेल नको आहेत, फोटोमध्ये खूप बारकावे नको आहेत, त्यांच्यासाठी हा उपयोगी नाही. कारण जास्त मेगापिक्सेल म्हणजे जास्त साईज चा फोटो. त्यामुळे नेहमी जास्त क्षमतेचं मेमरी कार्ड लागणार. म्हणजे परत पैसे खर्च करणं आलं. त्यामुळे नेहमी मोठ्ठाच पर्याय चांगला, असं कॅमेऱ्याच्या सेन्सरच्या बाबतीत नाहीये. 
कॅमेऱ्याचा सेन्सर हा कॅमेऱ्यात अशा ठिकाणी बसवलेला असतो, जिथे लेन्स मधून येणारा प्रकाश एकत्रित होतो. शिवाय जेवढा सेन्सर मोठा, तेवढा तो पूर्ण व्यापण्यासाठी जास्त जागेवर प्रकाश केंद्रित झाला पाहिजे. म्हणजेच लेन्स सुद्धा तेवढे मोठे पाहिजे. म्हणून 1 इंच सेन्सर असलेले कॅमेरे हे आकाराने सगळ्यात लहान असतात आणि मिडीयम फॉरमॅट सेन्सर (Medium Format Censor) असलेले कॅमेरे सगळ्यात मोठे. 

अजून एक गमतीचा भाग म्हणजे, बऱ्याच वेळेला लोक गमतीने म्हणतात की, 'लेन्स गोल असतं, तर फोटो चौकोनी कसा काय येतो?' ह्यामागे एक साधं कारण आहे. खालच्या फोटोमध्ये आपण बघू शकतो, की चौकोनी सेन्सर पूर्णपणे प्रकाशाने व्यापला जावा ह्यासाठी सेन्सरचे चारही कोपरे हे लेन्सने तयार केलेल्या प्रकाशाच्या वर्तुळाच्या आतच असावे लागतात. आणि त्यामुळे ह्या चौकोनाच्या चारही बाजूंच्या कडेचा भाग हा वाया जातो. तो फोटोमध्ये येत नाही. 
Why photos are rectangular shaped when lens is circular explained in Marathi


हे पडताळून पहायचं असेल, तर मोठ्या सेन्सर वर छोट्या व्यासाचं लेन्स लावावं. ह्यामुळे लेन्सने तयार केलेलं प्रकाशाचं वर्तुळ हे सेन्सरच्या चौकोनाच्या आत येईल आणि त्या वर्तुळाच्या कडेचा भाग पूर्ण काळा दिसेल. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे. 
How photo appears when lens diameter is smaller than the sensor size explained in Marathi

शिवाय अशा परिस्थितीत येणारा फोटो कसा असेल, ह्याची कल्पना येण्यासाठी खाली दिलेला फोटो बघा. 
Photo captured when lens size is less than censor size explained in Marathi


आता तुम्हाला कळलं असेल, की लेन्स गोल असून सुद्धा फोटो चौकोनी का येतो. 

कॅमेराच्या सेन्सर बद्दल अशी अनेक प्रकारची रंजक माहिती खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, सेन्सर काम कसा करतो, फोटो काढताना प्रकाशाच्या कणांना कसा साठवून ठेवतो, फोकसिंग करताना तिथे काय प्रक्रिया होते, वगैरे. पण ही माहिती खूप सखोल अभ्यास केला तरच समजून घेता येईल. 

म्हणून आपण आपलं मन आणि आत्मा पणाला लावून ह्या विषयाचा अभ्यास करूया. म्हणजे तात्याविंचू म्हणतो तसं म्हणायचं झालं, तर 'अभ्यास असा करूयात की आपला आत्मा कॅमेऱ्यात आणि कॅमेऱ्याचा आत्मा आपल्यात येईल.'.....चालेल ना?

- प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेलतर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:-  खरंच एवढे मेगापिक्सेल आपल्याला लागतात का? 


हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. आत्ता सर्वच ब्लाॅग पुन्हा वाचले, या विषयाच सखोल ज्ञान आहे बुवा तुझ्याकङे. छान आणि ते लिहून इतरांना मार्गदर्शन म्हणजे ... जे जे आपणासी ठावे ... ते ते इतरासी सिकवावे .. शहाणे करून सोङावे सकळ जन ... या उक्ती प्रमाणे जगतोस तू.

    ReplyDelete
  2. Sir, very nicely explained. Even a normal person can understand the detailed working of camera with its accessories

    ReplyDelete
    Replies
    1. तोच प्रयत्न आहे माझा, आणि इथून पुढेही राहील. 🙂

      Delete
  3. वा! छान माहिती!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला