आपल्या डोळ्याचं आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. सभोवताली असणारं जग पाहण्याची अत्यंत आनंदाची क्रिया ही फक्त डोळ्यांमुळेच होऊ शकते. शिवाय आत्ता तुम्ही जी पोस्ट वाचत आहात, ती सुद्धा डोळ्यांच्याच मदतीने. समोर असणारा प्रकाश शरीराच्या आत आणून त्याच्यावर प्रक्रिया घडवून आणल्यामुळे आपल्याला माहितीचे ज्ञान होते.
असंच महत्वाचं काम लेन्सचं कॅमेऱ्यामध्ये आहे. सेन्सर प्रकाश गोळा करायचं काम करतो, तर तो प्रकाश सेन्सर वर एकत्रित करण्याचं काम लेन्स करते. ह्याच प्रक्रियेची माहिती आज आपण घेणार आहोत.
आपण फोटो केव्हा काढतो? जेव्हा आपल्याला समोर चालू असलेला क्षण जपून ठेवावासा वाटतो, आपल्यासाठी तो खूप महत्वाचा असतो किंवा जेव्हा आपण तो दुसऱ्यांना दाखवू इच्छितो. अशा वेळेला लेन्सचं काम सुरू होतं. मुळात फोटो काढण्याची प्रक्रिया ही लेन्स पासूनच सुरू होते.
लेन्सचे काही महत्वाचे भाग असतात. ते म्हणजे काचांचा संच (Glass elements in groups), अपर्चर (Aperture), इमेज स्टॅबिलायझेशन साठीची प्रणाली (Image stabilization system), ऑटो फोकस साठीची प्रणाली (Auto focussing system), फोकस रिंग आणि झूम रिंग (Focus ring and Zoom ring), लेन्स कॅप (lens cap), लेन्स हूड (lens hood), वेदर सिलिंग (weather sealing), आणि ट्रायपॉड/लेन्स कॉलर (Tripod or lens collar) आता या सर्वांची माहिती घेऊयात.
1) काचांचा संच (Glass elements in groups)
प्रत्येक लेन्स मध्ये अंतरगोल आणि बहिर्गोल काचांचा संच असतो (वर चित्रात दाखवल्याप्रमाणे). लेन्सच्या प्रकारानुसार आणि दर्जानुसार त्यात कमी जास्त संख्येत काचा बसवलेल्या असतात. त्यांची रचना अशी असते, की प्रकाशाचा प्रत्येत किरण आपल्याला पाहिजे तसाच कॅमेऱ्याच्या आत यावा आणि सेन्सर वर पडावा. वेगवेगळ्या काचांमधून प्रवास करूनसुद्धा ह्या प्रकाशाच्या किरणांचा दर्जा चांगला रहावा, ह्यासाठी त्यातील काही काचांवर केमिकल कोटिंग केलेलं असतं. ह्यामुळे लाईट रिफ्रॅक्शन (light refraction) कमी व्हायला मदत होते. शिवाय प्रकाशाचा पोत सुद्धा चांगलाच राहतो.
2) अपर्चर (Aperture)
अपर्चर म्हणजे लेन्स मध्ये प्रकाशासाठी असणारा दरवाजा. लेन्सच्या कॅमेऱ्याकडे असणाऱ्या मागच्या भागामध्ये अपर्चर असते. फोटोमध्ये किती प्रकाश पाहिजे, त्यावरून ते आपल्याला लहान मोठे करता येते. आपल्या डोळ्यामध्ये बुबुळ जे काम करते, तेच प्रकाश नियंत्रित करण्याचं काम लेन्समध्ये अपर्चर करते. हे अपर्चर काही पातळ पात्यांपासून बनलेले असते. कधी 7 तर कधी 9 पाती मिळून अपर्चर लहान मोठं करतात. वरच्या फोटोमध्ये बघून तुम्हाला ह्याची कल्पना येईल.
3) इमेज स्टॅबिलायझेशन ची प्रणाली (Image stabilisation system)
फोटो काढताना आपल्या हाताच्या छोट्या छोट्या हालचालींमुळे फोटो ब्लर किंवा हललेला येऊ नये, ह्यासाठी इमेज स्टॅबिलायझेशन (Image stabilisation) सिस्टीम काम करत असते. ह्यासाठी लेन्स मध्ये एक काच अशी बसवलेली असते, की ती आपल्याला इकडे तिकडे हलवता येऊ शकते. फोटो काढताना कॅमेरा ज्या बाजूला हलतो, त्याच्या विरुद्ध बाजूला ही काच लेन्स कडून हलवली जाते (विरुद्ध बाजूला ह्यासाठी, की लेन्स मधून तयार होणारी प्रतिमा ही उलटी असते.). ह्यामुळे आपल्या हातामुळे होणारी हालचाल फोटोमध्ये दिसत नाही आणि फोटो शार्प येतो.
4) ऑटो फोकस साठी प्रणाली (Auto focus system)
ऑटो फोकस हा एवढा मोठा विषय आहे, की तो असा एका पॅरेग्राफ मध्ये पूर्ण समजावता येणार नाही. तरीही थोडक्यात सांगायचं झालं तर, ऑटो फोकस म्हणजे कॅमेऱ्याचा सेन्सर आधी हे बघतो, की मुख्य सब्जेक्ट फोकस मध्ये आहे का नाही आणि नसेल तर तो फोकस मध्ये आणायला काय करावं लागेल. त्यानंतर ही माहिती/गणना लेन्स ला पुरवली जाते आणि त्यानुसार लेन्स त्याच्यातील काचा/भिंग पुढे मागे करून मुख्य सब्जेक्ट ला फोकस मध्ये आणते. ह्यासाठी PDAF (Phase Detection Auto Focus) 'फेज डिटेक्शन ऑटो फोकस', CDAF (Contrast Detection Auto Focus) 'कॉन्ट्रास्ट डिटेक्शन ऑटो फोकस', Lesar AF (Lesar Auto Focus) 'लेझर ऑटो फोकस' असे प्रकार उपलब्ध आहेत. ह्यापैकी PDAF हा सगळ्यात चांगला आणि प्रगत प्रकार आहे.
5) फोकस रिंग आणि झूम रिंग (Focus ring and Zoom ring)
प्रत्येक लेन्समध्ये फोकस रिंग असतेच. आपल्याला फोटो काढायचा आहे ती व्यक्ती, वस्तू किंवा जागा फोकस मध्ये आणण्यासाठी फोकस रिंग वापरतात. ती जेवढी अलगद फिरत असेल तेवढं चांगलं, कारण त्यामुळे आपल्याला एकदम अचूक फोकस करता येतं.
ज्या लेन्सेस मध्ये झूम करण्याची सोय असते, त्यामध्ये झूम रिंग बसवलेली असते. झूम रिंग जर सहज फिरत असेल, तर व्हीडीओ च्या कामामध्ये त्याचा चांगला वापर होऊ शकतो. लेन्स झूम करण्यासाठी झूम रिंग किती फिरवावी लागते, हेही महत्वाचं असतं, कारण त्यावरून वापरण्यातील सहजता ठरते.
वरच्या फोटोमध्ये दोन्ही रिंग दाखवलेल्या आहेत. कॅमेराची कंपनी आणि लेन्स चा प्रकार हयानुसार ह्यांची जागा मागे पुढे होऊ शकते.
6) लेन्स कॅप (Lens cap)
नावावरूनच ह्याचा अर्थ आपल्याला कळतो. लेन्स कॅप ला आपण लेन्सचं झाकण म्हणू शकतो. लेन्स वापरून झाल्यावर त्याच्या काचेवर धूळ बसू नये किंवा त्याला इजा पोहोचू नये, ह्यासाठी त्याला लेन्स कॅप नी झाकलं जातं. लेन्स ची समोरची जी काच असते, त्याच्यावर काही केमिकल कोटिंग केलेले असतात, जेणेकरून येणारा प्रकाश चांगल्या दर्जाचा राहील. ह्यामुळे फोटो शार्प आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य येण्यास मदत होते.
जर लेन्स कॅप नसेल, तर ह्या काचेवर काहीतरी सांडून किंवा चिकटून ती कायमस्वरूपी खराब हाऊ शकते. समजा समोरच्या काचेवर एखादा डाग पडला, तर तो प्रत्येक फोटोमध्ये दिसतो आणि फोटो खराब करतो. शिवाय जेव्हा आपण लेन्स बॅग मध्ये ठेवतो, तेव्हा कॅप लावली नसेल तर काही टोकदार वस्तू लागून त्या काचेवर ओरखडा पडू शकतो. त्यामुळे काम झाल्यावर लेन्स कॅप लावणे खूप महत्वाचे आहे.
7) लेन्स हूड (Lens hood)
आपण उन्हात गेल्यावर आपल्या डोळ्यावर ऊन येतं म्हणून आपल्याला डोळे बारीक करावे लागतात आणि समोरचं नीट दिसत नाही. अशा वेळेला आपण आपला हात डोळ्याच्या वर धरतो किंवा टोपी वापरतो ज्याच्यामुळे ऊन थेट आपल्या डोळ्यावर पडत नाही. शिवाय ह्यामुळे आपल्याला दिसत असलेल्या दृश्याचा वरचा भाग म्हणजे एकदम प्रखर असलेलं आकाश आता दिसत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला समोरचं नीट क्लियर दिसतं.
लेन्स हूड सुद्धा लेन्स च्या बाबतीत अगदी हेच काम करतं. समोरच्या दृश्याचा फोटो काढत असताना बाजूने येणाऱ्या प्रकाशामुळे मुख्य फोटो मध्ये प्रखरता, धूसरपणा येऊ शकतो. अशा मुळे फोटो पाहिजे तेवढा क्लियर येत नाही आणि त्याचा कॉन्ट्रास्ट सुद्धा कमी होतो. लेन्स हूड हे प्रत्येक प्रकारच्या लेन्स साठी वेगवेगळ्या आकाराचे असते. म्हणजे लेन्स वाईड अँगल आहे (wide angle lens), का स्टँडर्ड आहे (Standard lens) का टेलीफोटो आहे (Telephoto lens), ह्यावरून ते ठरते. जेव्हा आपण लेन्स हूड लेन्सवर लावतो, तेव्हा नको असलेल्या कडेच्या भागातून येणारा थेट प्रकाश रोखला जातो आणि फोटो चांगला येतो.
8) वेदर सिलिंग (Weather sealing)
धूळ आणि पाणी हे लेन्सचे शत्रू आहेत. ते लेन्सच्या आत गेले, की लेन्स खराब झालंच म्हणून समजा. काही वेळेला आपल्याला अशा ठिकाणी फोटो काढावे लागतात, जिथे निसर्गाची स्थिती आपल्याला पाहिजे तशी नसते. हवेत खूप धूळ असते किंवा पाऊस पडत असतो. अशा वेळेला वेदर सिलिंग (Weather sealing) असलेली लेन्सेस खूप महत्वाची ठरतात. कारण त्याच्यामुळे धूळ आणि पाणी लेन्सच्या आत जात नाही.
ह्यासाठी लेन्स
ज्या ठिकाणी कॅमेऱ्याला जोडले जाते, तिथे एक चांगल्या
दर्जाच्या रबरची छोटी रिंग बसवली जाते (वरच्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे), जेणेकरून जेव्हा
आपण लेन्स कॅमेऱ्याला जोडून वापरत असू, तेव्हा ती जागा
पूर्ण पणे बंदिस्त व्हावी. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वाफ बाहेर जाऊ
नये म्हणून कुकर मध्ये रिंग लावतात, साधारण तीच
पद्धत. शिवाय झूम करताना लेन्स जर लहान मोठे होत असेल, तर ते हालचाल
होणारे भाग असे काही जोडलेले असतात, की धूळ आणि पाणी
आत जाऊ शकत नाही.
पण इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की जी लेन्सेस वॉटरप्रूफ आहेत अशी सांगितली जातात, ती खरंतर 'स्प्लॅश प्रूफ' (Splash proof) असतात. म्हणजे ती फक्त वरून पडणाऱ्या पाण्याला सांभाळू शकतात. पण जर ती अगदी पाण्यातच पडली तर मग दुरुस्तीला भरपूर खर्च करावा लागेल, ह्याची तयारी ठेवा.
9) ट्रायपॉड किंवा लेन्स कॉलर (Tripod or lens collar)
काही लेन्सेस बघितल्यावर आपल्याला 'नाकापेक्षा मोती जड' ही म्हण आठवते. कारण ही लेन्सेस कॅमेऱ्यापेक्षा खूप जास्त मोठी असतात. ही सगळी टेलीफोटो लेन्सेस (Telephoto lenses) असतात जी वाईल्डलाईफ फोटोग्राफी (Wildlife photography) साठी वापरली जातात. त्यांचे वजनही 1.5 किलोपासून 4.5 किलोपर्यंत असते, तर सगळ्यात मोठा कॅमेरा हा जास्तीत जास्त 1.5 किलोचा असतो.
अशा वेळेला जास्त वजनाचे लेन्स कॅमेऱ्याला लावून जर कॅमेरा ट्रायपॉड वर लावला, तर लेन्स जिथे कॅमेऱ्याला जोडलेले आहे, तिथे कॅमेऱ्याला नुकसान होऊ शकते. म्हणून अशी जी वजनदार लेन्सेस असतात, त्यांना स्वतःच्या ट्रायपॉड कॉलर किंवा लेन्स कॉलर असतात. म्हणजे जेव्हा ही लेन्सेस कॅमेऱ्यावर लावली जातात आणि जेव्हा ट्रायपॉड वापरायचा असतो, तेव्हा थेट लेन्सच ट्रायपॉड वर लावले जाते आणि मागे कॅमेरा अधांतरी असतो. कारण इथे कॅमेरा लेन्सचं वजन सांभाळू शकत नसला, तरी लेन्स कॅमेऱ्याचं वजन सहज सांभाळू शकते.
ह्याचा वापर स्पोर्ट्स फोटोग्राफी (Sports photography) आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी (Wildlife photography) मध्ये होतो, जिथे लांबून फोटो काढण्यासाठी मोठी आणि वजनदार झूम लेन्सेस वारावी लागतात.
प्रत्येक लेन्समध्ये काचांचा संच (Glass elements), अपर्चर (Aperture), फोकस रिंग (Focus ring) आणि लेन्स कॅप (Lens cap) एवढे चार भाग तर नक्कीच असतात, कारण त्याशिवाय कुठलंही लेन्स पूर्ण होऊच शकत नाही. पण वर पाहिलेली बाकीची सगळी वैशिष्ट्ये ही काही ठराविक लेन्सेस ना असतात आणि त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. पण जास्त पैसे देऊन तुम्हाला जी वापरातील सहजता मिळते आणि फोटोचा जो दर्जा मिळतो, त्याला तोड नाही.
अशा प्रकारे अनेक भाग असलेलं लेन्स, हे प्रत्येक प्रकारचं काम लक्षात घेऊन बनवलेलं आहे. आणि भविष्यातही त्यात नवीन नवीन वैशिष्ट्यांची भर पडेल अशी आशा आहे. कारण शेवटी फोटोग्राफी करताना आनंद मिळणे महत्वाचे. त्यासाठीच तर सगळं चाललं आहे....
बरोबर आहे ना?
ह्यातील कुठले भाग तुम्हाला माहीत होते किंवा नव्हते, ते मला नक्की सांगा. अजून काही भाग किंवा वैशिष्ट्ये राहिलेली असतील, तर त्याबद्दल सुद्धा सांगा. त्याची माहितीही तुम्हाला नक्की मिळेल, ह्याची खात्री देतो.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट:- लेन्सेसचे प्रकार
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸
Ek number
ReplyDelete🙂🙏
DeleteMast
ReplyDelete🙂👍🏻
DeleteInformative 🤗
ReplyDelete😌🙏
Deleteबापरे! हे म्हणजे 'ऐकावे ते नवलच!' असं झालं! प्रत्येक ब्लॉग गणिक कॅमेराच्या विषयी आणि त्याचे वेगवेगळे पार्टस् आणि त्यांच फंक्शनिंग या बद्दल खूप सोप्या भाषेत माहिती मिळते आहे. आता या माहितीचा उपयोग करून मी स्वत: माझ्या मोबाईल कॅमेराचे वेगवेगळे सेटींगस् ट्राय करून बघत आहे. हे फोटोज् माझ्या इंस्टाग्रामवर (@akshay_5703) अपलोडही केले आहेत. तरी एकदा मोबाईल फोटोग्राफीचा कोर्स करायला आवडेल!🙂
ReplyDeleteवा छान....शुभेच्छा 😀👍🏻
Deleteनेहमीप्रमाणे छानच!!
ReplyDelete😌🙏
DeleteSir khup help hote ahe tumchay blog mule
ReplyDelete