‘कॅमेर्यातील फोकस सिस्टिम’ कशी काम करते?
आपण नेहमी हे वाक्य ऐकतो, की 'आयुष्यात फोकस नीट असेल, तरच यश मिळतं'. हेच फोटोग्राफीमध्ये सुद्धा लागू होतं. प्रत्येक फोटोमध्ये जर फोकस योग्य असेल, तरच फोटो चांगला येतो. ह्याबद्दलच सविस्तर माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
फोकस करणे म्हणजे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, त्या गोष्टीवर लक्ष देणे. फोटोग्राफी करताना समोरचं दृश्य, वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर लगेच आपल्याला ठरवायला लागतं, की ह्यातलं काय आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर फोकस कसा करायचा आहे, हेही ठरवावं लागतं.
फोकस करणे ही क्रिया दोन प्रकारे करता येऊ शकते. मॅन्युअल फोकस (Manual focus) किंवा ऑटो फोकस (Auto focus). त्याची सविस्तर माहिती आता बघुयात.
मॅन्युअल फोकस (Manual Focus)
आपण सर्वांनी भिंग वापरलं आहे. आपल्या हातातील भिंग आपण डोळ्यापासून तोपर्यंत लांब-जवळ करत राहतो, जोपर्यंत समोरची वस्तू आपल्याला पाहिजे तशी शार्प आणि मोठी दिसत नाही. लेन्समध्ये पण तेच होतं.
जेव्हा आपण लेन्सची फोकस रिंग फिरवतो, तेव्हा आतल्या काचा/भिंगं एकमेकांपासून जवळ किंवा लांब होतात. समोरची पाहिजे ती गोष्ट फोकस मध्ये येईपर्यंत म्हणजे शार्प दिसेपर्यंत आपण हे करत राहतो.
ह्या पद्धतीमध्ये आपल्याकडे पूर्ण कंट्रोल असतो. त्यामुळे आपण अगदी बारीक वस्तूवरसुद्धा फोकस करू शकतो. ह्यामध्ये कॅमेरा काहीही करत नाही.
ही पद्धत समजायला साधी सोपी आहे. पण ह्यामध्ये प्राविण्य मिळवणं, तेवढंच अवघड आहे. ह्यामध्ये आपल्याला व्ह्यू फाईंडर किंवा स्क्रीनवर बघून, लेन्सची फोकस रिंग योग्य दिशेत फिरवून फोकस करावं लागतं.
मॅन्युअल फोकसिंगचे फायदे:-
1. पूर्ण कंट्रोल:- लेन्सवरची फोकस रिंग आपण किती बारकाईने फिरवतो, त्याच्यावर फोकस अवलंबून असतो. त्यामुळे फोटोमधल्या फोकसवर आपला 100% कंट्रोल असतो.
2. मॅक्रो फोटोग्राफी मध्ये उपयुक्त:- मॅक्रो फोटोग्राफी (Macro photography) करताना खूप बारकाईने फोकस करावा लागतो. कारण आपल्या समोर एखादी वस्तू असेल तर ठीक. नाहीतर किडे, पाने, फुले ही सारखी हलत असतात. त्यामुळे कॅमेऱ्याचं ऑटो फोकसिंग इथे उपयोगाचं नाही. ह्यासाठी मॅन्युअल फोकसिंगच पाहिजे.
ह्यासाठी उदाहरण म्हणून खालचा फोटो बघुयात. ह्या थेंबांचा फोटो काढताना जेव्हा मी ऑटोफोकसिंग वापरत होतो, तेव्हा नेहमी भलतीकडेच फोकस होत होतं. कधी मागच्या पानावर, तर कधी अलीकडे कुठेतरी. म्हणून मी मॅन्युअल फोकस वापरून मला पाहिजे तिथं त्या दवबिंदूंवर फोकस केलं.
3. व्हीडीओग्राफी मध्ये उपयोगी:- सध्या युट्युबवर प्रचलित असलेला व्लॉग (Vlog) हा प्रकार आणि व्हीडीओचे इतर 2-3 प्रकार सोडले, तर बाकी सर्व व्हीडीओमध्ये मॅन्युअल फोकसिंगच वापरले जाते. कारण व्हीडीओ मध्ये आपण किंवा समोरची वस्तू ही सतत हलत असते. अशा वेळेला आपल्या हातात पूर्ण नियंत्रण असलेलं कधीही चांगलं. ह्यामुळे फोकस चुकण्याची शक्यता खूप कमी होते.
ह्यामुळेच सगळ्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये मॅन्युअल फोकसिंगच वापरतात. मग ते बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड. मोठ्या बजेटच्या कामांमध्ये तर कॅमेरामन हा फक्त कॅमेरा सांभाळायचं काम करतो. फोकस नीट करण्यासाठी स्पेशल वेगळा माणूस नेमलेला असतो. त्याचं काम फक्त एवढंच असतं, की प्रत्येक वेळेला फोकस पाहिजे तसा आणि पाहिजे तिथे सेट करणे. त्या माणसाला 'फोकस पुलर' (Focus Puller) असं म्हणतात.
मॅन्युअल फोकसिंगचे तोटे:-
1. अवघड कला :- मॅन्युअल फोकसिंग मध्ये प्राविण्य मिळवणे ही साधी गोष्ट नाहीये. खूप कष्ट लागतात त्याला. नजर आणि हात ह्यामध्ये ताळमेळ असावा लागतो. शिवाय हातावर पूर्ण नियंत्रण लागतं. प्रत्येकाला ते जमेलच असं नाही.
2. ठरवायला अवघड:- कॅमेऱ्याचा स्क्रीन हा तसा खूप छोटा असतो. त्यामुळे त्याच्यावर बघून हाताने फोकसिंग रिंग फिरवत अगदी परफेक्ट फोकस करणे अवघड आहे. म्हणजे फोकस झाले आहे का नाही, हे नक्की कळत नाही. व्ह्यू फाईंडर तर त्याच्यापेक्षा छोटा असतो. त्यामुळे ह्या कामासाठी नजर सरावलेली असली पाहिजे.
पण आता मिररलेस कॅमेऱ्यांमध्ये 'फोकस पीकिंग' (Focus peaking) ही सोय दिलेली असते. फोकस पीकिंग म्हणजे, जेव्हा आपण फोकस रिंग फिरवतो, तेव्हा फोटोचा कुठला भाग फोकस मध्ये आहे, तो भाग लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगाने हायलाईट केला जातो, जेणेकरून आपण कुठे फोकस करतोय ते आपल्याला लगेच कळतं. ह्याची खूप मदत होते.
3. वेळ लागतो:- कुठं फोकस करायचं हे जरी आपल्याला कळत असेल, तरीही त्यासाठी हाताने प्रत्येक वेळेला फोकस रिंग फिरवण्यात खूप वेळ जातो. समारंभाचे फोटो काढताना तर हे खूप त्रासदायक असते. त्यामुळे तशा प्रकारच्या कामांमध्ये मॅन्युअल फोकसिंग वापरणं सोयीचं नसतं.
ऑटो फोकस (Auto focus)
ह्या प्रकारच्या फोकसिंग मध्ये आपण फक्त हाफ क्लिक केलं, की कॅमेरा त्याच्या सॉफ्टवेअर च्या मदतीने फोकस करतो. तरीही, फ्रेम मध्ये कुठं फोकस करायचं तो पॉईंट आपल्याला आधीच सिलेक्ट करता येतो. त्यामुळे क्लिक केल्यावर कॅमेरा त्या पॉईंटपाशी जे काही असेल, त्याच्यावर फोकस करतो.
सध्या ऑटो फोकसिंगचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
1. CDAF - कॉन्ट्रास्ट डिटेक्शन ऑटो फोकस (Contrast Detection Auto Focus)
कॅमेऱ्याच्या सेन्सरवर पडणारी माहिती सतत गोळा केली जात असते. जेव्हा आपण हाफ क्लिक करतो, तेव्हा कॅमेरा लेन्सच्या आतल्या काचा पुढे मागे करतो आणि त्यावेळेला येणाऱ्या माहितीचा अभ्यास करतो. मग तो बघतो की, कुठल्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉन्ट्रास्ट होता आणि नंतर परत त्याच ठिकाणी काचा नेऊन फोकसिंग पूर्ण केलं जातं.
ह्या पद्धतीसाठी आपल्याला समोरून येणारा रिफ्लेक्ट झालेला प्रकाश लागतो. त्यामुळे कमी प्रकाश असेल, तर फोकसिंग खूप हळू होते.
शिवाय समजा समोरच्या दृश्यात खूप कमी कॉन्ट्रास्ट असेल, तर ही पद्धत काम करत नाही. उदाहरणार्थ, भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा बिंदूवर बऱ्याच वेळेला फोकसिंग होत नाही, कारण तिथे कॉन्ट्रास्ट नसतो.
2. PDAF - फेज डिटेक्शन ऑटो फोकस (Phase Detection Auto Focus)
ह्या प्रकारामध्ये खूप प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं. समोरून येणारा प्रकाश हा प्रत्येक पिक्सेलच्या दोन समान भागांमध्ये रेकॉर्ड केला जातो. ह्या दोन्ही ठिकाणच्या प्रकाशामध्ये काय आणि किती फरक आहे, हे बघितलं जातं. त्यानंतर तो फरक कमी करण्यासाठी लेन्सच्या काचा/भिंगं तोपर्यंत पुढे मागे केल्या जातात, जोपर्यंत त्या दोन्ही समान भागातील प्रकाशाची माहिती एकसारखी होत नाही. ह्यातसुद्धा समोरून येणारा रिफ्लेक्ट झालेला प्रकाशच आपल्याला लागतो.
आपल्या डोळयांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. दोन्ही डोळे थोडेसे लांब असल्यामुळे, त्यांना अगदी थोड्या फरकाने समोरचं दृश्य दिसतं. मग त्या दोन्ही दृश्यांना एकत्र करून समोरची वस्तू किती लांब आहे, हे आपला मेंदू आपल्याला सांगतो. फक्त एका डोळ्याने बघून आपल्या अंतराचा अंदाज येत नाही. तशाच प्रकारे ही फोकसिंग सिस्टीम काम करते.
हा प्रकार समजायला पण अवघड आहे आणि घडवून आणायला पण. कारण असे सेन्सर खूप बारकाईने बनवावे लागतात. पण हल्ली सगळ्या कॅमेरा आणि मोबाईलमध्ये बहुतेक हीच पद्धत वापरली जाते.
3. लेझर फोकसिंग (Laser focusing)
आधीच्या दोन्ही पद्धतीच्या उलट, ह्यामध्ये समोरून येणारा प्रकाश लागतोच असं नाही. कारण ह्या प्रकारात कॅमेरा किंवा मोबाईल मधून लेझर ची किरणे फेकली जातात आणि ती जेव्हा समोर कशालातरी धडकून परत येतात, तेव्हा त्यांना जाऊन परत यायला लागलेल्या एकूण वेळाचा अंदाज घेतला जातो. त्यावरून समोरची वस्तू किती लांब आहे, हे ठरवलं जातं आणि त्यानुसार लेन्स पुढे मागे घेऊन फोकसिंग केलं जातं.
ही पद्धत कमी प्रकाशात सुद्धा वापरता येते आणि ही फास्ट सुद्धा असते. पण लेझर ची प्रणाली महाग असल्यामुळे, काही ठराविक कॅमेरा/मोबाईल मध्येच ही वापरली जाते.
ऑटो फोकसिंग चे फायदे:-
1. फास्ट फोकसिंग:- बऱ्यापैकी प्रकाश असताना, ऑटोफोकसिंग सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे आणि फास्ट काम करते. त्यामुळे फोटो काढण्यासाठी एकूणच कमी वेळ लागतो.
2. काम सोपं होतं:- आत्ताच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑटोफोकसिंग इतक्या चांगल्या प्रकारे केलं जातं, की खूप कमी वेळेला आणि काही ठराविक ठिकाणीच आपल्याला मॅन्युअल फोकसिंग वापरावं लागतं. शिवाय बऱ्याच वेळेला आपण कॅमेराला आधीच सांगितलेलं असतं की कुठल्या भागात फोकसिंग करायचं आहे. त्यामुळे फोकस शक्यतो चुकत नाही.
3. वापरायला सोपं:- टचस्क्रीन च्या सोयीमुळे, आपल्याला जिथे फोकस करायचं आहे, तिथं नुसतं क्लिक केलं की कॅमेरा आपोआप तिथं फोकस करतो. ह्यापेक्षा अजून सोपं काय पाहिजे आपल्याला.
ऑटो फोकसिंग चे तोटे:-
1. आपलं नियंत्रण नाही:- फ्रेम मध्ये नक्की कुठं फोकस करावा हे जरी आपल्याला ठरवता येत असेल, तरी क्लिक केल्यावर तिथंच फोकस होईल असं 100% वेळा होत नाही. कारण कॅमेऱ्याला प्रकाशाची तेवढी योग्य आणि पुरेशी माहिती मिळेलच असं नाही. त्यामुळे काही ठिकाणी मॅन्युअल फोकस चांगला पर्याय ठरतो.
2. क्रिएटिव्ह फोटोग्राफी मध्ये उपयोग नाही:- जर आपल्याला काही कलात्मक फोटो काढायचे असतील आणि त्यासाठी मुख्य भाग सोडून दुसर्या कुठल्यातरी एका छोट्या भागावर फोकस करायचा असेल, तर त्यावेळेला ऑटो फोकसिंग पेक्षा मॅन्युअल फोकसिंग जास्त उपयोगी ठरते.
ह्याचं उदाहरण म्हणून खालचा फोटो बघुयात. मला ह्या जाळीचा फोटो काढायचा होता. जेव्हा मी ऑटोफोकस करायचा प्रयत्न केला तेव्हा कॅमेऱ्याने मागच्या इमारतीवर फोकस केलं. म्हणून नंतर मी मॅन्युअल फोकसिंग वापरून, मला पाहिजे तसं जाळीवर फोकस केलं.
3. व्हीडीओसाठी उपयोगी नाही:- व्हीडीओ मध्ये सगळ्या वस्तू/व्यक्ती सतत हलत असल्यामुळे, कॅमेरा ऑटोफोकसिंग साठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तसंच फ्रेम मध्ये इतक्या गोष्टी असताना, की फोकस करताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं, हे कॅमेऱ्याला कळेलच असं नाही. त्यामुळे व्हीडीओच्या कामांमध्ये बहुतेक करून मॅन्युअल फोकसिंगच वापरलं जातं.
तर असे हे मॅन्युअल फोकसिंग आणि ऑटो फोकसिंग चे दोन्ही पर्याय त्यांच्या त्यांच्या ठिकाणी उत्तम आहेत. आपण फक्त एवढंच करायचं, की योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी, ह्यांच्यातील योग्य पर्याय निवडायचा.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
'अॅक्शन कॅमेरा'
छोटा पॅकेट, बडा धमाका
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸



छान माहिती 👌🏻 👌🏻
ReplyDeleteधन्यवाद 😀
Delete👍 useful information
ReplyDeleteधन्यवाद 😀
DeleteVery useful information Sir
ReplyDeleteArun Mali
😀🙏
Deleteछोट्या मोठ्या parts ची अगदी सखोल माहिती.👌👌
ReplyDeleteVery nice sir 🙏
🙏🙂
Delete👍🏻🙂
ReplyDeleteछान माहिती!!
ReplyDelete🙏🙂
Delete