फोटोमधली 'डेप्थ ऑफ फील्ड' म्हणजे काय?

 

Depth of field for camera explained in Marathi blog post

आजचं कॅमेरा तंत्रज्ञान खूप विकसित झालं आहे. मोबाईल कॅमेऱ्यांमुळे फोटोग्राफीही कॉमन झाली आहे. फोटोग्राफीचे असंख्य प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आहेत. तरीही 90% लोकांना बॅकग्राउंड ब्लर झालेले फोटोच आवडतात. कारण ते दिसायला खरंच खूप छान दिसतात आणि आपल्याला फोटोमधला महत्वाचा भाग लगेचच कळतो.

आपण जेव्हा असे फोटो बघतो, तेव्हा मनात विचार येतो, की हा ब्लर कमी जास्त कसा करायचा? तो कुठल्या गोष्टींवर अवलंबून असतो? नेहमी जास्त ब्लरच चांगला असतो का? ह्याच प्रश्नांना अनुसरून आपण ह्या पोस्ट मध्ये माहिती घेणार आहोत.


'ब्लर' हा शब्द आपण सहजच वापरतो. पण तो इफेक्ट तांत्रिकदृष्ट्या 'डेप्थ ऑफ फिल्ड' मुळे तयार होतो. फोटोमध्ये आपल्याला सगळ्यात पुढं जी गोष्ट दिसते, ती आपल्या जवळ असते आणि सगळ्यात मागे जी गोष्ट दिसते, ती आपल्यापासून सगळ्यात लांब असते. फोटोग्राफी मध्ये पुढून मागे जाणारं हे अंतर 'खोली' मध्ये मोजतात. म्हणून इथे 'डेप्थ' हा शब्द वापरला जातो.

आणि इथे 'फिल्ड' ह्या शब्दाचा अर्थ 'फोकस मध्ये असलेला भाग' असा घेतला जातो. हा फोकसमध्ये असलेला भाग कॅमेऱ्याच्या सेन्सर ला नेहमी समांतर म्हणजे पॅरलल असतो. (फक्त जेव्हा टिल्ट- शिफ्ट लेन्स वापरतात, ती वेळ सोडून.) ( टिल्ट- शिफ्ट लेन्स बद्दल माहिती घेतली नसेल, तर ह्या लिंक वर जाऊन वाचू शकता.:- लेन्सेस चे प्रकार )

म्हणजे थोडक्यात  'डेप्थ ऑफ फिल्ड' म्हणजे कॅमेर्‍याच्या त्या सेटिंग ला 'फोटोमधला किती खोलीचा भाग एकदम स्पष्ट फोकस मध्ये आहे'. जेवढा कमी भाग फोकस मध्ये येईल, तेवढाच ब्लर वाढेल.

आता ही खोली म्हणजेच डेप्थ ऑफ फिल्ड कशावर अवलंबून आहे, ते आपण बघुयात.

1. लेन्स अपर्चर वर

आपण लेन्स अपर्चरबद्दलच्या पोस्ट मध्ये बघितलं, की अपर्चर कमी जास्त करून आपण डेप्थ ऑफ फिल्ड (आणि परिणामी ब्लर) कमी जास्त करू शकतो. (ती पोस्ट वाचली नसेल, तर ह्या लिंक वर जाऊन वाचू शकता.:- लेन्स अपर्चर बद्दल पूर्ण माहिती)

अपर्चर ची किंमत कमी असेल, तर डेप्थ ऑफ फिल्ड सुद्धा कमी असते आणि म्हणून एकदम थोडा भाग फोकस मध्ये येऊन आपल्याला मागे जास्त ब्लर मिळतो.

तसंच अपर्चरची किंमत जास्त असेल, तर डेप्थ ऑफ फिल्ड सुद्धा जास्त असते आणि म्हणून बराच भाग फोकस मध्ये येऊन आपल्याला मागे कमी ब्लर मिळतो. हे आपण खालच्या फोटोमध्ये बघू शकतो.

Change in background blur according to changing aperture value explained in marathi blog post

2) फोकल लेन्थवर

लेन्सची फोकल लेन्थ किती आहे, त्याच्यावरसुद्धा डेप्थ ऑफ फिल्ड अवलंबून असते. फोकल लेन्थ जेवढी कमी, तेवढी डेप्थ ऑफ फिल्ड जास्त असते आणि फोकल लेन्थ जेवढी जास्त, तेवढी डेप्थ ऑफ फिल्ड कमी असते.

थोडक्यात म्हणजे एकच अपर्चर कायम ठेऊन, आपल्याला वाईड अँगल लेन्स वापरुन कमी ब्लर मिळेल आणि टेलिफोटो लेन्स वापरुन जास्त ब्लर मिळेल.

ह्यासाठी आपण खालचे 2 फोटो बघू शकतो. पहिला फोटो 24 mm फोकल लेन्थ वर आणि दुसरा फोटो 70 mm फोकल लेन्थवर काढला आहे. दोन्ही फोटो काढताना अपर्चर f2.8 च ठेवलं आहे. पण आपण तुलना करून बघू शकतो, की 24 mm ला डेप्थ ऑफ फिल्ड जास्त आहे (फोटो मध्ये जास्त भाग फोकस मध्ये आहे) आणि 70 mm ला डेप्थ ऑफ फिल्ड कमी आहे (फोटोमध्ये थोडाच भाग फोकस मध्ये आहे).

(इथं 24 mm ला काढलेला मूळ फोटो पूर्ण न दाखवता, तुलनेला सोपं व्हावं म्हणून झूम करून दाखवला आहे.) 

Change in depth of field at same aperture but various focal lengths explained in Marathi blog post

3) कॅमेरा आणि सब्जेक्ट ह्यांचातील अंतर

कॅमेरा फोटोमधल्या मुख्य सब्जेक्टच्या जेवढा जवळ असेल, तेवढी डेप्थ ऑफ फिल्ड कमी असते. अर्थात कॅमेरा सब्जेक्टच्या जवळ आल्यामुळे फोटोमधलं फ्रेमिंग बदलेल, पण ब्लर वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

ह्यामुळेच मॅक्रो फोटोग्राफी मध्ये खूप जवळून फोटो काढताना, मुख्य सब्जेक्टचा थोडासा भाग फोकस मध्ये ठेवण्यासाठी सुद्धा अपर्चरची खूप मोठी किंमत वापरावी लागते. म्हणजेच नेहमीपेक्षा खूप जास्त डेप्थ ऑफ फिल्ड वापरावी लागते.

खाली दिलेले 2 फोटो बघा. पहिला फोटो f2 अपर्चरवर काढला आहे आणि दुसरा फोटो f11 अपर्चर वर काढला आहे. नेहमीच्या परिस्थितीत (नॉन-मॅक्रो फोटो काढताना), f11 म्हणजे फोटोमधला जवळ पास सगळाच भाग फोकस मध्ये येतो. पण इथे मॅक्रो फोटो काढताना कॅमेरा सब्जेक्ट च्या इतक्या जवळ आहे, की f11 अपर्चर सुद्धा पुरत नाही.

Shallow and deep depth of field in macro photographs explained in Marathi blog post


सगळ्या प्रकारच्या फोटोंमध्ये, बॅकग्राउंड ब्लर झालेले फोटो हे सगळ्यांनाच आवडतात. पण काही वेळेला आपल्याला काही मर्यादांमुळे पाहिजे तेवढा ब्लर मिळवता येते नाही. तर तो मिळवण्यासाठी आपण काय युक्ती वापरू शकतो, ते आता बघुयात.

1) टेलिफोटो लेन्स वापरावे.

वर बघितल्याप्रमाणे जास्त फोकल लेन्थ असलेलं लेन्स वापरलं, तर आपल्याला जास्त ब्लर मिळू शकतो. त्यामुळे एखाद्या फोटोमध्ये आपल्याला जास्त ब्लर पाहिजे असेल, तर जेवढं शक्य असेल तेवढं मागे जाऊन झूम करून फोटो काढावा. पण ह्यामुळे फोटोचं फ्रेमिंग बदलणार, हे लक्षात ठेवावं लागेल.

हे समजण्यासाठी खाली दिलेले फोटो बघा. जेव्हा एकाच वस्तूचे वेगवेगळ्या फोकल लेन्थ वर फोटो काढले जातात, तेव्हा जशी फोकल लेन्थ वाढत जाते, तसा ब्लर सुद्धा वाढत जातो. (पण फ्रेमिंग सुद्धा बदलतं.)

Change in background blur when focal length is changed


2) सब्जेक्टची जागा बदलणे

जर आपल्याला जास्त ब्लर पाहिजे असेल, तर बॅकग्राउंड मधल्या गोष्टी कमीत कमी दिसल्या पाहिजेत. म्हणूनच, मुख्य सब्जेक्ट पेक्षा बॅकग्राउंड जेवढं लांब असेल, तेवढं ते ब्लर व्हायला मदत होईल.

म्हणून फोटोमध्ये जास्त ब्लर मिळवण्यासाठी नेहमी सब्जेक्ट ला बकग्राऊंड पासून जमेल तेवढं लांब ठेवा.

खालील फोटो बघा. ह्या दोन्ही फोटोंमध्ये कॅमेरा आणि सब्जेक्ट एकाच जागेवर ठेवले आहेत, पण मागची वस्तू सब्जेक्ट पासून लांब ठेवल्यामुळे ब्लर चा इफेक्ट जास्त दिसून येतोय.

Increase in background blur when background is further away from subject


बोनस टीप:-

फोटो काढताना नेहमी बॅकग्राउंड मध्ये कमीत कमी वस्तू किंवा माणसं असतील, ह्याची खबरदारी घ्या. कारण ब्लर ठराविकच असला, तरीही बॅकग्राउंड मध्ये नेटकेपणा असेल, तर फोटो आपोआपच छान दिसायला लागतो.

आता हे सगळं झालं डेप्थ ऑफ फिल्ड बद्दलचं ज्ञान. पण ते वापरायचं कुठं, ह्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.


कमी डेप्थ ऑफ फिल्ड कुठं वापरावी

डेप्थ ऑफ फिल्ड कमी असेल, तर अगदी थोडाच भाग फोकस मध्ये असतो. म्हणजे फोटो बघणाऱ्याला फक्त तोच भाग महत्वाचा वाटतो. त्यामुळे जिथे आपल्याला ठराविक वस्तूला जास्त महत्व द्यायचं असेल, तिथे डेप्थ ऑफ फिल्ड कमी ठेवावी. उदाहरणार्थ, पोर्ट्रेट फोटो काढताना, कधीतरी फूड फोटोग्राफी करताना, कँडीड फोटो काढताना, ई.

हा खालचा मॅक्रो फोटो बघा. इथे जास्वंदीच्या फुलाचे फक्त परागकण दाखवायचे होते, म्हणून इथे डेप्थ ऑफ फिल्ड कमी ठेवली आहे.

Macro photo of pollen of Hibiscus flower taken with wide open aperture


जास्त डेप्थ ऑफ फिल्ड कुठं वापरावी

बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त एकच वस्तू नाही, तर सगळ्याच वस्तू महत्वाच्या असतात. शिवाय आपल्याला फोटोमध्ये बॅकग्राऊंडला सुद्धा तेवढंच महत्व द्यायचं असतं. अशा वेळेला डेप्थ ऑफ फिल्ड जास्त ठेवावी, जेणेकरून फोटोमध्ये जास्तीत जास्त भाग फोकस मध्ये येईल. उदाहरणार्थ, लँडस्केप फोटो, ग्रुप फोटो, आर्किटेक्चर फोटो, ई.

ह्याचं उदाहरण म्हणून खालचा लँडस्केप फोटो बघा. ह्या फोटो मध्ये सगळ्यात पुढची झाडे, त्यानंतर थोडं मागं असलेलं ते घर, त्याच्या मागचा डोंगर, सगळ्यात मागच्या डोंगरावरच्या पवनचक्क्या, हे सगळंच फोकस मध्ये आहे. कारण इथे ह्या सगळ्यांमुळेच ह्या फोटोला सौंदर्य मिळालं आहे, कुठल्या एका गोष्टीमुळे नाही.

Landscape photo of hilly area showing great depth of field


तर अशाप्रकारे, डेप्थ ऑफ फिल्ड म्हणजेच DOF हे फोटोग्राफी मधलं खूप प्रभावी शस्त्र आणि शास्त्र आहे. ह्याचा योग्य वापर करून एखाद्या अगदी साध्या परिस्थितीत सुद्धा खूप चांगले फोटो काढता येऊ शकतात.

म्हणून तर म्हणतात ना, की चांगला फोटो काढण्यासाठी नेहमी चांगलाच कॅमेरा आणि लेन्स लागतं असं नाही. तर, आपल्याकडे असलेला कॅमेरा आणि लेन्स योग्य प्रकारे वापरता आलं, तरी खूप छान फोटो काढता येतात.


- प्रसन्न जोशी.

        

हा ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा (कमेंटच्या शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका) आणि आवडला असेल, तर बाकीच्यांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर तेसुद्धा विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.

        आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढे येणार्‍या सगळ्या पोस्ट तुम्हाला सहज वाचायला मिळतील. 

 

पुढची पोस्ट

'चांगला सेल्फी कसा काढावा?'

लक्षात ठेवण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी


हसत रहा आणि शिकत रहा.

📸  😃  📸  😃  📸  😃  📸  😃  📸


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी उपयुक्त अशा ऍक्सेसरीज आणि ऍप्स

सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडियो अपलोड करताना लक्षात ठेवायचे मुद्दे.

फोटोग्राफी - एक कला