ऍक्शन कॅमेरा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका
(Disclosure:- This post contains few affiliate purchase links, through which, as an Amazon Associate, I earn from qualifying purchases.)
आपण ह्याआधीच्या एका पोस्ट मध्ये कॅमेऱ्याचे मुख्य प्रकार बघितले आहेत. म्हणजे पोलराईड कॅमेरा, पॉईंट अँड शूट कॅमेरा, DSLR कॅमेरा आणि मिररलेस कॅमेरा. (ती पोस्ट वाचली नसेल, तर ह्या लिंकवर जाऊन वाचू शकता.:- कॅमेर्याचे प्रकार)
पण त्यातल्या पॉईंट अँड शूट कॅमेऱ्याचा दुसरा एक प्रकार असाही आहे, की समोर बघितल्यावर कुणालाही वाटणार नाही की तो एवढा जबरदस्त आहे. तो प्रकार म्हणजे 'ऍक्शन कॅमेरा'.
ऍक्शन कॅमेरा म्हणजे नक्की कुठला कॅमेरा? तर त्याच्या नावावरून आपल्याला कळतंय तसाच तो आहे, म्हणजे ऍक्शन शूट करण्यासाठी. मग ती ऍक्शन कुठलीही असो. म्हणजे कुठलाही खेळ असो, पाण्याखाली केलेलं स्कुबा डायव्हिंग असो, बर्फात केलेलं स्कीइंग असो किंवा अगदी साधी बाईक राईड असो. अशा बऱ्याच ठिकाणी ऍक्शन कॅमेऱ्याचा उपयोग होतो, जिथे बाकी कुठलेही कॅमेरे वापरणं शक्य होत नाही. ह्याचीच माहिती ह्या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
हा ऍक्शन कॅमेरा हा अगदी छोटा आणि साधा असतो. वरच्या फोटोमध्ये आपण ते पाहू शकतो. हा 'गोप्रो' कंपनीचा 'हिरो 5 ब्लॅक' ऍक्शन कॅमेरा आहे. ह्यामध्ये समोर एक वाईड अँगल लेन्स बसवलेलं असतं, जे आपल्याला DSLR सारखं बदलता येत नाही. पण आपल्याला कॅमेऱ्यातील सॉफ्टवेअर मध्ये त्याचा फिल्ड ऑफ व्ह्यू डिजिटली कमी जास्त करता येतो.
त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला स्क्रीन बसवलेला असतो जो वापरून आपण फ्रेमिंग करू शकतो, सेटिंग बदलू शकतो आणि काढलेले फोटो बघू शकतो. आधीच्या ऍक्शन कॅमेऱ्यांमध्ये स्क्रीनच नसायचा. पण गेल्या 5-6 वर्षांपासून ऍक्शन कॅमेऱ्यांमध्ये टचस्क्रीन ची सोय दिली जाते.
कॅमेऱ्याच्या उरलेल्या भागात 2-3 बटणं, माईक, स्पीकर, मेमरी कार्ड साठी जागा आणि चार्जिंग साठी पोर्ट असे पार्ट दिलेले असतात. एकूणच काय, तर अगदी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सोयी द्यायचा प्रत्येक कंपनीचा प्रयत्न असतो.
ह्या सगळ्या सोयी सोडून ऍक्शन कॅमेऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सध्याचे ऍक्शन कॅमेरे हे वॉटरप्रूफ असतात. म्हणजे अंदाजे 10 मीटर पर्यंत तुम्ही ते तसेच पाण्याखाली नेऊ शकता आणि फोटो किंवा व्हीडीओ शूट करू शकता. जर कॅमेरा त्याहीपेक्षा खाली न्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळं केसिंग मिळतं, जे वापरून तुम्ही पाण्याखाली अगदी 30 मीटर पर्यंत फोटो आणि व्हीडीओ शूट करू शकता. जुने कॅमेरे वॉटरप्रूफ नव्हते, म्हणून तेही ह्या केसिंग मध्ये घालून वॉटरप्रूफ कॅमेरे म्हणून वापरता येतात.
ह्या छोट्याशा ऍक्शन कॅमेऱ्याचे फायदे आणि तोटे काय काय आहेत ते बघुयात.
ऍक्शन कॅमेऱ्याचे फायदे
1. न्यायला आणायला सोपा:- वरच्या फोटोत आपण बघितलं, की हे कॅमेरे किती छोट्या आकाराचे असतात. हातात अगदी पूर्ण बसतात. तसंच त्यांचं वजनसुद्धा खूप कमी असतं, अंदाजे 100 ते 150 ग्रॅम...म्हणजे अगदी आपल्या मोबाईलएवढंच. त्यामुळे हे कॅमेरे कुठंही न्यायला सोपे असतात. अगदी खिशात टाकलं की झालं.
2. हाताळायला सोपा:- छोट्या आकारामुळे हे कॅमेरे हाताळायला अगदी सोपे असतात. मी तर म्हणेन आपल्या मोबाईलपेक्षाही सोपे. आणि कमी वजनाचे असल्यामुळे आपल्याला हे कसेही वापरता येतात. एकाच हाताने धरून, हात वर करून, खाली धरून, इ.
3. युनिक अँगल्स मिळतात:- ह्याचा आकार आणि वजन खूप कमी असल्याने आपल्याला जिथं जिथं आवडेल आणि सुचेल, तिथं तिथं आपण हे कॅमेरे वापरू शकतो. म्हणजे एकदम लांब सेल्फी स्टिक वर लावून, डोक्यावर किंवा हेल्मेट वर लावून, सायकल/बाईक च्या हँडल ला लावून, गाडीच्या टपावर आणि असे अजून असंख्य अँगल्स आपल्याला मिळवता येतात, जे बाकीच्या कुठल्याही कॅमेऱ्याने सहज मिळवता येत नाहीत.
आता हा खालचाच फोटो बघा. ह्या अँगलनी असा फोटो मी दुसर्या कुठल्याच कॅमेर्याने काढू शकलो नसतो.
4. वॉटरप्रूफ:- ही माझ्या सगळ्यात आवडीची सोय आहे. मी जेव्हा जेव्हा पावसाळ्यात ट्रेकिंग ला किंवा फिरायला जातो, तेव्हा फक्त हा एकच कॅमेरा घेऊन जातो. कारण बाकीचे कॅमेरे आणि मोबाईल, पाण्यामुळे किंवा नुसत्या आर्द्रतेमुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा कॅमेरा बरोबर असेल, तर 'फोटो काढता आला नाही' असं कधीच होतं नाही.
मी एका छोट्या धबधब्याखाली जाऊन ऍक्शन कॅमेरा वापरुन काढलेला फोटो खाली देत आहे. दुसर्या कुठल्याच पद्धतीने असा फोटो मला काढता आला नसता. हाच तो ऍक्शन कॅमेर्याचा सगळ्यात मोठा फायदा.
5. वाईड अँगल लेन्स:- ह्या कॅमेऱ्याचं लेन्स हे वाईड अँगल लेन्स असतं. म्हणजे ह्यात नेहमीच जवळपास सगळंच दिसत असतं. त्यामुळे ग्रुप सेल्फी काढला तर सगळे जण अगदी आरामात एकाच फोटोमध्ये येतात. धकलाढकली आणि चेंगराचेंगरी न करता 😅. शिवाय कधी हात वर किंवा खाली धरून फोटो काढला, तर फोटो काढताना स्क्रीन बघता आला नाही तरी चालतं. कारण वाईड अँगल लेन्स असल्यामुळे समोरची वस्तू, व्यक्ती किंवा दृश्य फ्रेममध्ये येणारच ह्याची खात्री असते.
खालचे हे दोन फोटो बघा, म्हणजे तुम्हाला वाईड अँगल चा फायदा लगेच समजेल. मोबाईल वर काढलेला साधा फोटो जर छान येत असेल, तर वाईड अँगल ऍक्शन कॅमेर्यात काढलेला फोटो अप्रतिम येतो.
हाय क्वालिटीमुळे, व्हीडीओ बघणाऱ्याला आपण स्वतः अगदी त्या ठिकाणीच आहोत, असं वाटतं. त्यासाठी हा माऊंटन सायकलिंग चा व्हीडीओ बघा. मला स्वतःला खूप आवडला हा व्हीडीओ.
8. भरपूर ऍक्सेसरीज उपलब्ध:- ऍक्शन कॅमेऱ्यांसाठी खूप प्रकारच्या ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत. जसे की वेगवेगळे माउंट जे वापरून तुम्ही डोक्यावर, हेल्मेट वर, हातावर, ई. बऱ्याच ठिकाणी ऍक्शन कॅमेरा लावू शकता. ह्यामुळे व्हीडीओला एक वेगळा आणि भन्नाट अँगल मिळू शकतो, जो आधी कुणीच बघितलेला नसेल. ह्याचं अगदी दुसरं टोक म्हणजे, वजनाने हलके असल्यामुळे काही जण हे कॅमेरे बाणावर लावून ते हवेत उडवतात सुद्धा 😅. असाच एक व्हीडीओ खाली देत आहे. गम्मत म्हणून नक्की बघा. 😃
ऍक्शन कॅमेऱ्याचे तोटे
1. लहान सेन्सर:- छोट्या आकारात सगळं बसवायचं असल्यामुळे, ऍक्शन कॅमेऱ्यांचे सेन्सर हे लहान असतात. त्यामुळे प्रकाश कमी असेल, तर फोटो आणि व्हीडीओचा दर्जा खूप चांगला मिळत नाही.
2. मर्यादित मेगापिक्सेल:- लहान सेन्सर असल्यामुळे लेटेस्ट कॅमेऱ्यात सुद्धा जास्तीत जास्त 12 मेगापिक्सेलच आहेत. त्यामुळे फोटोचा दर्जा मर्यादित असतो. पण मुळात ऍक्शन कॅमेरे हे व्हीडीओ साठीच बनलेले आहेत आणि फोटो काढण्याची सोय ही बोनसच आहे. त्यामुळे आपण हे समजू शकतो.
3. एकच वाईड अँगल लेन्स:- ह्या कॅमेऱ्यांमध्ये वाईड लेन्स बसवलेलं असतं, जे आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळे आपण फक्त वाईड अँगल फोटोच काढू शकतो.
4. ठीकठाक ऑडियो:- ऍक्शन कॅमेऱ्यांमध्ये एकदम लहान माईक बसवलेला असतो. त्यामुळे त्यात रेकॉर्ड होणारा आवाज हा ठीक ठाक असतो. शिवाय बहुतेक सगळ्या ऍक्शन कॅमेऱ्यांमध्ये त्यांचा आकार लहान ठेवण्यासाठी, बाहेरून दुसरा माईक जोडण्यासाठी पोर्ट दिलेलं नसतं. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आवाज रेकॉर्ड करायचा असेल, तर वेगळा माईक वापरावा लागतो आणि त्यातला साउंड ट्रॅक नंतर सॉफ्टवेअर वापरून व्हीडीओमध्ये जोडावा लागतो.
5. लहान बॅटरी:- ऍक्शन कॅमेऱ्यांची बॅटरी कमी क्षमतेची असते. त्यामुळे बाकीच्या कॅमेऱ्यांचा तुलनेत कमी फोटो आणि व्हीडीओ शूट करता येतात. त्यात जर तुम्ही 4k सारख्या हाय रिझोल्युशन चे व्हीडीओ शूट करत असाल, तर बॅटरी अजूनच लवकर संपते. म्हणून ज्यांना जास्त वेळासाठी ऍक्शन कॅमेरा वापरायचा असेल, त्यांनी जास्तीच्या 1-2 बॅटरी जवळ ठेवाव्यात.
सध्या बाजारात काही खूप चांगले चांगले ऍक्शन कॅमेरे उपलब्ध आहेत. अशाच काही कॅमेऱ्यांच्या लिंक खाली देत आहे. तुम्हाला ते कॅमेरे बघायचे असतील किंवा घ्यायचे असतील, तर त्या लिंकवर जाऊ शकता.
असे हे आगळेवेगळे पण भन्नाट कॅमेरे प्रत्येकाला आवडतील असेच आहेत. अर्थात प्रत्येक कॅमेऱ्याचे असतात तसे ह्याचेही काही तोटे आहेत. पण जर तुम्ही ऍक्शन कॅमेरा वापरण्याचे फायदे लक्षात घेतलेत, तर मग त्या तोट्यांकडे तुम्ही सहज दुर्लक्ष करू शकता.
ह्या पोस्टमध्ये मी फक्त ऍक्शन कॅमेऱ्यांची माहिती दिली, जी मला गेली 3 वर्ष ऍक्शन कॅमेरा वापरल्यामुळे मिळाली आहे. ह्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल. पण शेवटी आवड तुमची, कॅमेरा वापरायचाय तुम्हाला आणि पैसे पण तुमचेच.
पण एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो, जेव्हा पासून मी ऍक्शन कॅमेरा घेतला आहे, तेव्हा पासून गेल्या 3 वर्षात एकदाही मला त्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाहीये. झालाय तो फक्त आनंदच.
- प्रसन्न जोशी.
हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील.
पुढची पोस्ट
' DOF - डेप्थ ऑफ फिल्ड '
फोटोमध्ये कमी जास्त ब्लर कसा मिळवायचा?
हसत रहा आणि शिकत रहा.
📸 😃 📸 😃 📸 😃 📸 😃 📸




माहिती सोप्या आणि स्पष्ट शब्दात आहे,
ReplyDeleteआणि तु लिहीलयस म्हणजे योग्यच माहिती,
तुझा एक अनुभवी ग्राहक.
पराग बेलवलकर
8554972377
धन्यवाद. 😃🙏
Deletemountain cycling चे मी आणखी पण काही व्हिडिओज् यापूर्वी बघितले आहेत. सगळ्यात एक साम्य जाणवलं आणि त्याचं उत्तर या पोस्टमध्ये मिळालं! या सगळ्या व्हिडिओज्मध्ये साम्य असं की जेव्हा तो सायकलस्वार डोंगरावरून खाली येऊ लागतो तेव्हा काही ठिकाणी असं वाटतं की 'अरे इथे रस्ता संपतोय की काय!?'
ReplyDeleteही पोस्ट वाचताना हे असं का होतं ते लक्षात आलं! सगळे श्रेय ऍक्शन कॅमेराच्या लेन्सच्या 'त्या' अँगलला!!😅😅😅
अगदी खरं आहे 😃
Deleteखरच छोटा पॅकेट बडा धमाका आहे हा कॅमेरा 📷
ReplyDelete-निकिता जाधव
होय 😃👍🏻
DeleteGreat thank u for brief information
ReplyDelete