उत्तम सेल्फी काढण्यासाठी ट्रीक्स आणि टिप्स

 

How to take good selfie explained in Marathi blog post


    सेल्फी हा प्रकार माहीत नसलेला माणूस आपल्याला सापडणारच नाही. प्रत्येक जण नेहमी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असतो. हॉटेलमध्ये जेवताना, फिरायला गेल्यावर, लग्नात नवरानवरी बरोबर स्टेजवर किंवा अगदी गाडी चालवताना सुद्धा.

    काही जण तर सेल्फी काढताना स्थळ आणि काळाचं भान सुद्धा विसरून जातात. असा हा सेल्फी चा महिमा. 😅

    सेल्फी म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, तर 'स्वतःचा किंवा आपल्या ग्रुपचा स्वतःचाच काढलेला फोटो, म्हणजे सेल्फी'. आता खरं म्हणजे हे सांगायची तशी काही गरज नाही. पण बऱ्याचदा काही लोक समोरच्याला असं बोलून जातात, की 'हा घे मोबाईल आणि माझा सेल्फी काढ.'. त्या खास लोकांसाठी सेल्फीची ही व्याख्या. 😂

    एक चांगला सेल्फी काढण्यासाठी बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यातले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

1. मोबाईल हातात कसा धरावा?

2. मोबाईलमधल्या काही खास मोड्सचा वापर.

3. सेल्फी काढताना फ्रेमिंग कसं करावं?

4. आपला चांगला अँगल ओळखणे.

5. सेल्फी स्टिक चा वापर.

चला तर मग, ह्याच मुद्द्यांची सविस्तर माहिती घेऊयात.


मोबाईल कसा धरावा?

    बऱ्याच जणांना सेल्फी काढताना मोबाईल धरायला त्रास होतो. म्हणजे हातात मोबाईल नक्की कसा धरला, म्हणजे मोबाईल पडणारही नाही आणि अगदी आरामात आपल्याला सेल्फी क्लिक करता येईल, ह्यात त्यांचा गोंधळ होतो.

    बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने मोबाईल धरल्यामुळे सेल्फी मध्ये बऱ्याच भागात आपला हात दिसतो आणि पाहिजे तसा अँगल मिळवता येते नाही. शिवाय आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलचा स्क्रीनचा आकार हा कमीत कमी 5 इंच तरी असतोच. त्यामुळे हा मोबाईल धरण्याचा प्रॉब्लेम अजूनच वाढतो.

Wrong hand position for holding mobile for selfie explained in Marathi blog post

    वरचा फोटो बघा. जर तुम्ही अशा पद्धतीने मोबाईल धरलात, तर तुमचा हात नक्कीच दुखणार. शिवाय तुम्हाला पाहिजे तसा सेल्फी येईल, ह्याची खात्री नाही.

    पण मोबाईल सुरक्षित ठेवून आणि हात न दुखवता सहज सेल्फी काढायचा असेल, तर खाली दाखवल्याप्रमाणे मोबाईल धरा. 

Right hand position for holding mobile for selfie explained in Marathi blog post

    हल्ली 95% मोबाईल मध्ये आवाज कमी जास्त करण्याचं बटण दाबल्यावर सुद्धा फोटो क्लिक होतो. त्यामुळे जर पोर्ट्रेट मोडमध्ये म्हणजेच उभा सेल्फी काढायचा असेल, तर खाली दाखवल्याप्रमाणे मोबाईल धरा.  म्हणजे आपल्या हाताचा अंगठा किंवा पहिलं बोट बरोब्बर त्या आवाजाच्या बटणावर येईल आणि अगदी आरामात आपण सेल्फी क्लिक करू शकतो. 

Right hand position for holding mobile for portrait or vertical selfie explained in Marathi blog post

सेल्फी साठी मोबाईल मध्ये असलेले मोड्स

    बऱ्याच मोबाईल मध्ये सेल्फी काढण्यासाठी कुठलं बटण दाबावंच लागेल असं नाही. कारण त्यामध्ये खास सेल्फी साठी, काही मोड्स दिलेले असतात. त्यातले काही आपण बघुयात.

सेल्फी क्लिक करण्यासाठी असलेले मोड्स

आजकाल बऱ्याच मोबाईल मध्ये, आपण फ्रंट कॅमेरामध्ये बघत असताना हाताचा पंजा दाखवला ✋, किंवा हसलो 🙂, किंवा व्हिक्टरी चा इशारा केला ✌️, तरी मोबाईलला ते कळतं आणि तो लगेच आपला सेल्फी क्लिक करतो.

किंवा काही मोबाईल मध्ये आपण 'चीज' असं म्हणलं, तरीसुद्धा मोबाईल फोटो क्लिक करतो. जसजसं नवीन प्रगत तंत्रज्ञान येईल, तशी ह्यामध्ये अजून भर पडेल.

सेल्फी चांगले येण्यासाठी असलेले मोड्स

    आपण प्रत्येक ठिकाणी नेहमी अगदी तयार होऊन जातो असं नाही. किंवा त्या ठिकाणी प्रकाश नीट असेल, ह्याचीही खात्री नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा सेल्फी चांगला येईल, ह्यासाठी मोबाईल मध्ये काही फिल्टर किंवा इफेक्ट दिलेले असतात.

ब्राईटनेस फिल्टर:- ह्या मोडमध्ये मोबाईल फोटो काढतो आणि नंतर त्यात प्रोसेसिंग करताना ब्राईटनेस वाढवतो. त्यामुळे कमी प्रकाशात काढलेले फोटो जास्त ब्राईट आणि चांगले दिसतात.

स्किन स्मूदनिंग फिल्टर:- नावावरूनच कळतं, की हा मोड वापरून फोटो काढला तर आपली त्वचा सॉफ्ट दिसते. स्पष्ट शब्दात सांगायचं, तर एकदम गुळगुळीत दिसते.

    पण हा फिल्टर जास्त प्रमाणात वापरला, तर मात्र माणूस प्लॅस्टिकच्या बाहुली सारखा दिसतो, कारण कुणाचीही त्वचा एवढी गुळगुळीत नसते. त्यामुळे ह्याचा जरा सांभाळून वापर करा. पण काही लोकांना तसं 'एक्स्ट्रा गुळगुळीत' दिसलेलंच आवडतं. शेवटी ज्याची त्याची आवड. 😅

फ्रंट फ्लॅश:- मोबाईलच्या मागच्या बाजूला जसा फ्लॅश असतो, थोडाफार तसाच पण थोड्या कमी क्षमतेचा फ्लॅश काही मोबाईलमध्ये पुढे सेल्फी कॅमेऱ्याच्या शेजारी सुद्धा दिलेला असतो. कमी प्रकाशाच्या वेळेला चेहऱ्यावर प्रकाश पाडण्यासाठी. काही मोबाईल मध्ये अशीही सोय असते, की समोर स्वतंत्र फ्लॅश नसतो, पण जेव्हा आपण फोटो क्लिक करतो, तेव्हा मोबाईलचा स्क्रीन त्याच्या ब्राइटनेसच्या पूर्ण क्षमतेने एकदा चमकतो, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो आणि फ्लॅशची कमतरता काही प्रमाणात भरून निघते.

पोर्ट्रेट ब्लर:- प्रोफेशनल कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळी लेन्सेस वापरून आपण बॅकग्राउंड ब्लर मिळवू शकतो. पण मोबाईल मध्ये एकच लेन्स असल्यामुळे, ते जरा अवघड असतं. पण तरीही, हल्ली मोबाईल मध्ये असा ब्लर मिळवण्यासाठी AI (आर्टिफिशियल इंटेलीजन्स) म्हणजेच सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. ह्यामध्ये मोबाईलच्या समोर जेव्हा माणूस असतो, तेव्हा सॉफ्टवेअर त्याची आकृती ओळखतं आणि त्याच्या बाजूचा भाग ब्लर करतं. ह्यामुळे अगदी प्रोफेशनल कॅमेऱ्याएवढा चांगला फोटो मिळत नसला, तरी बऱ्यापैकी चांगला फोटो मिळतो.

सेल्फी मध्ये काय घ्यावे आणि काय वगळावे?

    सेल्फी काढत असताना आपण स्वतः किंवा आपला ग्रुप एवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी नीट दिसल्या पाहिजेत ह्याची खबरदारी घ्यावी. नीट म्हणजे, सगळ्यांचे चेहरे नीट दिसतायत ना, कुणाचे डोळे बंद दिसत नाहीयेत ना, आणि सगळ्यात महत्वा चं म्हणजे सगळ्यांचं समोर मोबाईलकडे लक्ष आहे ना, ह्याची खात्री करून घ्यावी.

'काय घेऊ नये' ह्या बाबतीत सांगायचं झालं, तर प्रत्येक फोटो च्या बाबतीत हा नियम लागू होत नाही.

    म्हणजे बॅकग्राउंड मध्ये फार काही चांगलं आणि दाखवण्यासारखं नसेल, तर पूर्ण फ्रेम मध्ये तुम्ही सोडून बाकीच्या गोष्टीला जास्त प्राधान्य मिळेल, असा फोटो काढू नका. म्हणजे शक्यतो पूर्ण फ्रेम मध्ये जास्तीत जास्त भागात तुम्ही दिसाल असा सेल्फी काढा. 

    शिवाय बऱ्याच वेळेला गर्दीच्या ठिकाणी सेल्फी काढत असताना, बाकीच्या लोकांना आपण बाजूला करू शकत नाही. म्हणून फोटोमध्ये त्यातल्या त्यात कमी लोकांचे चेहरे दिसतील, अशा तऱ्हेने फोटो काढावा.

पण जर बॅकग्राउंड खूप सुंदर असेल, तर सेल्फी मध्ये तेसुद्धा दाखवल्याने सेल्फी अजूनच भारी वाटतो. हा खालचा फोटो बघा. ह्या ठिकाणी फक्त मी दिसणारा सेल्फी एवढा चांगला दिसला नसता. 

Man standing on cliff and taking selfie on action camera

आपला चांगला अँगल ओळखा

    असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का, की तुमचे काही ठराविक बाजूने काढलेले फोटोच तुम्हाला आवडतात? मग ते कुणीही काढलेले असुदे.

    ह्याचं कारण असं, की प्रत्येकासाठी असा एक ठराविक अँगल असतो, ज्या बाजूने बघितल्यावर ती व्यक्ती सगळ्यात छान दिसते. म्हणजे काही जण डावीकडून फोटो काढल्यावर चांगले दिसतात तर काही जण उजवीकडून, काही जणांचे जवळून चांगले फोटो येतात तर काही जणांचे लांबून. कुणाच्या एका गालावर तीळ असतो तर कुणाची हेअर स्टाईल एका ठराविक बाजूनेच चांगली दिसते.

    त्यामुळे असा स्वतःचा अँगल प्रत्येकाने ओळखावा आणि तो वापरूनच सेल्फी काढावा. फोटो चांगलाच येईल.

टीप:- तुमचे फोटो कुठल्याही बाजूने कसेही काढले तरी चांगलेच येत असतील, तर अभिनंदन. तुम्ही 100% फोटोजेनिक आहात. 😃


सेल्फी स्टिकचा उपयोग

Happy man holding selfie stick for mobile in hand

    सेल्फी स्टिक चा वापर बरेच जण करतात. कारण त्यामुळे आपण आपला मोबाईल जास्त लांब धरू शकतो आणि त्यामुळे फोटोमध्ये जास्त माणसं मावतात किंवा आपल्याला फोटो मध्ये बॅकग्राउंड पण दाखवता येतं. काही ठिकाणी सेल्फी काढताना आपल्याला फक्त आपला चेहरा दाखवायचा नसतो, तर फोटोमध्ये तिथलं वातावरण सुद्धा दाखवायचं असतं. त्यासाठी सेल्फीस्टिक खूप उपयोगी आहे.

    हल्ली काही मोबाईल मध्ये वाईड अँगलचे फ्रंट कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे जर त्याच्या जोडीला सेल्फी स्टिकही वापरली, तर मग एकदम भन्नाट असे सेल्फी काढता येतात.

    आत्तापर्यंत सांगितलेली माहिती ही, 'आपण मोबाईलवर सेल्फी काढणार आहोत' असं गृहीत धरून सांगितली आहे. पण सेल्फी काढण्यासाठी ऍक्शन कॅमेरा हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. मोबाईल वापरून कधीही मिळणार नाहीत, असे एकसे एक सेल्फी आपण ऍक्शन कॅमेऱ्यात काढू शकतो. हे खाली दिलेले फोटो पहा. मोबाईल किंवा दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने हे फोटो मी काढू शकलो नसतो.

Happy man taking selfie with action camera from vehicle window

Man taking selfie from behind or rear angle on an action camera

    आत्ताच्या काळात युट्युबवर फेमस असलेला 'व्लॉग' हा प्रकार सेल्फी व्हीडीओ प्रकारातच येतो. कारण ह्यामध्ये बोलणारा माणूस स्वतःच स्वतःचं शूटिंग करत असतो. त्यासाठी DSLR/मिरर लेस कॅमेरा वापरला जातो.

    त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल असुदे, DSLR किंवा मिररलेस कॅमेरा असुदे, किंवा ऍक्शन कॅमेरा असुदे. सेल्फी काढताना जर तुम्ही वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमचा सेल्फी चांगलाच येईल.

    आणि चांगल्या सेल्फीसाठी सगळ्यात शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे, चांगला आनंदी चेहरा. तुम्ही जर तसा चेहरा ठेवलात, तर बघा तुमचा प्रत्येक सेल्फी कसा छान येतोय ते.


- प्रसन्न जोशी.

        हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट

सोशल मीडियावर फोटो टाकताना

लक्षात ठेवायच्या गोष्टी

चांगल्या आणि वाईट दोन्हीही

 

हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸


Comments

  1. Nice article...specially mobile handling..angle from left/right side , Hairstyle looks

    ReplyDelete
  2. अतिशय उपयुक्त माहिती.

    ReplyDelete
  3. वा!
    अनेक लोकांची आणि विशेषतः मुलींची अशी तक्रार असते की 'माझा सेल्फी चांगला येत नाही'. अशा सर्व लोकांनी हा ब्लॉग जरूर वाचावा आणि त्यानुसार स्वत:त सुधारणा करून सेल्फी काढून पाहावा! पुर्वीपेक्षा नक्कीच चांगला येईल!😉😉😉

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच चांगला येईल 😁👍🏻

      Delete
    2. आपल्याला चांगला सेल्फी काढायचा आहे का? तर हो नक्कीच काढायचा आहे! त्यासाठी काय करावं लागेल? हा ब्लॉग वाचावा लागेल... नक्कीच वाचावा लागेल.... आणि त्यातल्या सूचना अंमलात आणाव्या लागतील....
      आमची तयारी आहे चांगला सेल्फी काढायची.... पण सेल्फीची तयारी आहे का आम्हाला चांगलं दाखवायची?

      Delete
  4. great
    very usefull for todays life.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला