ISO - कॅमेर्‍याचा खोटा खोटा प्रकाश

ISO Concept Explained in Marathi language

    फोटो/व्हीडीओ शूट करताना चांगला दर्जा पाहिजे असेल, तर आपल्याला प्रकाशावरच अवलंबून रहायला लागतं. प्रकाश किती आहे, कसा आहे, आपल्याला पाहिजे त्या दिशेतून येतोय का, ई. गोष्टींवर सतत लक्ष ठेवावं लागतं.
    आपण आपल्याला पाहिजे तसा लाईट सेटअप वापरू शकतो. पण तरीही आपल्या हातात मोबाईल असो, छोटा डिजिटल कॅमेरा असो किंवा कोणताही मोठा कॅमेरा असो, कुठेतरी थोडी तडजोड करावीच लागते. ह्या बाबतीत ISO ह्या पर्यायाची आपल्याला मदत होते. त्याबाबतीतच आज आपण ह्या पोस्ट मध्ये जास्त माहिती घेणार आहोत.

ISO कसं काम करतो
    ह्या पोस्टच्या शिर्षकावरून तुम्हाला थोडा अंदाज आला असेल. 'ISO म्हणजे कॅमेऱ्यातील खोटा प्रकाश'. खोटा ह्यासाठी, की हा प्रकाश नैसर्गिक रित्या सेन्सरवर पडलेला नसतो, तर तो कॅमेऱ्याने स्वतःच तयार केलेला असतो. म्हणजे सेन्सरनी गोळा केलेल्या माहिती मध्ये थोडा फेरफार करून हा प्रकाश वाढवला जातो.
    म्हणजे असं, की बाहेर कमी प्रकाश असताना आपण कॅमेऱ्यात ISO ची किंमत वाढवली, की कॅमेरा त्याच्यातील प्रोसेसर च्या मदतीने फोटोमधल्या काही डार्क पिक्सेलना ब्राईट करतो. ह्यामुळे आपल्याला फोटोमध्ये प्रकाश वाढल्याचा भास होतो. हे झालं अगदी साधं सोपं स्पष्टीकरण.
    पण मग तुम्हाला वाटेल, की हा तर चांगला पर्याय आहे. आता कमी प्रकाश असताना पण बिनधास्त ISO वाढवला, की झालं काम. पण असं नाहीये. हा प्रकाश सेन्सरनी गोळा केलेल्या माहितीमध्ये छेडछाड करून, डार्क पिक्सेल ब्राईट करून मिळवला असल्यामुळे, फोटोमध्ये खरखर दिसते आणि दर्जा खराब होतो. आणि जेवढा ISO जास्त असतो, तेवढीच खरखर जास्त वाढते आणि फोटोचा दर्जा कमी होतो. दर्जा खराब कसा होतो हे कळण्यासाठी, मुळात आधी फोटोला दर्जा कसा मिळतो, हे बघुयात.

    फोटोचे काही मूळ गुणधर्म असतात जसे की रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस, शार्पनेस. सेन्सर काय माहिती गोळा करतो, ह्यावरून हे सगळं ठरतं. अगदी थोडक्यात सांगायचं तर, जर पुरेसा प्रकाश समोरच्या वस्तूवर किंवा व्यक्तीवर पडला, तरच तो प्रकाश त्यांच्यावरून रिफ्लेक्ट होऊन सेन्सरवर पडेल. त्यामुळे मुळात आधी समोर प्रकाश असणे गरजेचे आहे. अशा चांगल्या आणि मुबलक प्रकाशामुळे सेन्सरचा प्रत्येक पिक्सेल स्वतःची अशी वेगळी माहिती गोळा करू शकतो.
    ह्या अचूक माहितीमुळेच फोटोमध्ये रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस आणि शार्पनेस ह्यासारख्या गोष्टींचा दर्जा खूप चांगला मिळतो. पण जर बाहेर असणारा प्रकाश कमी असेल, तर काही पिक्सेल कुठलीच माहिती गोळा करू शकत नाहीत आणि ते तशीच माहिती प्रोसेसरकडे पाठवतात. प्रोसेसर बघतो की काही पिक्सेल मध्ये प्रकाशाची काहीच माहिती नाहीये, त्यामुळे तो तिथे काळा रंग दाखवतो. ह्यालाच आपण 'फोटो डार्क किंवा अंधारलेला आला' असं म्हणतो.
    ISO हा एका ठराविक किंमतीत दर्शवला जातो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, '100,200,400,800, 1600,3200,.......,25600, 51200, 102400' अशी ही रेंज असते. खालील फोटोमध्ये आपण अशीच एक रेंज उदाहरण म्हणून बघू शकतो.

Camera screen showing different ISO levels

    ह्यामध्ये प्रत्येक पातळीवर किंमत दुपटीने वाढते. प्रत्येक कॅमेऱ्यानुसार ही रेंज कमी जास्त होऊ शकते.

कधी वापरावा
1) फोटो चांगले येण्यासाठी कॅमेऱ्याच्या बाहेर आपल्याला जे काही बदल करता येतील, तेवढे सगळे करावेत. ह्यामुळे कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये फार बदल करावे लागत नाहीत आणि फोटो जास्तीत जास्त नैसर्गिक येतो.
म्हणून बाहेर प्रकाश कमी असेल, तर आधी तिथे असलेला प्रकाश वाढवता येईल का, हे बघावे. अगदीच नाही जमलं, तरच फोटोमधला प्रकाश वाढवण्यासाठी ISO चा पर्याय वापरावा.
2) फोटो शार्प येण्यासाठी शटर स्पीड बऱ्यापैकी फास्ट असावा लागतो, हे आपण मागच्या पोस्ट मध्ये बघितलं. (शटर स्पीड बद्दलची माहिती देणारी पोस्ट वाचली नसेल, तर इथे क्लिक करा:- शटर - कॅमेर्‍याचा प्रकाशासाठी दरवाजा). पण शटर स्पीड जेवढा जास्त, तेवढा प्रकाश कमी, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे शटर स्पीड फास्ट ठेऊन सुद्धा फोटो मध्ये जास्त प्रकाश पाहिजे असेल, तर त्या वेळेला ISO वाढवावा.

उदाहरणे
आता ISO मुळे फोटो मध्ये काय फरक पडतो, ते पाहुयात.
    मी मॅक्रो लेन्सने एका कीचेन मधल्या छोट्या बाहुलीच्या हाताचा फोटो काढला. हाच फोटो 3 सेटिंग वर काढला, ISO 100, ISO 1600 आणि ISO 12800. खाली या तिन्ही फोटोंचं कोलाज देत आहे. त्यामध्ये काय बदल झाला आहे बघा. जसा ISO वाढेल, तसा शार्पनेस कमी होतोय आणि फोटोमध्ये खरखर वाढतीये.
Comparison between photos taken at different ISO levels
(इथं फोटो कोम्प्रेस झाल्यामुळे, कदाचित तुम्हाला ह्यात कमी डिटेल्स दिसू शकतील. )

    तसंच खाली दिलेलं दुसरं उदाहरण बघा. थोडया अंधारात एका काचेच्या भांड्याचा फोटो काढला आहे, ISO 100, ISO 1600 आणि ISO 12800 ह्या तीन सेटिंगवर. इथेसुद्धा, जसा ISO वाढेल तसा शार्पनेस कमी होत गेलेला आपण बघू शकतो. तसेच खरखर पण वाढत गेली आहे.
Comparison between photos taken at different ISO levels
(इथं फोटो कोम्प्रेस झाल्यामुळे, कदाचित तुम्हाला ह्यात कमी डिटेल्स दिसू शकतील. )

ISO चे फायदे
1) समोर जर कमी प्रकाश असेल, तरीसुद्धा फोटोमध्ये जास्त प्रकाश ठेवता येतो.
2) समोरची वस्तू किंवा व्यक्ती स्तब्ध करायची असेल, तर ISO वाढवून शटर स्पीड फास्ट करता येतो.

ISO चे तोटे
1) ISO जसा वाढेल, तशी फोटोमध्ये खरखर वाढते.
2) ISO ची किंमत जर जास्त असेल, तर फोटो मध्ये खरे रंग दिसत नाहीत. रंग थोडे फिकट होतात.
3) ISO जसा वाढेल, तसा फोटोचा शार्पनेस कमी होतो.

साधा आणि महाग कॅमेरा ह्यामध्ये ISO ची तुलना
    आधी सांगीतल्याप्रमाणे, ISO ची कमाल आणि किमान मर्यादा ही प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये वेगळी असते. साधा कॅमेरा असेल, तर त्यात ISO ची किंमत जास्तीत जास्त 12800 असते. अशा वेळेला ISO 12800 ठेऊन फोटो काढला तर सगळ्यात जास्त खरखर आणि सगळ्यात कमी शार्पनेस मिळेल. कारण इथे ISO ची किंमत ही त्या कॅमेऱ्याच्या एकूण रेंजच्या 100% एवढी आहे.
    पण महाग आणि प्रगत दर्जाच्या कॅमेऱ्यामध्ये, ISO ची जास्तीत जास्त किंमत ही 51200 किंवा 102400 एवढी असते. त्यामुळे अशा वेळेला ISO 12800 वर फोटो काढला, तर त्यात तेवढी खरखर येत नाही आणि शार्पनेस पण चांगला मिळतो. कारण ही किंमत एकूण ISO रेंजच्या 20% एवढीच आहे.

    त्यामुळे महाग आणि प्रगत कॅमेऱ्यांची ISO क्षमता चांगली असते आणि त्यामुळे अंधारातसुद्धा जास्त ISO वापरून चांगले फोटो काढण्यात ते सक्षम असतात.

मोबाईल कॅमेऱ्याची ISO रेंज
    बहुतेक मोबाईलमध्ये ISO ची रेंज ही 100 ते 3200 किंवा फार फार तर 6400 पर्यंत असते. शिवाय त्याचा सेन्सर पण छोटा असतो. त्यामुळे, ISO थोडासा वाढवला, तरी फोटो खूप खराब होतो. ह्या कारणांमुळेच आपण संध्याकाळी किंवा रात्री मोबाईल वर जे फोटो काढतो, ते खूप जास्त खरखर असलेले आणि कमी शार्प येतात.

    त्यामुळे एवढंच लक्षात ठेवावं लागेल, की  ISO ही एक अशी सोय आहे, जी सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून वापरली पाहिजे.  पण प्रकाश कमी आहे म्हणून फोटोच न काढण्यापेक्षा, खरखरीत आणि कमी शार्प फोटो काढणे, हे चांगलं नाही का.
    कारण माझ्या मते, काहीही झालं तरी अजिबातच आठवणी नसण्यापेक्षा, खरखरीत आठवणी असलेल्या बऱ्या. 

- प्रसन्न जोशी.

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

         आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

पुढची पोस्ट

'एक्सपोजरचा त्रिकोण'

सबकुछ यही है....

 

हसत रहा आणि शिकत रहा.

 

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸

Comments

  1. उपयुक्त माहिती.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. मोबाईल वर फोटो काढताना फ्लॅश आणि ISO यांच्यात बॅलन्स कसं करावं?

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला मोबाईल मध्ये ISO ऍडजस्ट करता येतो. पण फ्लॅश कमी जास्त करता येत नाही. त्यामुळे मोबाईल मध्ये फोटो काढताना ह्या सगळ्या माहितीचा तेवढा फायदा होत नाही.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला