व्हिडिओ नक्की कसा तयार होतो?
फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी ही कामं जरी वेगवेगळी असली, तरी त्यासाठी लागणारं बेसिक शिक्षण हे एकच असतं. कारण त्या दोन्हीचं मूळ एकच आहे. ते म्हणजे फोटो.
आता हे कसं? तर, फोटो म्हणजे एका वेळेला काढलेला एकच फोटो आणि व्हीडीओ म्हणजे एका वेळेला सलग काढलेल्या भरपूर फोटोंचा संच. हे झालं व्हीडीओचं अगदी साधं स्पष्टीकरण. आता ह्या पोस्ट मध्ये व्हीडीओ बद्दल बाकीची माहिती घेऊयात.
एखादा फोटो आपण बघत असू, तर आपण बदलेपर्यंत तो तसाच राहतो. पण व्हीडीओ बघताना आपण भरपूर फोटो एका मागून एक बघत असतो. आणि तेही इतक्या पटापट, की आपल्या मेंदूला ते फोटो वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्या सगळ्या फोटोंना जोडून तो आपल्याला त्यांचा सलग एक संच दाखवतो, ज्याला आपण व्हीडीओ म्हणतो.
आता असे वेगवेगळे फोटो न दिसता एकच व्हीडीओ दिसण्यासाठी किती फोटो असावे लागतात? तर हा आकडा आहे 24. म्हणजे व्हीडीओ नीट दिसण्यासाठी कमीत कमी 24 फोटो एका सेकंदाला बघावे लागतात. ह्या फोटोंना व्हीडीओ च्या भाषेत 'फ्रेम्स' म्हणतात आणि एका सेकंदात किती फ्रेम्स आहेत, त्यावरून 'fps' म्हणजेच 'फ्रेम्स पर सेकंद' नुसार व्हीडीओचा स्पीड ठरतो. म्हणजे एका सेकंदात 24 फोटो असलेला व्हीडीओ हा '24 fps (फ्रेम्स पर सेकंद)' चा आहे, असं म्हणतात.
24 fps चा व्हीडीओ हा आपल्याला एकदम नैसर्गिक दिसतो. म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण जग बघताना काही काही ठिकाणी जिथे हालचाल असते, तिथे आपल्याला थोडासा नैसर्गिक ब्लर दिसतो. तसाच ब्लर 24 fps च्या व्हीडीओ मध्ये पण दिसतो. म्हणून सिनेमात, युट्युब वरच्या बऱ्याच व्हीडीओ मध्ये 24 fps एवढाच स्पीड वापरला जातो. पण काही वेळेला 30 fps चा व्हीडीओ सुद्धा नॉर्मल व्हीडीओ म्हणून वापरला जातो.
जर आपण व्हीडीओ च्या स्पीड ची माहिती घेतोय, तर यालाच जोडून 'स्लो मोशन (Slow motion video) आणि टाईम लॅप्स व्हीडीओ (Time lapse video)' सुद्धा समजून घेऊयात.
आपल्याला एका सेकंदात 24 फ्रेम्स दाखवायच्या आहेत, हे तर ठरलेलंच आहे. मग त्यासाठी आपण जर रेकॉर्ड करताना 24 fps मध्येच रेकॉर्ड केलं, तर जसं नेहमी दिसतं तसाच व्हीडीओ आपल्याला दिसणार आहे.
पण, जर आपण रेकॉर्ड करताना 1 सेकंदाचा व्हीडीओ 48 fps मध्ये रेकॉर्ड केला, तर सॉफ्टवेअर च्या मदतीने त्या ‘48 fps च्या एका सेकंदाचे’ आपण ‘24 fps चे 2 सेकंद’ करू शकतो. म्हणजे इथे व्हीडीओचा स्पीड निम्मा झाला, म्हणजेच व्हीडीओ स्लो झाला.
हेच गणित आपल्याला पुढेही चालू ठेवता येतं. म्हणजे जर आपण एखादा एक सेकंदाचा व्हीडीओ 120 fps मध्ये रेकॉर्ड केला, तर त्याचे आपण नॉर्मल 24 fps चे 5 सेकंद करू शकतो, म्हणजेच पाचपट स्लो स्पीड. ह्याच प्रमाणे आपल्याला 10 पट स्लो व्हीडीओ पाहिजे असेल, तर त्यासाठी 240 fps वर रेकॉर्डिंग करायला लागेल. हे पक्के समजण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली आकृतीची मदत होऊ शकेल.
आपण टीव्हीवर बऱ्याचदा स्लो मोशनचे व्हीडीओ बघतो. पाण्याने भरलेला फुगा फुटताना, काडेपेटीची काडी जळताना वगैरे. ते व्हीडीओ तर 10,000 fps एवढ्या फास्ट स्पीड ने रेकॉर्ड केलेले असतात. मूळ व्हीडीओ हा जरी फक्त 1 सेकंदाचा असला, तरी 24 fps एवढ्या स्पीड मध्ये त्या ‘1 सेकंदाचे जवळपास 6 मिनिट 56 सेकंद’ करता येतात. म्हणूनच आपल्याला समोर घडणाऱ्या एखाद्या घटनेचा बारीक अभ्यास करता येतो. आहे की नाही अफलातून तंत्रज्ञान.
असंच गणित 30 fps स्पीडच्या नॉर्मल व्हीडीओ साठी पण लागू होतं. म्हणजे दुप्पट स्लो स्पीड साठी 60 fps मध्ये रेकॉर्ड करावं लागेल, चौपट स्लो स्पीड साठी 120 fps मध्ये, आठ पट स्लो स्पीड साठी 240 fps मध्ये आणि असंच पुढे सुद्धा. (कंटाळा येईपर्यंत किंवा कॅमेऱ्याची मर्यादा आड येईपर्यंत 😜).
हे झालं नॉर्मल पेक्षा स्लो स्पीड व्हीडीओचं. मग दुसऱ्या बाजूला म्हणजे फास्ट स्पीड च्या बाजूला कुठला प्रकार आहे? तर तिकडे 'टाईम लॅप्स' हा व्हीडीओ प्रकार आहे.
स्लो मोशन व्हीडीओ मध्ये एका सेकंदांच्या रेकॉर्डिंगचे अनेक सेकंद केले जातात. तर त्याच्या बरोब्बर उलट, टाईम लॅप्स व्हीडीओ मध्ये अनेक सेकंदांच्या रेकॉर्डिंगचा मिळून एक सेकंद केला जातो.
टाईम लॅप्स ह्या प्रकारातसुद्धा, 24 फ्रेम्स किंवा 30 फ्रेम्सचा एक सेकंद करायचा आहे, हे तर ठरलेलं आहे. मग त्या 24 किंवा 30 फ्रेम पैकी प्रत्येक फ्रेम/फोटो हा किती अंतर ठेवून काढला गेला आहे, त्यावरून शेवटी व्हीडीओ किती फास्ट होणार आहे, ते कळतं.
थोडक्यात म्हणजे, समजा आपण टाईम लॅप्स व्हीडीओ तयार करण्यासाठी 2 सेकंदाचा टाईम इंटरव्हल ठेवला, म्हणजेच दर 2 सेकंदांनातर एक फोटो काढला, तर ह्या वेगाने ‘24 फोटो काढायला 48 सेकंद लागतील’ आणि शेवटी त्या सगळ्यांचा मिळून 1 सेकंद तयार होईल. म्हणजे आहे की नाही स्लो मोशन व्हीडीओच्या बरोब्बर उलटं.
त्यामुळे आपल्याला कुठली हालचाल किती फास्ट दाखवायची आहे, त्यानुसार हा टाईम इंटरव्हल ठरतो. आणि हा इंटरव्हल जेवढा जास्त असेल, त्यानुसार शेवटी एक सेकंदाचा व्हीडीओ मिळवण्यासाठी तेवढंच जास्त रेकॉर्डिंग सुरूवातीला करावं लागेल.
ढगांचा टाईम लॅप्स काढायचा असेल, तर अंदाजे 5 सेकंदाचा इंटरव्हल योग्य ठरतो. म्हणजे 24 फोटोंसाठी 120 सेकंद. म्हणजेच 2 मिनिट कॅमेरा सुरू ठेवल्यावर एक सेकंदाचा टाईम लॅप्स व्हीडीओ मिळेल. मी काढलेला असाच एक टाईम लॅप्स व्हिडिओ खाली दिलेला आहे. हा 30 सेकंदाचा व्हीडीओ मिळवण्यासाठी मला एक तासभर कॅमेरा सुरू ठेवावा लागला.
हे सगळं झालं व्हीडीओच्या वेळेबाबत. आता बघुयात की व्हीडीओचं रिझोल्युशन म्हणजे काय आणि त्यात काय काय प्रकार आहेत. आपण नेहमी HD, फुल HD, 4k हे शब्द ऐकतो. पण त्याचा अर्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल.
कॅमेरा सेन्सर मध्ये आडवे आणि उभे किती पिक्सेल आहेत, त्यावरून फोटोचं रिझोल्युशन ठरतं. म्हणजे थोडक्यात तो फोटो किती आडव्या आणि किती उभ्या पिक्सेल नी बनलेला आहे.
व्हीडीओचं सुद्धा तसंच आहे. एखादा व्हीडीओ किती आडव्या आणि किती उभ्या पिक्सेल नी बनलेला आहे, ते म्हणजे त्या व्हीडीओचं रिझोल्युशन. त्याचे काही प्रचलित प्रकार आहेत, ते बघुयात.
1) VGA:- ह्या प्रकारात व्हीडीओचं रिझोल्युशन हे 640x480 पिक्सेल. म्हणजे 640 आडवे पिक्सेल आणि 480 उभे पिक्सेल. हा खूप जुना असा 1987 साली तयार झालेला फॉरमॅट आहे. अर्थातच, आजकाल ह्याच्या कमी दर्जामुळे हा खूप कमी ठिकाणी वापरला जातो.
2) HD (हाय डेफिनेशन):- ह्या प्रकारात व्हीडीओचं रिझोल्युशन हे 1280x720 एवढं असतं. हे रिझोल्युशन बऱ्याच वेळेला पुरतं. ह्यामध्ये उभे 720 पिक्सेल असतात म्हणून ह्याला 720p सुद्धा म्हणतात. p म्हणजे पिक्सेल.
3) फुल HD:- हे रिझोल्युशन म्हणजे 1920x1080. नवीन टीव्ही, लॅपटॉप, मॉनिटर हे हल्ली फुल HD रिझोल्युशन दाखवण्यासाठी सक्षम असतात. ह्यामध्ये व्हीडीओ भरपूर क्लियर आणि शार्प दिसतात. ह्याला 1080p असंही म्हणतात.
4) 4K:- इंग्रजीत 'k' हे अक्षर 'हजार' ह्या अर्थाने वापरतात. म्हणून हे रिझोल्युशन 3840x2160 एवढं असतं. मोठ्या टीव्ही किंवा मॉनिटर वर फुल HD रिझोल्युशन सुद्धा पाहिजे तेवढं शार्प दिसत नाही. त्यामुळे तिथे 4k रिझोल्युशन वापरलं, तर व्हीडीओ बघण्याचा खूप चांगला अनुभव मिळतो.
आता काही कंपन्या 8k रिझोल्युशनचे व्हीडीओ दाखवू शकतील असे टीव्ही तयार करत आहेत. पण सध्या तरी 8k रिझोल्युशन चे कुठलेही व्हीडीओ ग्राहकांसाठी बघण्यासाठी उपलब्ध नाहीयेत.
तसं बघितलं तर, रोजच्या वापरासाठी फुल HD रिझोल्युशन सुद्धा पुरून उरते. त्यामुळे उगाच प्रत्येकाने 4k च्या मागे पळू नये. अर्थातच 4k चे काही फायदे आहेत. पण अगदीच मोठा स्क्रीन असल्याशिवाय, त्या 4k चा काहीही उपयोग नाहीये.
आणि असंही, सध्या जेवढे काही व्हीडीओ उपलब्ध आहेत, त्यातले 70-80% व्हिडिओ तर मोबाईलवरच बघितले जातात. त्यामुळे अशा वेळेला तर 720p रिझोल्युशन सुद्धा पुरेसं आहे.
व्हीडीओ साठी एवढी वेगवेगळी रिझोल्युशन आहेत, तर मग व्हीडीओ ची फाईल साईज कशी ठरते? म्हणजे 1 सेकंदाचा व्हीडीओ किती mb चा असेल, हे कशावरून ठरतं?
तर ह्यासाठी व्हीडीओ रिझोल्युशन, डायनॅमिक रेंज, व्हीडीओ फॉरमॅट, डिटेल्स, ई. सर्व गोष्टींचा विचार होतो. जसं रिझोल्युशन वाढेल, तशी व्हीडीओ ची फाईल साईज पण वाढते.
पण रिझोल्युशन सोडलं, तर ह्यातील बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कॅमेऱ्यात कमी जास्त असतात. त्यामुळे मोबाईल फोन वर रेकॉर्ड केलेला HD व्हीडीओ आणि प्रोफेशनल व्हीडीओ कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केलेला HD व्हीडीओ ह्यांच्या फाईल साईज मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो, जरी रिझोल्युशन एकच असलं तरी.
तर ही होती व्हीडीओ ह्या प्रकाराबद्दल थोडी माहिती. ह्याच्याशी निगडीत अजून बरेच मुद्दे राहिले आहेत, जसे की RAW व्हीडीओ, फ्लॅट कलर प्रोफाइल, एक्सटर्नल रेकॉर्डिंग, फाईल कॉम्प्रेशन, बिट डेप्थ, ई. पण ते समजण्यासाठी ह्या गोष्टींचा खूप जास्त अभ्यास पाहिजे. त्याही गोष्टींची माहिती आपण घेणारच आहोत, पण नंतरच्या कुठल्यातरी पोस्ट मध्ये.
तोपर्यंत, ह्या माहितीचा उपयोग रोजच्या वापरात करायला सुरू करा आणि बघा, तुमच्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यातून तुम्ही काय काय करू शकता ह्याची जाणीव तुम्हाला होईल.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
‘कॅमेर्यातील फोकस प्रणाली’
ऑटो फोकस आणि मॅन्युअल फोकस बद्दलची माहिती
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸



टाईमलॅप्स व्हिडिओ लई भारी!👌🏻👌🏻👌🏻 आणि बाकी माहिती सुद्धा उपयुक्त!👍🏻
ReplyDelete😃👍🏻
Delete