(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)
फोटोग्राफी मध्ये, फोटो चांगला येण्यामध्ये कॅमेरा पेक्षा लेन्सचा वाटा अधिक असतो. पण बाजारात इतक्या कंपन्यांची इतक्या प्रकारची लेन्सेस उपलब्ध आहेत, की कुठलं लेन्स घ्यावं हा खूप गोंधळात पाडणारा प्रश्न आहे. त्यामुळेच आपण 'लेन्सचे प्रकार' ह्याबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत. पण हा एवढा मोठा विषय आहे, की तो आपण 2 पोस्टमध्ये विभागला आहे. मागच्या पोस्टमध्ये आपण 'लेन्सच्या वापरानुसार पडलेले' प्रकार बघितले(मागील पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा :- लेंसेस चे वापरानुसार पडलेले प्रकार).आता ह्या पोस्ट मध्ये आपण 'फोकल लेन्थ नुसार पडलेले' लेन्सचे प्रकार बघणार आहोत.
ह्यासाठी सर्वात आधी 'फोकल लेन्थ' ही संकल्पना समजून घेतली पाहीजे. मागच्या पोस्टमध्ये आपण बघितलं, प्रत्येक लेन्स मध्ये ज्या अंतरगोल आणि बहिर्गोल काचा/भिंगे वापरलेली असतात, त्यांच्या रचनेमुळे लेन्स मध्ये एक बिंदू असा असतो, जिथे आत येणारा सर्व प्रकाश केंद्रित होतो. त्याला 'फोकल पॉईंट' म्हणतात.
कॅमेऱ्याच्या सेन्सरपासून अशा फोकल पॉईंट पर्यंत जे अंतर असतं, त्याला त्या लेन्सची 'फोकल लेन्थ' म्हणतात आणि ती 'mm' (मिलिमीटर) मध्ये दर्शवली जाते. प्रत्येक लेन्सच्या बाबतीत ही फोकल लेन्थ वेगवेगळी असते, अगदी 8 मिमी पासून 1200 मिमी पर्यंत. ही किंमत जेवढी कमी, तेवढं वाईड लेन्स जास्त समोरचं दृश्य आपल्याला टिपता येतं. आणि जेवढी ही किंमत जास्त, तेवढं झूम जास्त आणि समोरच्या दृश्यातील ठराविक भाग पाहता येतो.
फोकल लेन्थ नुसार लेन्सेसचे 5 प्रकार आहेत. अल्ट्रा वाईड अँगल / फिश आय लेन्स (Ultra wide angle / fish eye lens), वाईड अँगल लेन्स (Wide angle lens), स्टॅंडर्ड लेन्स (Standard lens), टेलीफोटो लेन्स (Telephoto lens) आणि सुपर टेलीफोटो लेन्स (Super telephoto lens).
आता हे प्रकार सविस्तर पाहुयात.
1) अल्ट्रा वाईड अँगल / फिश आय लेन्स
(Ultra wide angle / fish eye lens)
 |
फिश आय लेन्सने काढलेला फोटो
|
'8 ते 16 mm' ह्या फोकल लेन्थ मधील लेन्सेस ही अल्ट्रा वाईड लेन्सेस (Ultra wide lenses) म्हणून ओळखली जातात. कारण त्यामध्ये आपल्याला समोरच्या दृश्याचा खूपच रुंद भाग बघता येतो. पण काही अल्ट्रा वाईड लेन्सेस मध्ये आपल्याला हे दृश्य वर्तुळाकार अवस्थेत दिसतं. असं असेल, तर त्या लेन्स ला 'फिश आय लेन्स' (Fish eye lens) म्हणतात. वर दाखवलेल्या फोटोत आपण ते पाहू शकतो. लेन्सचे फोटो बघायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा :-
Canon 8-15 mm Fish eye lens
ह्या लेन्सेस मध्ये सर्वात समोरचं भिंग हे बहिर्गोल असतं त्यामुळे येणाऱ्या फोटो मधला कडेचा भाग हा वाकल्या सारखा किंवा ताणल्यासारखा दिसतो. हा परिणाम कमी करण्यासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वाईड अँगल लेन्समध्ये जवळच्या गोष्टीसुद्धा लांब असल्यासारख्या दिसतात. त्यामुळे ह्याचा वापर करून कलात्मक फोटो काढता येतात.
अल्ट्रा वाईड अँगल लेन्सेस (Ultra wide angle lenses) ही लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography), आर्किटेक्चर / इंटेरियर फोटोग्राफी (Architecture / Interior photography), क्रिएटिव्ह फोटोग्राफी (Creative photography), ऍस्ट्रो फोटोग्राफी (Astro photography) (म्हणजे अवकाशाचे फोटो काढणे) ह्या साठी वापरता येतात.
अशा काही उत्तम अल्ट्रा वाईड अॅंगल लेन्स आणि फीश आय लेन्स च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.
2) वाईड अँगल लेन्स
(Wide angle lens)
'16 ते 35 mm' ह्या फोकल लेन्थ मधील लेन्सेस ही वाईड अँगल लेन्सेस (Wide angle lenses) म्हणून ओळखली जातात. वरच्या फोटोमध्ये लेन्सवर '10-18 mm' ही फोकल लेन्थ दिसत आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल, की '10 mm ही फोकल लेन्थ तर अल्ट्रावाईड लेन्स ची आहे ना? मग हे वाईड अँगल लेन्स कसं काय?' तर त्याचं उत्तर असं आहे, की फोटोमध्ये दिसणारं लेन्स हे क्रॉप सेन्सर कॅमेऱ्यासाठी आहे. म्हणजे इथे फोकल लेन्थ 10 mm जरी दिसत असली, तरी प्रभावी फोकल लेन्थ ही 16 mm आहे. त्यासाठी क्रॉप फॅक्टर (Crop factor) ही संकल्पना काम करते , जी आपण पुढच्या कुठल्यातरी पोस्टमध्ये बघुयात. सध्या एवढा संदर्भ पुरेसा आहे.
ह्यामध्ये समोरचं दृश्य भरपूर रुंद दिसतं, पण अल्ट्रावाईड अँगल मध्ये दिसतं तेवढं नाही. कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून जर 18 mm वर आणि 10 mm वर फोटो काढला, तर समोरचं दिसणारं दृश्य कसं बदलतं, ह्यासाठी खालील फोटो बघा.
 |
18 mm आणि 10 mm फोकल लेंथ वर काढलेले फोटो
|
अशी वाईड अँगल लेन्सेस (Wide angle lenses) लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography), आर्किटेक्चर फोटोग्राफी (Architecture photography), इव्हेंट फोटोग्राफी (Event photography), आणि कधी कधी कलात्मक पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait photography), ऍस्ट्रो फोटोग्राफी (Astro photography) (म्हणजे अवकाशाचे फोटो काढणे) ह्या साठी वापरली जातात.
अशा काही उत्तम वाईड अॅंगल लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.
3) स्टॅंडर्ड लेन्सेस
(Standard lenses)
'35 ते 70 mm' ह्या फोकल लेन्थ मधील लेन्सेस स्टॅंडर्ड लेन्सेस (Standard lenses) असतात. नावाप्रमाणेच, आपल्या डोळ्याला साधारणपणे ज्या प्रमाणात समोरचं जग दिसतं, अंदाजे त्याच प्रमाणात ह्या लेन्समधून काढलेले फोटो आपल्याला दिसतात. त्यामुळे ह्या लेन्सचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. असं 60 mm चं प्राईम लेन्स आणि 24-70 mm चं झूम लेन्स आपण वरच्या फोटोत पाहू शकतो.
प्राईम किंवा झूम अशा दोन्ही प्रकारची लेन्सेस ह्या फोकल लेन्थ मध्ये उपलब्ध आहेत. स्टँडर्ड लेन्स प्रकारात सध्या 24-70 mm, 28-75 mm ही लेन्सेस खूप जास्त लोकप्रिय आहेत. कारण ही लेन्सेस अशी आहेत, की त्यातलं कुठलंही एकच लेन्स वापरून सुद्धा जवळपास 90% काम करता येते.
ह्या लेन्सेसचा वापर इव्हेंट फोटोग्राफी (Event photography), वेडिंग फोटोग्राफी (Wedding photography), प्रोडक्ट फोटोग्राफी (Product photography), पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait photography), ई. कामांमध्ये होतो.
अशा काही उत्तम स्टँडर्ड लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.
4) टेलीफोटो लेन्स
(Telephoto lens)
'70 ते 300 mm' ह्या फोकल लेन्थ मधील लेन्सेस टेलीफोटो लेन्सेस (Telephoto lenses) म्हणून ओळखली जातात. फोकल लेन्थ जशी वाढेल, तशी ह्या लेन्सेसची लांबी वाढत जाते. टेलीफोटो लेन्स जर झूम लेन्स असेल, तर त्याचं वजन सुद्धा जास्त असतं. असं 70-200 mm लेन्स (लेन्स हूड सहित) आपण वरच्या फोटो मध्ये पाहू शकतो.
जेव्हा लेन्सची फोकल लेन्थ जास्त असते, तेव्हा बॅकग्राऊंड मुख्य सब्जेक्टच्या जवळ आल्याचा भास होतो. त्यामुळे नेहमी दिसणाऱ्या दृश्यापेक्षा एक वेगळंच दृश्य बघायला मिळतं. ह्याचा वापर लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography) मध्ये कलात्मकरित्या करता येतो.
अशी टेलीफोटो लेन्सेस पोर्ट्रेट फोटोग्राफी (Portrait photography), इव्हेंट फोटोग्राफी (Event photography) आणि काही ठराविक प्रमाणात स्पोर्ट्स फोटोग्राफी (Sports photography), वाईल्ड लाईफ फोटोग्राफी (Wild life photography) आणि लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography) साठी वापरली जातात.
अशा काही उत्तम टेलीफोटो लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.
5) सुपर टेलीफोटो लेन्सेस
(Super telephoto lenses)
'300 mm पेक्षा जास्त' फोकल लेन्थ असणारी लेन्सेस ही सुपर टेलीफोटो लेन्सेस असतात. हया लेन्सेसचा आकार मोठा असतो आणि वजनही जास्त असतं. असं एक लेन्स वरच्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. अशी मोठी आणि जड लेन्सेस थेट कॅमेऱ्याला जोडता येत नाहीत, कारण त्यांच्या वजनाने कॅमेऱ्याला नुकसान पोहोचू शकते.
मग अशावेळेला लेन्सला असलेली ट्रायपॉड कॉलर (Tripod collar) वापरतात. ह्यामुळे थेट लेन्सच ट्रायपॉड वर लावलं जातं आणि कॅमेरा लेन्सला मागे अधांतरी जोडलेला असतो. अजून एक मुद्दा असा, की अशा लेन्सचं वजन जास्त असल्यामुळे त्याला नेहमीचे साधे ट्रायपॉड चालत नाहीत. त्यासाठी जास्त स्थिर असणारे आणि सहज सेटिंग करता येतील, असे जड आणि चांगल्या दर्जाचे ट्रायपॉड वापरावे लागतात. अर्थातच त्यांची किंमतही जास्त असते.
सुपर टेलीफोटो लेन्सेस (Super telephoto lenses) चा वापर प्रामुख्याने स्पोर्ट्स फोटोग्राफी (Sports photography), वाईल्ड लाईफ फोटोग्राफी (Wild life photography), बर्ड फोटोग्राफी (Bird photography) ह्यासाठी केला जातो.
अशा काही उत्तम सुपर टेलीफोटो लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.
ह्या सगळ्या माहितीवरून आता तुम्हाला कळलं असेल, की फोटोग्राफीचा छंद किंवा व्यवसाय खर्चिक होण्याचं मुख्य कारण काय आहे. शिवाय एखादं काम करताना वेगवेगळी लेन्सेस का वापरावी लागतात, हेही स्पष्ट झालं असेल. त्यामुळे आता पुढच्या वेळेला तुम्ही एखाद्या कामासाठी फोटोग्राफर ला बोलावलंत, तर त्यांच्याकडे असणाऱ्या लेन्सेसची थोडी माहिती आपल्यालाही आहे ह्याचा आनंद नक्कीच तुम्हाला मिळेल.
कारण, 'ज्ञान हे कधीच वाया जात नाही'.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
'फोटो एडिटिंग करावे का नाही ?'
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸
Informative 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete👍🏻🙂
Deleteलेख खूप मस्त आहे. लेन्सेस badaal इतक्या सोप्या भाषेत सांगितले आहे की वाचायला खूप मस्त वाटले.
ReplyDelete