फोटोग्राफीमधले विविध गुरु

Guru or mentor in photography field explained in Marathi language

‘योग्य मार्ग दाखवतो, तोच खरा गुरू'

    प्रत्येक क्षेत्रात आपल्याला एक तरी गुरू असतोच. मग तो कुठल्याही स्वरूपात असू शकतो. आज आपण जे काही आहोत ते अशा गुरूंमुळेच आहोत, हे मान्य करायलाच पाहिजे. काही गुरू हे थोड्या कालावधीसाठी शिकवतात, तर काही गुरू हे आयुष्यभर आपल्या बरोबर राहतात. काही गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी लागते, काहींना नाही लागत. पण ह्या सगळ्या गुरूंचा आपल्या ज्ञानात आणि व्यक्तिमत्वात अमूल्य असा वाटा आहे, हे मात्र खरं. 
    माझ्या फोटोग्राफी च्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये कैक गुरूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येकाची शैली वेगळी, प्रत्येकाचे स्वरूप वेगळे. काही समोर बसून शिकवतात, तर काही आपल्यापासून खूप दूर राहून. त्यातल्याच काहींबद्दल ह्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच गुरूंकडून तुम्हीही पाहिजे तेव्हा हे ज्ञान घेऊ शकता. 

1) इंटरनेट
Google webpage is opened in a browser on a laptop

    आजकालच्या जगात इंटरनेट न वापरणारा माणूस सापडणं  अगदीच कठीण आहे. काहीही अडलं, तरीही त्याबद्दल इंटरनेट वर आपल्याला माहिती मिळतेच मिळते. हा गुरू असा आहे, ज्याने, 'कॅमेरा म्हणजे काय' इथंपासून आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत माझ्याकडे असलेलं सर्व ज्ञान मला दिलेलं आहे. ह्यामध्ये युट्यूब, विविध साईट्स, ब्लॉग, ई. गोष्टी समाविष्ट आहेत. 2012 पासून मी ह्या गुरुकडे शिकवणी लावली आहे आणि ती अजूनही चालू आहे.  
    पण ह्या गुरुचं काम जरा वेगळ्या पद्धतीने चालतं. तो स्वतःहुन आपल्याला काही शिकवत नाही. आपल्यालाच आधी आपले प्रश्न तयार करून मग त्याच्याकडे जावं लागतं. पण ह्या गुरूचं ज्ञान म्हणजे अफाट. काही माहिती नाही असं नाही. कधी कधी तर मी त्याला मला अडलेली एक गोष्ट विचारतो तर तो त्याबद्दल ज्ञान तर देतोच, पण अजून नवीन 4 गोष्टींचं ज्ञान सुद्धा देतो. 
    माझ्या ज्ञानात ह्या गुरुचा खूप जास्त म्हणजे 40% वाटा आहे. 

2) माझा स्वतःच्या कामाचा अनुभव
    हा गुरू 2 नं वर आहे तो ह्यासाठी, की पहिल्या गुरूने जेव्हा जेव्हा मला नवीन काही शिकवलं, तेव्हा ते करून बघितल्यानंर मग मला ते ज्ञान आत्मसात झालं. हा गुरू पण जवळपास पहिल्या गुरुसारखाच आहे. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच पुढाकार घ्यावा लागतो.
    पण ह्या गुरूची महती एवढी आहे, की ह्याच्यामुळे मिळालेलं ज्ञान आयुष्यभर आपल्याबरोबर राहतं. आपल्याला ते आठवावं लागत नाही, तर ते आपला एक भागच बनून जातं. कारण आपण जे चुकत चुकत शिकतो, त्या ज्ञानाला काही तोड नाही. ह्याचाही माझ्या ज्ञानातला वाटा हा जवळ पास 40% पर्यंत आहे, असं मी म्हणेन.

3) फोटोग्राफर-व्हीडीओग्राफर सहकर्मचारी
    जेव्हा आपण आपल्याच क्षेत्रातील दुसऱ्या व्यक्तींना भेटतो, तेव्हा ज्ञानाची देवाण घेवाण ही होतेच. आणि अशा मार्गाने आपल्या ज्ञानात भर पडण्याचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्येकाची ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत आणि क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला ज्या दृष्टिकोनातून मिळालेली आहे, त्यापेक्षा खूप वेगळ्या दृष्टिकोनातून ती दुसऱ्यांना मिळालेली असू शकते. म्हणून अशा वेळेला आपल्याला अपेक्षित नसलेलं पण उपयुक्त असं ज्ञान सुद्धा मिळू शकतं. 
    शिवाय प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीतरी शिकवतेच, असा दृष्टिकोन आपण ठेवला, तर आपल्या ज्ञानात अमूल्य भर पडू शकते. पण अशा वेळेला समोरच्या व्यक्तीचं वय, पत वगैरे गोष्टी पूर्णपणे बाजूला करून, आपल्याला फक्त एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरता आलं पाहिजे.

4) प्रदर्शनं, मासिकं, टीव्ही अशी अप्रत्यक्ष माध्यमे
People observing photos in photo exhibition and learning from them

    ज्ञान हे समोरासमोर बसूनच घेतलं पाहिजे असं अजिबात नाही. फोटोग्राफी सारख्या कलेमध्ये तर अजिबातच नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सर्रास होणारी प्रदर्शनं, अगदी कुठेही उपलब्ध असलेली मासिकं आणि पेपर, टीव्हीवर लागणारे रोजचे कार्यक्रम, ई. सर्व माध्यमं म्हणजे ज्ञानाचा एक न आटणारा झराच म्हणावा लागेल. 
    अशा वेळेला आपल्यासमोर एखादी व्यक्ती नसून त्याची कला असते. मग आपलं काम हे असतं, की त्या कलेला समजून घेणं, त्यामागची प्रक्रिया काय असेल ह्याचा विचार करणं आणि त्यातून शिकणं. अशा वेळेला आपली कल्पनाशक्ती वाढीस लागते. आणि अशा वेळेला आपण कलेच्या फक्त एकाच प्रकाराशी बांधील न राहता, अनेक प्रकारांशी ओळख करून घेतो. अशामुळे आपला त्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा व्यापक आणि समृद्ध होतो. 
    हा गुरू आपल्याला आपल्या सुरुवातीच्या काळात एवढा महत्वाचा वाटत नाही. पण जेव्हा आपण ज्ञानाची ठराविक पातळी गाठतो, तेव्हा ह्याचं महत्व आपल्याला जाणवतं.

5) आपल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती
    सध्या जगभर कोरोनाने थैमान घातलं असताना, कुठल्याही क्षेत्रात ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया मात्र थांबलेली नाहीये. कारण परिस्थितीचा आढावा घेऊन बऱ्याच जणांनी लोकांसाठी ऑनलाईन सेमिनार, वेबिनार, लेक्चर वगैरे आयोजित केली आहेत. तेही फुकट. ह्यामार्फत मला माझ्या घरी बसून साधी साधी तांत्रिक माहिती देणारी लेक्चर ऐकायला मिळाली. ह्यापासून ते अगदी हॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या आणि जगाच्या दुसऱ्या भागात असलेल्या लोकांचे अनुभव आणि त्यांची कार्यपद्धती ऐकायला मिळाली. एरवी ही माहिती युट्युब किंवा मासिकात मला मिळाली नसती. इंटरनेटचेच फायदे, दुसरं काय. 

6) वेळ
    हा गुरू एकदम शांतपणे काम करत असतो आणि कधीतरी नंतर आपल्याला त्याचं महत्व कळतं. कारण काही गोष्टी ह्या सुरुवातीलाच लगेच कळतात असं नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तेवढा दिला, की ते ज्ञान नंतर हळूहळू आपलंसं होत जातं. पण त्यासाठी एकच गोष्ट तुमच्याकडे असावी लागते, ती म्हणजे धीर. सगळंच असं इन्स्टंट मिळत नसतं. 

    ह्या शिवाय ज्ञान मिळवण्याचे अनेक छोटे छोटे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, कुठलीही नवीन वस्तू घेतली, की त्याच्याबरोबर त्याचं मॅन्युअल मिळतं, तेही आपला एक ज्ञानाचा स्रोत होऊ शकतं. पण बरेच जण ते वाचायचा कंटाळा करतात. त्यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो, की ती वस्तू हातात आल्या आल्या पहिल्यांदा मॅन्युअल पूर्ण वाचून काढा. खूप वेळ लागत नाही त्याला. आणि जरी लागला, तरी त्यातून मिळणारी माहितीही तेवढीच उपयोगी असते. कारण एकदा ते वाचलं, की जवळपास 90-95% ज्ञान आपल्याला मिळतं. 

    तर अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, मनुष्यरूपी, कागदरूपी, अल्पकालीन, दीर्घकालीन, ई. प्रकारे ज्ञान देऊन मला बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या सर्व गुरूंना माझा नमस्कार. 
      तुम्हीही त्यांना शरण जाऊ शकता. आणि हे गुरू सर्वांच्या आवाक्यात आहेत. त्यांना फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे तुमची शिक्षणासाठी असलेली इच्छा शक्ती आणि संयम. हे जर असेल, तर मग तुम्हाला कधीच कुठलाच अडसर येणार नाही. 

प्रसन्न जोशी.

 

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेलतर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट:- लेन्सेसचे प्रकार

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸


Comments

  1. फक्त फोटोग्राफी मध्ये नाही तर सगळीकडेच आपण सांगितलेले गुरू उपयोगी पडतात.

    ReplyDelete
  2. बराच अभ्यास केला आहेस😊
    अश्विनी जोशी

    ReplyDelete
    Replies
    1. आवडीचा विषय असल्यामुळे आपोआपच अभ्यास होतो. 😁👍🏻

      Delete
  3. ब्लॉग मध्ये उल्लेख केलेले सर्व गुरु (आपापल्या क्षेत्रातील)केले तर आपण आपल्या कामात वाकबगार होऊच.
    उत्तम मांडणी.
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. Superb! झक्कास 👍
    -Atharva

    ReplyDelete
  5. जर 'फोटोग्राफी' या क्षेत्राचा विचार करायला गेलं तर गुरू क्र.२ हा दीर्घकालीन गुरू होऊ शकेल. इंटरनेट, सेमिनार, वेबिनार हे आपल्याला बेसिक ते ऍडव्हान्स ज्ञान पुरवतील, नवीन टेक्नॉलॉजी विषयी माहिती देतील पण प्रत्यक्ष फोटोग्राफी मधील सर्वात महत्त्वाचे २ भाग- नजर आणि टायमींग हे स्वानुभवातूनच येईल.
    शुभेच्छा!💐

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. स्वतः अनुभवातून शिकणे, ह्याला पर्याय नाही.

      Delete
  6. Hya topic var pan post yeil vatal nhavat. Gr8 work
    Prashant Narayane

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 😀🙏. अजूनही कुठले विषय असतील, तर नक्की सांगावेत. त्यावर सुद्धा पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न करेन. 😀

      Delete
  7. सारासार विचार करून लिहिलेली माहिती .चांगल्या पद्धतीने आणि सोप्या व मनाला भिडणा-या शब्दात दिलेली माहिती हे तुझे वैशिष्ट्य आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. 😌🙏 खूप खूप धन्यवाद.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला