आपल्याला एवढे मेगापिक्सेल खरंच लागतात का?

How many megapixels are enough in a camera sensor explained in Marathi language


‘तुम्हाला मेगापिक्सेल पाहिजेत ना, मग हे घ्या मेगापिक्सेल'
आजकालच्या प्रत्येक मोबाईलच्या जाहिरातीत, कंपनी मनातल्या मनात ग्राहकाला हे वाक्य म्हणत असेल, असं मला नेहमी वाटतं.  कारण मोबाईलमध्ये जास्त मेगापिक्सेलचा सेन्सर द्यायची शर्यतच जणू कंपन्यांनी सुरू केली आहे. बघा ना....48 mp काय, 64 mp काय, एका नवीन मोबाईल मध्ये तर 108 mp चा सेन्सर दिला आहे कंपनीने. मुळात एवढे मेगापिक्सेल आपल्याला लागतात का? हा प्रश्न खूप कमी जणांना पडतो. बाकीचे बिचारे ग्राहक संख्येच्या प्रभावाला बळी पडून आपले पैसे कंपनीला देऊन मोकळे होतात, पण त्यांच्या हातात फारसं काही पडत नाही. 
आपण कधी विचार केला आहे का, की मेगापिक्सेल ह्या संकल्पनेचा नक्की अर्थ काय? फोटोग्राफी मध्ये मेगापिक्सेल चा उपयोग काय आहे? ते कमी किंवा जास्त असतील तर फोटोमध्ये काय फरक पडतो? ह्याबद्दलची माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. 
'मेगापिक्सेल' हा शब्द दोन छोट्या शब्दांनी बनलेला आहे. 'मेगा' आणि 'पिक्सेल'. 'मेगा' ह्या शब्दाचा अर्थ 10 लाख एवढी संख्या. हा अर्थ इंग्रजी मापनपद्धतीवरून आला आहे. आणि 'पिक्सेल' म्हणजे कॅमेरा सेन्सरवर पडणारे प्रकाशाचे कण गोळा करणारा एक अत्यंत छोटा भाग. त्याला इंग्रजी मध्ये Photon collecting unit म्हणतात. असा प्रत्येक पिक्सेल त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या कणांना (Photon) इलेक्ट्रॉनिक माहिती मध्ये बदलतो. कॅमेरा सेन्सर मध्ये अशी रचना असते की, एका आडव्या ओळीत एकाशेजारी एक असे काही हजार पिक्सेल असतात आणि अशा काही हजार उभ्या ओळी असतात. 
म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, तर 1 मेगापिक्सेल चा सेन्सर म्हणजे, असा सेन्सर ज्यामध्ये उभ्या आणि आडव्या ओळीत मिळून एकूण 10 लाख पिक्सेल असतील. ठिपक्यांची रांगोळी असते ना, तसाच हा सेन्सर असतो, ठिपके ठिपके जोडून तयार केलेलं सेन्सर नावाचं जाळं. 
सेन्सरमध्ये आडवे आणि उभे असे किती पिक्सेल रचलेले आहेत, ते म्हणजेच त्या सेन्सरचं आणि परिणामी येणाऱ्या फोटोचं रीझोल्युशन असतं. म्हणजे 4000 x 3000 अशा रिझोल्युशन चा सेन्सर असेल, तर त्याचा अर्थ असा की त्या सेन्सरवर 4000 पिक्सेलची एक आडवी ओळ आहे आणि अशा 3000 उभ्या ओळी आहेत. म्हणजेच हा सेन्सर 12 मेगापिक्सेल चा आहे. (कारण 4000 x 3000 = 12,000,000 पिक्सेल म्हणजेच 12 मेगा पिक्सेल)

  एका सेन्सर मध्ये किती पिक्सेल असावेत, हे तो सेन्सर बनवणारी कंपनी ठरवते. म्हणजे एकच आकार असलेल्या दोन वेगवेगळ्या सेन्सर मध्ये 12 मेगापिक्सेल असू शकतात किंवा 48 मेगापिक्सेल सुद्धा असू शकतात. ह्यासाठी आपण एक उदाहरण बघुयात. असं समजा, की आपल्याकडे 10 मिमी रुंदी असलेला एक सेन्सर आहे. तर अशा सेन्सर मध्ये एका आडव्या ओळीत 1 मिमी चे 10 मोठे मोठे पिक्सेल ठेवायचे, का 0.5 मिमी चे 20 छोटे छोटे पिक्सेल ठेवायचे, हे तो सेन्सर बनवणारी कंपनीच ठरवते. म्हणजे, जर सेन्सर मध्ये कमी पिक्सेल बसवले, तर प्रत्येक पिक्सेल मोठ्या आकाराचा असेल आणि जर जास्त पिक्सेल बसवले, तर प्रत्येक पिक्सेलचा आकार आपोआपच छोटा होईल, कारण कंपनीला सेन्सरच्या तेवढ्याच जागेत 10 च्या ऐवजी 20 पिक्सेल बसवायचे आहेत. खालील आकृती बघून तुम्ही हे गणित नीट समजून घेऊ शकता. 

Same camera sensors with different pixels explained in marathi

ही माहिती नीट लक्षात ठेवा, कारण ह्याचा संदर्भ पोस्टच्या पुढच्या भागामध्ये लागणार आहे.

मग आता असा प्रश्न पडतो, की असे किती लाख पिक्सेल असल्यावर आपण काढत असलेला फोटो चांगला येईल? ह्याचं ठराविक असं एक उत्तर देता येणार नाही. कारण 'फोटोचा दर्जा' आणि 'पिक्सेल ची संख्या' ह्यांचा काही एक संबंध असतो. पण प्रत्येक 'पिक्सेल चा आकार' केवढा आहे, ह्यावर मात्र फोटोचा दर्जा पूर्णपणे अवलंबून असतो.  
गोंधळलात? थांबा हा मुद्दा आपण सविस्तर पणे बघुयात. चांगल्या फोटोचे एकूण दोन भाग करता येतील. एक म्हणजे त्या फोटोचा चांगला दर्जा आणि दुसरा म्हणजे त्या फोटोमध्ये दिसत असलेली जास्तीत जास्त माहिती. फोटोचा दर्जा चांगला येण्यासाठी प्रत्येक पिक्सेल चा आकार मोठा असायला हवा. म्हणजे मगाशी घेतलेल्या उदाहरणात 1 मिमीचे 10 पिक्सेल असतील, तर फोटोचा दर्जा चांगला असेल. म्हणजे ब्राईटनेस, कलर, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस, डायनॅमिक रेंज, ई. बाबतीत फोटो चांगला असेल. 
पण जर फोटो मध्ये आपल्याला जास्त माहिती म्हणजे डिटेल्स दाखवायच्या असतील, तर पिक्सेलची संख्या जास्त लागेल. कारण प्रत्येक पिक्सेल हा माहिती साठवून ठेवत असतो आणि जास्त पिक्सेल असतील तर फोटोमध्ये जास्त माहिती साठवून ठेवली जाईल. म्हणजे मगाशी बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे, 0.5 मिमी चे 20 पिक्सेल असतील, तर जास्त माहिती साठवून ठेवता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की माहिती जरी जास्त असेल तरी ती चांगल्या दर्जाची असेलच असं नाही. कारण प्रत्येक पिक्सेल चा आकार छोटा आहे. त्यामुळे ब्राईटनेस, कलर, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस, डायनॅमिक रेंज, ई. बाबतीत फोटो चांगला असेलच असं नाही. फोटो कुठल्या परिस्थितीत काढला आहे, त्यावरून ते ठरेल. 

ह्या सगळ्याचा सारांश असा, की कमी पिक्सेल म्हणजे 'चांगल्या दर्जाची कमी माहिती/डिटेल्स' आणि जास्त पिक्सेल म्हणजे 'कमी दर्जाची जास्त माहिती/डिटेल्स'. अर्थात, सेन्सर चा आकार एकच असेल तर. 
आता ही सगळी माहिती मोबाईलच्या बाबतीत कशी काय जोडता येईल, ते बघुयात. मोबाईल चा सेन्सर कॅमेऱ्याच्या सेन्सरच्या तुलनेत केवढा असतो, हे आपण मागच्या पोस्ट मध्ये बघितलं आहे. 
(मागची पोस्ट वाचली नसेल, तर ह्या लिंक वर जाऊन वाचू शकता:- सेन्सर चे प्रकार आणि महत्व

त्यामुळे मोबाईल चा सेन्सर आधीच खूप छोटा असल्यामुळे त्यात असलेल्या पिक्सेल चा आकार मुळातच खूप छोटा असतो. त्यामुळे फोटोचा दर्जा कॅमेऱ्याच्या तुलनेत कमीच असतो. आणि त्यातसुद्धा जर तेवढ्याच सेन्सर मध्ये आपण जास्त पिक्सेल बसवले, तर अर्थातच त्या वेळेला प्रत्येक पिक्सेल हा अजूनच छोटा होईल आणि फोटोचा दर्जा अजूनच खराब होईल. पण जास्त माहिती/डिटेल्स फोटो मध्ये असेल. 
आपण मेगापिक्सेल चा सरळसरळ असाही संबंध लावू शकतो, की काढलेला फोटो आपण किती मोठा/झूम करू शकतो, जेणेकरून फोटो फाटणार नाही आणि त्याचा दर्जा बघताना चांगला वाटेल. त्यामुळे एखादा फोटो जास्त मेगापिक्सेलचा असेल, तर त्याचा एक फायदा हा पण आहे, की आपण तो फोटो खराब न करता जास्त झूम करू शकतो. म्हणजे ढोबळमानाने सांगायचं झालं, तर कमी मेगापिक्सेल चा फोटो न फाटता तिप्पट मोठा करता येत असेल, तर जास्त मेगापिक्सेल चा फोटो न फाटता पाचपट मोठा करता येतो. 
ह्यावरून आपल्याला असं कळतं, की सेन्सर जास्त मेगापिक्सेलचा असेल, तर फोटोत जास्त माहिती/डिटेल्स साठवल्या जातात पण त्याचा दर्जा चांगला नसतो. पण  आपण असं बघतो, की आयफोन, सॅमसंग, शाओमी चे काही महागडे फोन असे आहेत ज्याच्यात मेगापिक्सेल पण जास्त आहेत आणि फोटो सुद्धा खूप चांगले येतात. ते कसं काय? ह्याचं उत्तर आहे 'प्रोसेसर मुळे'. 

अशा महागड्या फोन मध्ये लेन्सेसची काच ही खूप अव्वल दर्जाची असते. शिवाय सेन्सर मध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान वापरलेले असते. पण फोटो चांगला येण्यामागचं मुख्य कारण हेच आहे, की अशा मोबाईल मधला कॅमेरा प्रोसेसर खूप प्रगत असतो. त्यामुळे हा प्रोसेसर फोटोवर असं काही प्रोसेसिंग करतो, की फोटो काढतानाच पिक्सेलच्या छोट्या आकारामुळे ज्या त्रुटी राहिलेल्या असतात, त्या प्रोसेसिंग मध्ये दूर केल्या जातात. म्हणजे जास्त खरखर आलेली असेल तर ती कमी करणे, कमी प्रकाशात फोटो काढला असेल तर त्याचा ब्राईटनेस वाढवणे, फोटो कमी शार्प असेल तर त्याचा शार्पनेस वाढवणे, वगैरे.
मग जास्त मेगापिक्सेल कुणासाठी गरजेचे आहेत? किंवा ते कधी उपयोगी पडतात? तर ज्यांना फोटोमध्ये जास्तीत जास्त माहिती/डिटेल्स साठवून ठेवायच्या असतील, त्यांच्यासाठी जास्त मेगापिक्सेल नेहमीच उपयोगी असतात. शिवाय, जास्त मेगापिक्सेल असलेला फोटो तुम्ही नंतर भरपूर क्रॉप केलात, तरी त्याच्यात बरेच मेगापिक्सेल शिल्लक राहतात. म्हणजे समजा आपण लांब असलेल्या एखाद्या पक्षाचा फोटो 20 मेगापिक्सेल च्या सेन्सर वर काढला. तर त्यात तो पक्षी छोटाच दिसेल आणि तो फोटो क्रॉप केला तर त्याचा दर्जा/रिझोल्युशन कमी होईल म्हणून क्रॉपही करता येत नाही. पण तोच फोटो जर आपण 50 मेगापिक्सेल च्या सेन्सर वर काढला, तर पहिल्यांदा पक्षी तेवढाच दिसेल पण तो फोटो क्रॉप करून आपल्याला तो पक्षी मोठा दाखवता येईल. शिवाय 50 मेगापिक्सेल चा फोटो क्रॉप करूनसुद्धा 20 मेगापिक्सेल पेक्षा मोठाच शिल्लक उरेल. त्यामुळे फोटोचा दर्जा पण चांगलाच राहील.

त्यामुळे आजकाल मोबाईल फोन आणि कॅमेरा मध्ये जास्तीत जास्त मेगापिक्सेल उपलब्ध करून द्यायची शर्यत सुरू आहे. पण अशावेळेला फक्त पिक्सेल ची संख्या महत्वाची नसून, सेन्सरचा आकार आणि प्रोसेसरची क्षमताही महत्वाची असते, एवढं लक्षात ठेवा. 
आणि शेवटी हे सगळं रामायण अशा लोकांसाठी आहे, ज्यांना फोटोच्या दर्जा चांगलाच हवा असतो, म्हणजे प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा आपल्या आवडीविषयी खूप गंभीर असलेले हौशी फोटोग्राफर. कारण अशा वेळेला त्या फोटोचे पैसे मिळणार असतात, किंवा ते फोटो मोठ्या प्रमाणावर लोक बघणार असतात.
नाहीतर काही लोकांसाठी तर 'फोटो मधून काहीतरी गोष्ट सांगता आली म्हणजे झालं' एवढंच बास आहे. आणि बऱ्याच वेळेला ते खरंही असतं. कारण शेवटी चांगला फोटो म्हणजे काय, तर फोटो काढणाऱ्याला आणि तो बघणाऱ्याला आनंद मिळाला, तरच तो चांगला फोटो....काय, बरोबर ना !

- प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेलतर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- लेन्सेस - कॅमेर्‍याचा डोळा

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸


Comments

  1. वा! म्हणजे ज्यांना नवीन कॅमेरा/ मोबाईल घ्यायचा असेल त्यांनी नुसताच 'मेगापिक्सेल' चा आकडा बघून घेण्यापेक्षा हा ब्लॉग वाचून घेतला तर ते जास्त फायदेशीर ठरेल!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला