शटर - प्रकाशासाठी दरवाजा

Camera shutter explained in Marathi language blog post



बरेच जण असं म्हणतात, की 'फोटोग्राफी मध्ये बाकीचं काहीही नाही आलं तरी चालेल, पण प्रकाश नियंत्रित करता आला पाहिजे'. आणि हे अगदी बरोबर आहे. कारण फोटो बघितल्यावर बघणाऱ्याला काय वाटेल, तो त्याचा काय अर्थ घेईल, ह्याच्यावर फोटोमधल्या प्रकाशाचा खूप मोठा प्रभाव पडतो. हा प्रकाश नियंत्रित करण्याचे बरेच मार्ग आहेत. शटर स्पीड हा त्यातलाच एक मार्ग आहे. ह्याचीच माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
मुळात शटर म्हणजे काय ते आधी बघुयात. दुकानाचं शटर ह्याचा आपण जो अर्थ घेतो, तोच अर्थ ह्या शटर चा सुद्धा आहे. दुकानाचं शटर माणसांना प्रवेश देतं किंवा नाकारतं, तर कॅमेऱ्याचं शटर प्रकाशाला प्रवेश देतं किंवा नाकारतं. त्यामुळे फोटोमध्ये किती प्रकाश पाहिजे, ह्यावरून शटर किती वेळ उघडं ठेवायचं, हे ठरवलं जातं.
फक्त फोटो काढायची वेळ सोडली, तर DSLR मध्ये पूर्ण वेळ शटर मुळे सेन्सर झाकलेला असतो. मिरर लेस कॅमेऱ्यामध्ये फक्त फोटो काढायच्या वेळेला शटर उघड-झाप करते. बाकीच्या वेळेला सेन्सर उघडाच असतो.
Camera shutter with curtains exposed in CANON EOR R


कॅमेऱ्यामध्ये शटरचे एकूण 2 प्रकार असतात. एक म्हणजे मेकॅनिकल शटर (Mechanical shutter) आणि दुसरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक शटर (Electronic shutter). अर्थात हे दोन्हीही पर्याय प्रत्येक कॅमेऱ्यात असतातच असं नाही.
ह्या दोन्ही मध्ये असलेला फरक त्यांच्या नावावरून स्पष्ट आहे. मेकॅनिकल शटर वापरून फोटो काढताना कॅमेऱ्यातल्या दोन हलणाऱ्या भागांचा वापर होतो आणि इलेक्ट्रॉनिक शटर वापरून फोटो काढताना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फोटो काढला जातो, त्यात कुठलेही भाग जरासुद्धा हलत नाहीत. 
मेकॅनिकल शटर चं काम हे दोन भागांमुळे होतं. हे दोन भाग म्हणजे दोन कर्टन (पडदे) असतात, ज्यांना फर्स्ट कर्टन (First curtain) आणि सेकंड कर्टन (Second curtain) अशीच नावं आहेत. जेव्हा आपण क्लिक करतो, तेव्हा (DSLR कॅमेरामध्ये) आरसा वर जातो आणि पहिला पडदा वर जातो, ज्यामुळे सेन्सर उघडा पडतो आणि त्याच्यावर प्रकाश पडायला सुरुवात होते. त्यानंतर आपण आधीच ठरवलेल्या कालावधीनंतर दुसरा पडदा खालून वर जातो, आणि त्यामुळे सेन्सर परत एकदा झाकला जातो. ह्या दोन्ही पडद्यांच्या हालचालींच्या मधला वेळ सेन्सर वर प्रकाश पडत असतो आणि सेन्सर परत झाकला गेला, की फोटो घेतला जातो. 
इलेक्ट्रॉनिक शटर मध्ये असे कोणतेही हलणारे भाग नसतात. जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा त्या क्षणाला सेन्सर वर जो प्रकाश पडत असतो, तो फक्त रेकॉर्ड केला जातो, एवढंच. बाकीच्या वेळेला सेन्सर माहिती रेकॉर्ड करत नसतो. इलेक्ट्रॉनिक शटर चा फायदा असा आहे, की ह्यामुळे प्रार्थनास्थळे, रेकॉर्डिंग स्टुडिओ, वगैरे ठिकाणी अजिबात आवाज न करता 'सायलेंट शूटिंग' (Silent shooting) करता येतं. पण ह्याचा रोलिंग शटर (Rolling shutter) नावाचा एक दुष्परिणाम पण आहे, ज्याची माहिती आपण पुढच्या कुठल्यातरी पोस्ट मध्ये खोलात जाऊन बघुयात.

फोटोग्राफी करताना आपल्याला शटर स्पीड ठरवावा लागतो.  शटर स्पीड म्हणजे किती वेळा साठी सेन्सरवर प्रकाश पडला पाहिजे, तो वेळ. शटर स्पीड हा 'काही सेकंद किंवा सेकंदाचा अगदी थोडा भाग' अशा स्वरूपात दर्शवला जातो. म्हणजे साधारणपणे नेहमीच्या कॅमेऱ्यात शटर स्पीड हा 30 सेकंद एवढा स्लो आणि 1/4000 एवढा फास्ट असतो. प्रत्येक कॅमेऱ्यानुसार ह्या किंमती कमी जास्त असू शकतात.

शटर स्पीड किती आहे, ह्याचे फोटो वर दोन परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे, सेन्सर वर किती प्रकाश पडेल. शटर स्पीड स्लो असेल तर सेन्सर जास्त वेळासाठी उघडा पडेल, म्हणजेच त्याच्यावर जास्त प्रकाश पडेल आणि शटर स्पीड फास्ट असेल, तर खूप कमी वेळासाठी सेन्सर उघडा पडेल आणि खूप कमी प्रकाश त्याच्यावर पडेल.
दुसरा परिणाम म्हणजे, ठरवलेल्या शटर स्पीड मुळे फोटोमधल्या वस्तू, माणसं शार्प दिसतील का ब्लर होतील. जर शटर स्पीड स्लो असेल, तर तेवढया वेळात समोरच्या वस्तूंच्या किंवा माणसांच्या जागा थोड्या का होईना, पण बदलतील. अशा वेळेला मग फोटो ब्लर येईल.
पण जर शटर स्पीड फास्ट असेल, तर तेवढ्या कमी वेळात समोर अशी काही हालचाल होणार नाही आणि फोटोमध्ये सर्व काही शार्प दिसेल.

ह्याची उदाहरणे बघायची झाली, तर धबधब्याचा किंवा वाहत्या पाण्याचे फोटो काढताना, शटर स्पीड आधी ठरवूनच स्लो ठेवला, तर पाण्याचे वेगवेगळे थेंब असे न दिसता, पाण्याचा प्रवाहच धूसर दिसतो. असा फोटो बघताना एक वेगळाच प्रभाव पडतो मनावर. हे आपण खाली दिलेल्या फोटोत पाहू शकतो.

Soft effect created in water flow due to slow shutter speed i.e. long exposure

पण समजा आपल्याला पाण्याला एकदम स्तब्ध करायचं आहे, तर मात्र शटर स्पीड फास्ट ठेवायला हवा. त्यामुळे फोटोमध्ये ज्या गोष्टी जिथे आहेत, तिथंच त्या स्तब्ध होतील आणि एकदम शार्प दिसतात. ह्यासाठी खाली दिलेला, पाण्याच्या थेंबाचा फोटो पहा.

Water drop action freezed due to fast shutter speed

स्लो आणि फास्ट शटर स्पीड कुठं कुठं वापरतात, त्यासाठी खाली काही उदाहरणे देत आहे.

Light trails on road in night due to slow shutter speed i.e. long exposure
स्लो शटर स्पीड मुळे, ताणले गेलेले गाड्यांचे दिवे

Light trails of steel wool sparks in night due to slow shutter speed i.e. long exposure
स्लो शटर स्पीड मुळे, मध्यातून उडणार्‍या ठिणग्या रेषांप्रमाणे दिसत आहेत.

Running dog action freezed due to fast shutter speed
फास्ट शटर स्पीड मुळे, वेगात असतानासुद्धा स्तब्ध झालेला कुत्रा

त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं, तर जास्त प्रकाशासाठी स्लो शटर स्पीड आणि कमी प्रकाशासाठी फास्ट शटर स्पीड वापरावा. तसंच, गोष्टी ब्लर करायच्या असतील तर स्लो शटर स्पीड वापरावा आणि स्तब्ध करायच्या असतील तर फास्ट शटर स्पीड वापरावा.

जसं मी नेहमी म्हणतो, की फोटोग्राफी मध्ये चूक आणि बरोबर असं काही नसतं. फोटोतून योग्य संदेश किंवा भावना पोहोचल्या, की बास झालं. त्यामुळे कधी चुकीचा शटर स्पीड वापरला, तर लगेच फोटो खराब झाला असं मानू नये. कदाचित त्यामुळे आपल्याला काही गोष्टी किंवा दृश्ये एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघायला मिळतील.
पण एवढं मात्र खरं, की शटर स्पीडचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. कारण त्याचा वापर खूप प्रभावीपणे करता येऊ शकतो. आणि काय सांगावं, एखाद्या वेळेला फोटो चांगला येण्यासाठी आपल्या हातात फक्त तोच एक पर्याय असू शकेल.
त्यामुळे, शटर स्पीड प्रमाणे स्लो किंवा फास्ट करा, पण त्याचा अभ्यास करत रहा.

- प्रसन्न जोशी.


        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 
 
पुढची पोस्ट
' ISO '
कॅमेर्‍यातला खोटा खोटा प्रकाश
 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला