फोटो एडिटिंग करणे बरोबर का चूक?

Is photo editing necessary, explained in Marathi language

    आजकाल फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप ई. सोशल मीडियावर आणि एकूणच पूर्ण इंटरनेट वर आपण जे काही बघतो, त्यावरून 'जो दीखता है, वही बिकता है' ह्या म्हणीची प्रचिती येते. कारण प्रत्येक जण आपली वस्तू किंवा सेवा इतरांपेक्षा कशी चांगली आहे, हे दाखवण्याची धडपड करताना दिसतो. त्यासाठी त्या वस्तूचे किंवा सेवेचे जे फोटो-व्हीडीओ तयार केलेले असतात, ते एडिटिंग करण्यावर भर दिला जातो. कारण प्रत्येकाला व्यवसायात प्रगती करायची आहे आणि पैसे कमवायचे आहेत.
    तसंच व्यवसायाव्यतिरिक्त आपण जे वैयक्तिक फोटो इंटरनेट किंवा सोशल मीडियावर बघतो, त्यातही 'मी कसा भारी आहे' हे दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणजे फोटो कितीही साधा असो, त्याला असं काही एडिटिंग करतात की बघणारा भारावून गेला पाहिजे, असाच त्यांचा हट्ट असतो. ह्यातही डोळ्यांना छान वाटणारं आणि डोळ्यांना त्रास देणारं, असं दोन्ही टोकांचं एडिटिंग करणारे लोक आपण रोज पाहतो.

    पण हे सगळं बघताना काही प्रश्न इद्भवतात, जसे की प्रत्येक फोटोला एडिटिंगची गरज असतेच का? किती एडिटिंग केलं म्हणजे जास्त वाटणार नाही? एडिटिंग करणं हे तात्विक दृष्ट्या बरोबर आहे का चूक? असे एक ना अनेक. म्हणून आपण ह्या पोस्ट मध्ये 'फोटो एडिटिंग' ह्या विषयाचे काही पैलू बघणार आहोत. त्यासाठी आपण खालील मुद्द्यांचा आधार घेणार आहोत.
1) फोटो एडिटिंग ह्या प्रक्रियेत नक्की काय काय येतं?
2) प्रत्येक फोटोला एडिटिंग करावंच लागतं का?
3) एडिटिंग किती करावं, म्हणजे अति होणार नाही?
4) एडिटिंग करणे हे बरोबर आहे का चूक?
चला तर मग, ह्याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

1) फोटो एडिटिंग म्हणजे काय?
    फोटो एडिटिंग हा मुद्दा एवढा मोठा आहे की 'फोटो एडिटर' असा एक स्वतंत्र व्यवसाय जगभरात अस्तित्वात आहे. फोटोग्राफर ने फोटो काढल्यानंतर त्या फोटोंचा वापर कसा आणि कुठं करायचा आहे, त्यानुसार ही एडिटर मंडळी त्यावर एडिटिंग करतात.
    एडिटिंग मध्ये बरेच मुद्दे येतात. त्यातले काही बघायचे झाले, तर सर्वांना माहीत असलेलं एडिटिंग म्हणजे फोटोमध्ये कलर, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस आणि शार्पनेस कमी जास्त करणे...बास एवढंच. पण हे अगदीच साधं एडिटिंग झालं, जे कुणीही करू शकतं.
    एडिटिंगची खरी ताकद वापरायची असेल, तर बाकीच्या मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागतं, जसे की बॅकग्राऊंड रिप्लेसमेंट (Background replacement), स्किन स्मूथिंग (Skin smoothing), कलर मॅचिंग (Colour matching), टेक्स्चर मॅचिंग (Texture matching), ब्लेंडिंग (Blending), फ्रिक्वेन्सी सेपरेशन (Frequency separation), सिलेक्टिव्ह ऍडजस्टमेंट (Selective adjustment), फोटो मॅनिप्युलेशन (Photo manipulation), ई. हे सगळे प्रगत एडिटिंग मध्ये येतात.
    अगदी थोडक्यात सांगायचं झालं, तर कामाच्या आवाक्यानुसार एडिटिंगचे दोन प्रकार करता येतील.
1) काढलेल्या फोटोत जेवढं चुकीचं आहे किंवा जे नको आहे, फक्त ते आणि तेवढंच काढून टाकणे.
2) वेगवेगळ्या फोटोंमधून ठराविक भाग घेऊन त्याचा एक नवीन फोटो तयार करणे. (ह्याला फोटो मॅनिप्युलेशन म्हणतात.)
    प्रत्येक फोटोनुसार ह्यातलं कुठलं एडिटिंग योग्य ठरेल, ते केलं जातं.

2) एडिटिंग करावंच लागतं का?
    प्रत्येक जण ह्याचं वेगवेगळं उत्तर देईल. कारण शेवटी ही एक कला आहे आणि कलेचा अर्थ प्रत्येकजण वेगवेगळा काढू शकतो. कुणाला हे बरोबर वाटेल तर कुणाला चुकीचं. पण माझ्यामते तरी प्रत्येक फोटोला एडिटिंग करावं. अगदी कलर, कॉन्ट्रास्ट मध्ये थोडासा बदल का असेना, पण तो करायला पाहिजे.
    ह्याचं कारण असं, की आज आपल्याकडे खूप प्रगत तंत्रज्ञान आहे असं आपण कितीही म्हणलं, तरीही आपल्या डोळ्यांची तुलना ते करू शकत नाही. म्हणजे, आपल्या डोळ्यांना समोर दिसणारं दृश्य हे 100% जसंच्या तसं कॅमेरा टिपू शकत नाही. निदान अजून तरी नाही.
    त्यामुळे आपण जे दृश्य बघितलं होतं, ते तसंच बाकीच्यांना दाखवायचं असेल, तर एडिटिंग हे करावंच लागतं आणि त्यात काही चूक आहे हे मला तरी वाटत नाही. काढलेल्या फोटोमध्ये जी कमतरता आहे, ती फक्त आपण इथे दूर करतोय एवढंच.
    हे झालं साधं एडिटिंग. पण प्रोडक्ट फोटोग्राफी (Product photography), फूड फोटोग्राफी (Food photography), फॅशन फोटोग्राफी (Fashion photography), लँडस्केप फोटोग्राफी (Landscape photography) ह्या प्रकारांमध्ये तर एडिटिंगला पर्याय नाहीये आणि तेसुद्धा साधं एडिटिंग नाही, तर ऍडव्हान्स एडिटिंग. कारण ह्या मध्ये आपल्याला वस्तू, व्यक्ति किंवा सेवा ही अशी दाखवायची असते, की बघणाऱ्यावर तिचा प्रभाव पडलाच पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप.

3) एडिटिंग किती करावं?
    हा प्रश्न म्हणजे 'कुणी जेवताना किती अन्न खावं?' किंवा 'कुणी किती मेकअप करावा?' ह्या प्रश्नासारखाच आहे. म्हणजे ह्याची दोनच उत्तरं असू शकतात... एक म्हणजे 'गरजेनुसार' किंवा दुसरं म्हणजे 'आवडीनुसार'.
    फोटोचा वापर कुठं आणि कशासाठी करणार आहे, त्यावरून एडिटिंगची पातळी ठरवावी, हे योग्य ठरेल. म्हणजे जर आपण एखादा फोटो फक्त सोशल मीडियावर DP म्हणून किंवा सहजच अपलोड करणार असू, तर त्याला जास्त एडिटिंग करायची गरज नाही. साधं कलर, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस, शार्पनेस ह्यामध्ये बदल केला तरी तेवढं बास होईल.
    काही वेळेला गरजेपेक्षा 'आवड किंवा हौस' हा भाग जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे जास्त एडिटिंगसुद्धा केले तरी हरकत नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खाली असलेला फोटो. तिथे खरंतर गरज नाहीये, पण हौस म्हणून मी एवढं एडिटिंग केलं आहे.

Comparison between photo before editing and after editing
हौस म्हणून केलेलं एडिटिंग

    पण जर एखादा फोटो जाहिरातीसाठी, व्यवसायासाठी किंवा प्रभाव पाडण्यासाठी वापरणार असू, तर मात्र तसा अपेक्षित प्रभाव पडण्यासाठी एडिटिंगमध्ये जे जे करावं लागेल, ते ते करायला काहीच हरकत नाही. त्यात चुकीचं काहीच नाही, कारण सगळीकडे तेच चालू आहे. सध्याचं जाहिरातीचं संपूर्ण क्षेत्रच एडिटिंग वर चाललं आहे.
आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की इंटरनेट वर आपण जे फोटो बघतो, त्यातले 99% फोटो एडिट केलेलेच असतात. काही वेळेला ते कळतं, तर काही वेळेला कळत नाही एवढंच. तसं पहायला गेलं, तर आपल्याला तरी असे कमतरता असलेले, साधे फोटो बघायला आवडतील का? नक्कीच नाही. त्यामुळे जे काही चाललं आहे, ते सगळं आपल्यासाठीच चाललं आहे, हे लक्षात असू द्या. 

4) एडिटिंग करणे हे बरोबर का चूक?
    योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केलं, तर एडिटिंग योग्यच आहे. आता ह्या वाक्याचा अर्थ काय? तर ह्यासाठी आपण दोन उदाहरणं घेऊ. पहिलं उदाहरण म्हणजे, समजा एखाद्या व्यक्तीचा पोर्ट्रेट फोटो काढला आहे आणि तो मॉडेलिंग साठी वापरायचा आहे. तर ह्यामध्ये डोळ्यावर आलेले केस काढून टाकणे, त्वचा थोडी चांगली करणे, दात पांढरे करणे, बॅकग्राऊंड मधल्या विचलित करणाऱ्या वस्तू काढून टाकणे, ई. एडिटिंग केले तर ते बरोबर आहे. पण डोळ्याचा रंगच बदलणे, एखादं व्यंग असेल तर ते लपवणे, चेहऱ्याचा आकार आणि ठेवण बदलणे, ई. एडिटिंग केलं, तर ते फसवणूक करण्याच्या दृष्टीने केलंय असाच त्याचा अर्थ होईल. ह्या बाबतीत हे चुकीचं आहे.
    दुसरं उदाहरण म्हणजे, एखादी मालमत्ता विकायची आहे आणि त्यासाठी त्याचे आतून आणि बाहेरून फोटो काढले आहेत. तर आतल्या एखाद्या फोटोवर एडिटिंग करताना, कलर वाढवणे, चमक देणे, पडलेला कचरा किंवा अनावश्यक वस्तू काढून टाकणे, ई. एडिटिंग चालू शकेल. पण नसलेली खिडकी दाखवणे, जागेचा आकार मोठा करून दाखवणे, खराब झालेली भिंत किंवा छत दुरुस्त करणे, ई. प्रकारचं एडिटिंग हे चुकीचं ठरेल आणि ती ग्राहकाची फसवणूक ठरेल.
    अजून एक मुद्दा म्हणजे, फोटोचा मालकी हक्क आपला असेल आणि आवड म्हणून आपण एडिटिंग करणार असू, तर आपण पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढं एडिटिंग करू शकतो. कारण शेवटी ती एक कला आहे आणि त्या बाबतीत कुणी काही हरकत घेऊ शकणार नाही. ह्याचं उदाहरण म्हणून इथे खाली दिलेला फोटो बघा, ज्यात मी स्वतः फक्त गम्मत म्हणून मला पाहिजे तसं बॅकग्राउंड जोडलं आहे.
Photo before and after background removal in photo editing process
गम्मत म्हणून केलेलं बॅकग्राऊंड रिमूव्हल (Background removal)

    तसंच, नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या, तरी ते चुकीचं ठरत नाही. खालच्या फोटोमध्ये, मागे चालू असलेलं बांधकाम, नको असलेल्या व्यक्ती ह्या काढून टाकल्यामुळे आणि खोटे ढग जोडल्यामुळे फोटो बघायला छान वाटत आहे.


Background cleaning, sky replacement and editing in photo editing process
नको असलेली माणसे आणि लक्ष विचलित करणारे बॅकग्राऊंड काढून टाकले आहे.

त्यामुळे, फोटोच्या वापरानुसार आणि गरजेनुसार एडिटिंग करावं, एवढाच मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवावा.

    हे सगळं जरी बरोबर असलं, तरी प्रत्येकाला हे मुद्दे पटतीलच असं नाही. काही जणांना फोटोमध्ये एडिटिंग करणं हे चुकीचं वाटतं, ती एक प्रकारची फसवणूक वाटते. त्यांच्या विचारांचा सुद्धा आदरच आहे. शेवटी प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असणारच.
    त्यामुळे 'फोटो ज्या हेतूने काढला आहे, तो हेतू सफल व्हावा आणि बघणाऱ्याला फोटो बघून आनंदही व्हावा' एवढाच काय तो प्रयत्न.

- प्रसन्न जोशी.


        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट
'अपर्चर - कॅमेर्‍याची बाहुली'
(जशी डोळ्यातील बाहुली असते तशी, खेळण्यातली नव्हे  😅😜)

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. 100% agree what our eyes can see is still can't be captured by cameras. Editing is art same photo edited by two persons will look different. That's why photography is art.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर आहे सर 😀👍🏻

      Delete
  2. उपयुक्त माहिती, तू एडिट केलेले फोटो आवडले.

    ReplyDelete
  3. बापरे! फोटो एडिटिंग = फोटोशॉप मध्ये 'वाट्टेल ते' करणे असा गैरसमज असणार्‍या माझ्यासारख्या 'ढ' माणसाला ही सणसणीत चपराकच म्हणायची की! थोडक्यात एडिटिंग हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं काम आहे. अन्यथा आपण सोशल मीडियावर 'RIP Photoshop' या सदराखाली काय काय भयानक एडिटिंग बघत असतो!😅😅😅

    ज्याप्रमाणे मराठी भाषा 'अ ते ज्ञ' म्हणजे अडाणी ते ज्ञानी अशी सफर घडवणारी असते त्याच प्रमाणे या ब्लॉगवरील माहितीमुळे फोटोग्राफी क्षेत्रात अडाणी असणारा माणूस काही अंशी तरी ज्ञानी होईल!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला नक्कीच अशी रंजक आणि उपयुक्त माहिती मिळत राहील. 😀👍🏻

      Delete
    2. रंजक माहिती मिळते आणि ती मिळत राहील ही खात्री आहे म्हणून तर हा ब्लॉग नियमित वाचतो!😀😀

      Delete
  4. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते,

    ReplyDelete
  5. नेहमीप्रमाणे छानच, उपयुक्त माहिती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला