लेन्सेसचे विविध प्रकार - भाग १


Types of camera lenses explained in Marathi language

(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)

फोटोग्राफी ही एक अशी कला आहे, जी फक्त एक छंद म्हणून जोपासली जाऊ शकते किंवा नीट अभ्यास आणि विचार केला, तर त्या कलेचं रूपांतर एका मोठ्या व्यवसायात सुद्धा होऊ शकतं. फक्त एवढं नक्की आहे, की दोन्ही प्रकारात हे खूप 'खर्चिक' प्रकरण आहे. खर्चिक ह्यासाठी, की चांगला कॅमेरा घेण्यासाठी खर्च तर करावाच लागतो, पण त्याचा पुरेपूर वापर करून त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी, तेवढ्याच चांगल्या दर्जाची आणि ताकदीची वेगवेगळी लेन्सेसही घ्यावी लागतात.
    पण ही वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस का घ्यावी लागतात? एकच लेन्स घेऊन आपण फोटो काढू शकत नाही का? नसेल तर तसं का आहे? ह्या बाबतीतच ही पोस्ट आहे. 'लेन्सेस चे प्रकार'.
लेन्सचे प्रकार हे समजायला सोप्या अशा 2 भागांत विभागले जाऊ शकतात. 
1) लेन्सच्या वापरानुसार पडलेले प्रकार
2) फोकल लेन्थ नुसार पडलेले प्रकार
    हा विषय खूप मोठा आणि महत्वाचा असल्यामुळे, ह्यातला फक्त पहिला भाग म्हणजे 'लेन्सच्या वापरानुसार पडलेले प्रकार' हे आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत. दुसरा भागाची सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या पोस्टमध्ये मिळेल. 

    सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे 'जगातील कुठलंही एक लेन्स हे सर्वच्या सर्व प्रकारचे फोटो काढण्यासाठी वापरता येत नाही'. म्हणूनच अशा वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येक लेन्स तयार केलेलं असतं. आपण जे काम करतो, किंवा आपल्याला जसे फोटो काढायचे आहेत, त्यानुसार आपल्याला लेन्सची निवड करावी लागते. 
    हे प्रकार बघण्याआधी, 'फोकल लेन्थ' ही संकल्पना समजून घेतली पाहिजे, कारण प्रत्येक लेन्सच्या बाबतीत ती किंमत वेगवेगळी असते. प्रत्येक लेन्स मध्ये ज्या अंतरगोल आणि बहिर्गोल काचा/भिंग वापरलेली असतात, त्यांच्या रचनेमुळे लेन्स मध्ये एक बिंदू असा असतो, जिथे आत येणारा सर्व प्रकाश केंद्रित होतो. त्याला 'फोकल पॉईंट' म्हणतात.
    कॅमेऱ्याच्या सेन्सरपासून अशा फोकल पॉईंट पर्यंत जे अंतर असतं, त्याला त्या लेन्सची 'फोकल लेन्थ' म्हणतात. हे अंतर 8 मिमी पासून 1200 मिमी पर्यंत असू शकते. 
आता लेन्सचे वापरानुसार पडलेले प्रकार बघुयात.

1) झूम लेन्स (Zoom lens)
Zoom lenses for camera explained in Marathi language

    नावाप्रमाणेच, हे लेन्स वापरताना आपण झूम करून लांबच्या वस्तूंचे फोटो सुद्धा काढू शकतो. ही लेन्सेस झूम केल्यावर कधी कधी त्यांचा आकार वाढू शकतो. वरच्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे, ह्या लेन्सेस वर त्यांची झूम ची क्षमता लिहिलेली असते. ती 'mm' मध्ये असते, ज्यामुळे आपल्याला लेन्सची फोकल लेन्थ कळते. उदाहरणार्थ, 10-18 mm, 24-70 mm, 70-200 mm, ई. 
    ह्या लेन्सेस मध्ये जास्त काचा असतात, जेणेकरून वेगवेगळ्या फोकल लेन्थ ला (म्हणजे जवळचे, थोडं लांबचे किंवा खूप लांबचे ) फोटो काढता येतात. पण अशा जास्त काचा असल्यामुळे, येणाऱ्या प्रकाशाला जास्त वेळा त्यातून प्रवास करावा लागतो, त्यामुळे फोटोचा दर्जा कमी होऊ शकतो. पण आजकालच्या नवीन तंत्रज्ञानामुळे शक्यतो असं होतं नाही. फोटो उत्तमच येतो.
    झूम लेन्सचा फायदा म्हणजे, एकाच जागेवर थांबून आपण वेगवेगळ्या अंतरावरचे फोटो काढू शकतो. म्हणजे एकाच ठिकाणी थांबून सुद्धा, लांब असलेल्या माणसाचा पूर्ण फोटो, कंबरेपासून वरचा फोटो किंवा त्याचा फक्त चेहरा दिसेल असा फोटो काढू शकतो. 
    झूम लेन्सचा तोटा एकच आहे, की शक्यतो ती आकाराने मोठी आणि वजनाने जड असतात. शिवाय जर लेन्स झूम केल्यावर त्याची लांबी वाढत असेल, तर त्यात असणाऱ्या सरकणाऱ्या भागांमुळे धूळ किंवा आर्द्रता आत जाण्याची शक्यता असते. अशावेळी काळजी घ्यायला हवी. 
    अशा काही उत्तम झूम लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता. 

2) प्राईम लेन्स (Prime lens)
Prime lenses for camera explained in Marathi language

    झूम लेन्सच्या बरोब्बर उलट ह्याचं काम असतं. म्हणजे ह्यामध्ये झूम करण्याची सोय नसते. प्राईम लेन्सेस ही फक्त एकाच फोकल लेन्थ साठी बनलेली असतात. ही फोकल लेन्थ लेन्स वर 'mm' च्या माध्यमात लिहिलेली असते. वरच्या फोटोत आपण ते पाहू शकतो.
    प्राईम लेन्सनी काढलेले फोटो खूप शार्प येतात. त्याचं कारण असं, की झूम करायचं नसल्यामुळे, त्यात कमी काचा वापरल्या जातात आणि त्यामुळेच येणाऱ्या प्रकाशाला कमी वेळा काचांमधून प्रवास करावा लागतो. म्हणूनच फोटोचा दर्जा खालावत नाही. 
    प्राईम लेन्सचा अजून एक फायदा म्हणजे, ह्यामध्ये कमी काचा असल्यामुळे लेन्सचा आकार आणि वजन, झूम लेन्स पेक्षा कमी असतं. ह्यामुळेच, 'बॅकग्राउंड जास्त ब्लर करण्यासाठी लागणारं मोठं अपर्चर' प्राईम लेन्स मध्ये वापरता येतं, जे झूम लेन्स मध्ये शक्य होत नाही. अपर्चर हा वेगळा विषय आहे, तो आपण पुढच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत. 
प्राईम लेन्सचा तोटा म्हणजे, एकच फोकल लेन्थ असल्यामुळे ही लेन्सेस वापरताना विविध अंतरावरचे फोटो काढायचे असतील, तर आपल्याला स्वतःला मागे पुढे जावं लागतं. म्हणजे असं समजा, की लांब असणाऱ्या वस्तूचा फोटो काढायचा आहे पण पुढे प्रवेश बंद आहे, किंवा पूर्ण फोटो घ्यायचा आहे पण मागे भिंत असल्यामुळे अजून मागे जाऊ शकत नाही, ई. परिस्थिती मध्ये एकच प्राईम लेन्स वापरता येत नाही. अशा वेळेला झूम लेन्सचा फायदा होतो. 
    अशा काही उत्कृष्ट प्राईम लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.

3) मॅक्रो लेन्स (Macro lens)
Macro lenses for camera and life size macro concept  explained in Marathi language

    ही लेन्सेस एकदम छोट्या गोष्टीचे एकदम मोठे फोटो काढण्यासाठी बनवलेली असतात. आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की मुंगी, कोळी, असे छोटे कीटक, किंवा पानांवर पडलेले थेंब, पेनची निब, ई. वस्तूंचे स्क्रीन भरून मोठे फोटो काढलेले असतात. ते मॅक्रो लेन्सनीच काढलेले असतात. 
    मॅक्रो लेन्स मध्ये अशी रचना केली जाते, की आपण खूप जवळच्या वस्तूंवर फोकस करू शकतो. म्हणजे लेन्सच्या पुढे अगदी 2-3 cm वर असणाऱ्या वस्तूंवर सुद्धा. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांनी त्या वस्तू जेवढ्या जवळून बघू शकतो, त्यापेक्षाही जवळून ह्या लेन्समधून बघितल्यामुळे, खूप मोठ्या दिसतात. 
    कुठलंही मॅक्रो लेन्स हे 'True macro' लेन्स तेव्हाच असतं, जेव्हा त्याचा मॅग्नीफिकेशन रेशो (Magnification ratio) हा 1:1 असतो. वरच्या लेन्सच्या फोटो मध्ये ही '1:1' संख्या दिसत आहे. म्हणजे एखादी वस्तू खऱ्या जगात जेवढ्या आकाराची आहे, तेवढाच आकार ती सेन्सर वर व्यापते. म्हणजे 1 सेमी आकाराच्या वस्तूचा सगळ्यात जवळून फोटो काढला, तर ती वस्तू कॅमेऱ्याच्या सेन्सरवर 1 सेमी एवढीच जागा व्यापते. ह्याला 'लाईफ साईज मॅक्रो' (Life size macro) असंही म्हणतात. खालच्या फोटोमध्ये आपण साध्या लेन्सनी काढलेला फोटो आणि खास मॅक्रो लेन्सनी काढलेला फोटो ह्यात फरक बघू शकतो. 

Normal and macro photo of Indian Rupee coin compared

        ह्याचाही पुढे जाऊन 1:5 गुणोत्तर असलेली लेन्स उपलब्ध आहेत. म्हणजे वस्तू जेवढी आहे त्यापेक्षा पाचपट मोठी दिसते. पण असं लेन्स वापरण्यासाठी खूपच जास्त कौशल्य आणि मोठा सेटअप लागतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्व मॅक्रो लेन्स ही प्राईम लेन्स आहेत, म्हणजे त्यांना एकच फोकल लेन्थ असते. हे आपण वरच्या फोटो मध्ये बघू शकतो.
    अशा काही मॅक्रो लेन्सेस च्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला त्यांची माहिती बघायची असेल किंवा ती लेन्सेस घ्यायची असतील, तर त्या लिंक वर जाऊ शकता.

4) टिल्ट शिफ्ट लेन्स (Tilt shift lens)
    हा लेन्सचा एक वेगळाच प्रकार आहे. अगदी ठराविक स्थितीत अगदी मोजक्या फोटोग्राफरकडून अशी लेन्सेस वापरली जातात. ही लेन्सेस प्राईम लेन्स प्रकारात येतात आणि ह्यामध्ये लेन्सचे दोन भाग केलेले असतात. लेन्सचा मागचा भाग कॅमेऱ्याला जोडलेला असताना, पुढचा भाग मात्र आपण आजूबाजूला थोडा सरकवू शकतो किंवा तिरका करू शकतो.
(ह्या लेन्स चे फोटो ह्या लिंकवर जाऊन बघू शकता :-  Samyang 24 mm F3.5 Tilt Shift Lens)
    आता हे कशासाठी केलं जातं, ते समजून घेऊयात. फोटो काढताना आपण ज्या पट्ट्यात किंवा प्लेन मध्ये फोकस करतो, तो फोकसिंग प्लेन हा कॅमेऱ्याला नेहमी पॅरलल म्हणजे समांतर असतो. त्यामुळे काहीही केलं, तरी नेहमी एक आडवा पट्टाच फोकस मध्ये असतो. त्याच्या मागे आणि पुढे असणारा भाग ब्लर असतो. (ह्यासाठी खालच्या फोटोमधला पहिला फोटो बघा.) 
Comparison of photo taken by normal lens and photo taken by Tilt shift lens


    पण समजा आपल्याला तोच व्ह्यू कायम ठेवून, फक्त आडवा पट्टा फोकस मध्ये न घेता, वेगळ्याच तिरक्या पट्ट्यावर फोकस करायचं असेल, तर त्या वेळेला आपल्याला फोकसिंग प्लेन तिरका करावा लागेल. आणि हे सगळं ह्या लेन्स मध्ये करता येतं. (ह्यासाठी वरच्या फोटो मधला दुसरा फोटो बघा.)
आधीच सांगितल्याप्रमाणे, ह्या लेन्सचा उपयोग खूप कमी परिस्थितीत करता येतो. शिवाय इतके हलणारे भाग असणारे लेन्स बनवायचे म्हणजे इंजिनियरिंगचं संपूर्ण कसब पणाला लागतं. त्यामुळे ह्या लेन्सची किंमतही खूप जास्त असते. 

हे झाले लेन्सच्या वापरानुसार असलेले प्रकार. सध्या तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे, की प्रत्येक प्रकारच्या कामासाठी एक विशिष्ट लेन्स उपलब्ध आहे. फक्त ही लेन्सेस घेताना आपला तसा विशिष्ट वापर आहे का आणि खरंच आपल्याला त्या लेन्सची गरज आहे का, ह्याचा विचार प्रत्येकाने करावा एवढीच अपेक्षा. 

लेन्सेसचे बाकीचे प्रकार पुढच्या पोस्ट मध्ये बघुयात. 

- प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- लेन्सेसचे प्रकार (भाग २)

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. छान माहिती!👍🏻👍🏻 एकदा प्रत्यक्ष या लेन्स हाताळायला मिळाल्या की नेमका अंदाज येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदा नक्की व्यवस्था करू ह्याची. 😀👍🏻

      Delete
  2. Technical Things are very good

    ReplyDelete
  3. Jayant Muglikar here from Pradhikaran,Nigdi. Nice blog

    ReplyDelete
  4. नवीन गोष्टी कळल्या...nice one🤗
    -Nikita Jadhav

    ReplyDelete
  5. अतिशय छान विवेचन केले सर....

    अरुण माळी

    ReplyDelete
  6. Very deeply and we'll explain

    ReplyDelete
  7. सुंदर माहिती, आज पहिल्यांदाच हे माहिती झाले

    ReplyDelete
  8. सुंदर माहिती, आज पहिल्यांदाच हे माहिती झाले.
    डॉ सतीश देशमुख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला